Bhagatsingh Koshyari : Uddhav Thackeray
Bhagatsingh Koshyari : Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Bhagatsingh Koshyari : 'कोश्यारींनी ठाकरे परिवाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला!'

सरकारनामा ब्यूरो

Bhagatsingh Koshyari : महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारींचे नाव स्मरले जाईल अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्याच वेळी राजभवनातल्या त्यांच्या औपचारिक मुक्कामाच्या शेवटच्या काही दिवसात त्यांना भेटण्यास येणाऱ्यांची गर्दी आहे. मविआचे नेते कोश्यारींवर टीका करत असताना शिंदे फडणवीस सरकारने कोश्यारींना धन्यवाद देणारा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार राजभवनात कोश्यारींना आवर्जून भेटण्यास गेले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले आदरणीय व्यक्तिमत्व अशी भावना मुनगंटीवार यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. तर कोश्यारींवर कोणतीही वादग्रस्त प्रतिक्रीया व्यक्त न करता आता ते निवृत्त झाले आहेत, असे उद्गार व्यक्त केले. कोश्यारी यांच्यावर त्यांच्या प्रारंभीच्या वर्षांपासून आजवरचा प्रवास दाखवणारी एक चित्रफित तयार केली आहे. काल राजभवनात या फिल्मचे प्रकाशन झाले. राजभवनात येणाऱ्या जवळपास प्रत्येकाची कोशियारी भेट घेत आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यानंतरही हिंदुत्वाच्या धाग्याने बांधल्या गेलेल्या शिवसेनेशी कोश्यारींनी संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले.शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे उजवे हात आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून ते मातोश्रीशी संपर्क ठेवून होते.

२०१९ च्या अखेरीस मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच काही महिन्यातच कोश्यारी ठाकरे परिवाराकडे गेले होते. ठाकरे परिवारानेही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर त्यांचे स्वागत केले होते. रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतरही ते शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी ते त्यांच्या माहेरी पाटणकर कुटुंबियांना भेटायला गेले होते.तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही त्यांनी युवानेते म्हणून स्वागत केले.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या मातोश्री माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे निधन झाले तेव्हा सांत्वनासाठी ते नार्वेकर यांना आपल्या वाहनातून घेवून गेले होते.वेगळ्या प्रसंगातून पूर्वापार एकत्र असलेले पक्ष एकत्र यावेत यासाठी ते प्रयत्न करत असावेत, अशी चर्चा आता सुरु आहे. या प्रयत्नांना यश आले नाही अन दुरावलेले भाजप सेना हे दोन पक्ष एकत्र आले नाहीत !

राजभवनात वावरतानाही ते विचारधारा व्यापक करण्याचा प्रयत्न करत असत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका सहकाऱ्याने 'सरकारना'माशी बोलताना व्यक्त केली. येणाऱ्याचे मुक्तमनाने स्वागत करत, त्यांच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ लावले गेले. पण राजभवन त्यांनी लोकभवन केले, हे ही विसरले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

कोशियारी १७ ,१८ फेब्रुवारीच्या सुमारास बागेश्वर या त्यांच्या मूळ गावी रवाना होणार आहेत.उत्तराखंडच्या पार टोकाला असलेले हे गाव नेपाळ सीमेलगत आहे.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे कोशियारींच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT