Tanaji Sawant Sarkarnama
विश्लेषण

Tanaji Sawant News : भूम-परंडाः शिंदेंच्या मंत्र्याला भानावर येण्याचा मतदारांचा संदेश, अटीतटीच्या लढतीत विजयी!

Bhum-Paranda Constituency Election Result : सतत वादग्रस्त विधाने करणारे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना भूम-परंडा मतदारसंघाने आता भानावर येण्याचा सल्ला दिला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदावर राहुल मोटे यांचा पराभव केला आहे. .

अय्यूब कादरी

Tanaji Sawant and Bhum-Paranda Vidhansabha Election Result : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भूम-परंडा या मतदारसंघात अखेर शिवसेनेचे डॉ. तानाजी सावंत हे 1509 मतांनी विजयी झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 81 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. ती पिछाडी भरून काढत सावंत विजयी झाले आहेत. विकासकामे केली असली तरी वादग्रस्त विधानांपासून दूर राहून आता भानावर येण्याचा संदेश मतदारांनी सांवंतांना याद्वारे दिला आहे.

गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींमध्ये सावंत आणि मोटे यांची भूमिका परस्परविरोधी होती. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये सावंत यांचा समावेश होता. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आपण महत्वाची भूमिका बजावली, असे सावंत यांनी जाहीरपणे सांगितले होते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. राहुले मोटे हे अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. तरीही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती त्याचे फळ म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली, मात्र वातावरण पोषक असतानाही ते विजय खेचून आणू शकले नाहीत.

लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात महायुतीत जो बेबनाव निर्माण झाला होता, त्याला सावंत यांची भूमिका सर्वाधिक कारणीभूत ठरली होती. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा आणि आपल्या पुतण्याला उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी जोर लावला होता. मात्र मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आणि उमेदवारी तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी केलेली भडक विधाने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मदत करणारी ठरली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सावंतांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. आपल्याला उमेदवार आवडलाच नव्हता, त्यामुळे मत द्या म्हणत मी कुणाकडे गेलो नाही, असे ते एका व्हिडीओमध्ये म्हणत होते. त्याचा संदर्भ लोकसभा निवडणुकीशी होता. अन्य एका व्हिडीओत ते शेतकऱ्याची औकात काढत होते. या सर्व प्रकारांमुळे मतदार त्यांच्यावर प्रचंड नाराज होते. मतदारांनी शांत राहून त्यांना हिसका दाखवला आहे. सावंत यांना मित्रपक्षांचीही फिकीर नव्हती, सावंत यांच्या सरंजामी वृत्तीचे प्रदर्शन करणारे व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाले होते.

भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तब्बल 81 हजार मतांची आघाडी मिळाली होती आणि येथेच सावंत यांच्या पराभवाची पायाभरणी झाली होती. मात्र, ही पिछाडी भरून काढण्यात सावंत यांना यश आले आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे आणि शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे इच्छुक होते. निवडणुकीच्या तोंडावरच ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे पुत्र रणजित पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती.

महाविकास आघाडी(MVA)कडून राहुल मोटे आणि रणजित पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. अखेरच्या दिवशी रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रचार एेन भरात असताना वाशी येथील शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. प्रशांत चेडे हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. या सर्व आव्हांनावर सावंत यांनी मात केली.

सावंत यांच्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधी पक्षांसह स्वपक्ष आणि मित्रपक्षांतही त्यांचे शत्रू तयार झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी भान राखले नव्हते. प्रचंड मोठी यंत्रणा, संस्थात्मक ताकद असूनही या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. 2019 च्या आधी या मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झालेले राहुल मोटे यांनी सावंत यांना कडवी झुंज दिली, त्यांना मात्र विजयापर्यंत नेण्यास ती कमी पडली.

(Edited by - Mayur Ratnapakhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT