विधीमंडळाच्या अधिवेशनात आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या भाषणानंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे. संदर्भ आहे मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा. आता प्रश्न असा आहे, की सरकार काय करणार आहे? पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून दोषींवर कारवाई करणार आहे, की एका बड्या मंत्र्याच्या निकटवर्तीयाला वाचवणार आहे? राज्य गंभीर वळणावर येऊन थांबले आहे. अशा प्रकारांना थोपवायचे की परिस्थिती आणखी गंभीर करायची आहे, याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे.
सरपंच देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली आहे. आमदार धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात दिलेली माहिती ऐकून संवेदनशील माणसाच्या अंगावर नक्कीच शहारे आले असणार, लोक अस्वस्थ झाले असणार. एखादी बाब सभागृहात बोलली गेली की त्याला वेगळे महत्व प्राप्त होते. आमदार सुरेश धस हे भाजपचे आहेत. तेही बीड जिल्ह्याचेच आहेत. त्यामुळे त्यांना खरी काय ती माहिती नक्कीच असणार. बीडचा बिहार झाला आहे, अशी खंत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मागे व्यक्त केली होती. आमदार धस यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी पवनचक्क्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून गुंडगिरीही वाढू लागली आहे. बीड जिल्ह्यातील प्रकरण यातूनच घडले आहे. सरपंच देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली, ती पाहता ही गुंडगिरी कोणत्या थराला गेली आहे, याची प्रचीती आता महाराष्ट्राला आली आहे. या या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव आले आहे. सभागृहात आमदार क्षीरसागर, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. मुंडे यांनीही ते मान्य केले आहे.
तसे पाहिले तर महाराष्ट्राने आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले पाहिजेत. आमदार धस भाजपचे आहेत. राज्यात सत्ता आहे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची, तरीही आमदार धस यांनी या प्रकरणाला सभागृहात वाचा फोडली. सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याची माहिती सर्वांना आहे. मात्र तो खून किती निर्घृणपणे करण्यात आला, हे आमदार धस यांनी सभागृहात मांडले. धस यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार क्षीरसागर, आमदार पंडित, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही हे प्रकरण सभागृहात मांडले. वाल्मिक कराड याला अटक करावी, अशी मागणी या सर्वांनी केली आहे.
आमदार धस, आमदार आव्हाड यांनी सभागृहात या प्रकरणाला वाचा फोडली. त्यामुळे सरकारला यावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. यामुळेच सभागृहात एखादा विषय मांडल्यानंतर त्याला वेगळे महत्व प्राप्त होते. बीड जिल्ह्यात लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे, असा सूर बीड जिल्ह्यातील आमदारांच्या मांडणीतून व्यक्त झाला आहे. वाल्मिक कराड यांचे नाव आल्यामुळे संशयाची सुई मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वळली आहे. त्यामुळे आता सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले. लोकांनी महायुतीवर विश्वास टाकला. मंत्र्यांना खातेवाटप व्हायच्या आधीच सरकारला विविध संकटांनी घेरले आहे. सरपंच देशमुख यांची हत्या आणि परभणी येथील पोलिस कोठडीतील मृत्युमुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे. हे दोन्ही मुद्दे सभागृहात उपस्थित झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. कारवाईचे आश्वासन दिले तर ती करावी लागणार आहे. राज्य गंभीर वळणावर आलेच आहे. त्यामुळे कुणी गुंडगिरीला राजाश्रय देत असेल तर त्याच्या पाठीवरील हात काढला पाहिजे.
धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचेही निकटवर्तीय आहेत.पब्लिक मेमरी शॉर्ट असते, म्हणजे लोक एखादी गंभीर घटनाही काही दिवसांनी विसरून जातात. सरकार त्याचा फायदा घेणार की गांभीर्याने पावले उचलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी देशमुख यांच्या हत्येवर चिंता व्यक्त केल्यामुळे सरकारला पावले उचलावी लागणार आहेत. जवळच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर राज्याचे अपरिमित नुकसान होईल. लोकांचा उद्रेकही होऊ शकतो, हे सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.