Prashant Kishor Sarkarnama
विश्लेषण

Prashant Kishor: बिहारी राजकारणात ‘जनसुराज’चा बदलाचा सूर ; 'किंगमेकर’ की नवे ध्रुवीकरण

Prashant Kishor Jansuraaj Party Strategy:बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए), महागठबंधन आणि जनसुराज पक्ष असा त्रिकोणी सामना रंगणार आहे, असा दावा ‘जनसुराज’चे संस्थापक प्रशांत किशोर करत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

बिहारमधील सत्तेच्या राजकीय आकृतिबंधात गेली अनेक वर्षे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत. राष्ट्रीय जनता दल (राजद), संयुक्त जनता दल (जदयू) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप). आता प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ ‘पी.के’ यांनी जनसुराज हा नवा पक्ष स्थापन करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचा पक्ष या निवडणुकीत प्रभाव दाखवेल अशी चिन्हे आहेत. तो किती निर्णायक असेल याबाबत उलटसुलट कयास आहेत. त्या विषयी...

बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए), महागठबंधन आणि जनसुराज पक्ष असा त्रिकोणी सामना रंगणार आहे, असा दावा ‘जनसुराज’चे संस्थापक प्रशांत किशोर करत आहेत. त्यांनी १० ऑक्टोबर रोजी ‘राजद’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या राघोपूर (वैशाली) मतदारसंघातून ‘जनसुराज’च्या प्रचाराला सुरुवात केली. यंदा तेजस्वी यादव यांना राघोपूरची जागा टिकवणेही कठीण असल्याचाही त्यांचा दावा आहे.

१५० जागांचे लक्ष्य

अत्यंत चतुर अन् अभ्यासू निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. कधी ते चुकलेही आहेत. पण त्यांनी ते मोकळेपणाने मान्यही केले आहे. मात्र, एखाद्या पक्षाला निवडणुकीची रणनीती आखणे आणि स्वतःचा पक्ष स्थापून निवडणुकीच्या राजकारणात प्रत्यक्ष उतरणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण प्रशांत किशोर मूळचे बिहारी आहेत. त्यांचा बिहारच्या राजकारणाचा चांगला गृहपाठ आहे. अवघा बिहार त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधीच पिंजून काढला. ते बिहारी जनतेशी थेट त्यांच्या भाषेत सहज संवाद साधतात. बिहारचा युवक, मध्यमवर्गीय आणि नवउद्योजक वर्गाची बदल व्हावा, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचे नेतृत्व आणि राजकीय डावपेचांचे कौशल्य पणाला लागणार आहे.

स्वतः प्रशांत किशोर स्वतः निवडणूक लढविणार नाहीत. बिहारच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच आपण राजकारणात उडी घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. बिहारी मतदारांनी आपल्यावर आत्यंतिक विश्वास दाखविल्यास जनसुराज पक्षाला १५० पेक्षा अधिक जागा मिळू शकतात, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. मात्र, जनतेने आपल्यावर विश्वास टाकला नाही तर माझ्या पक्षाला दहा जागाही मिळू शकणार नाहीत, हे सांगायलाही ते विसरत नाहीत. त्यांचा जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व २४३ जागांवर निवडणूक लढविणार आहे. प्रत्यक्षात या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी १५० जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. कोणत्याही पक्षाशी निवडणूकपूर्व युतीचा पर्याय त्यांनी फेटाळला आहे.

‘जनसुराज’चे वेगळेपण

प्रशांत किशोर यांच्या मते, बिहारचे भवितव्य आता मतदारांनीच ठरवायचे आहे. त्यांना तेच दुष्टचक्र हवे की भावी पिढीसाठी सुशासनाची निवड करायची हे त्यांच्याच हातात आहे. ‘जनसुराज’च्या निमित्ताने त्यांना तिसरा पर्याय मिळाला आहे. त्यांनी पुन्हा जर तीच चूक केली तर भ्रष्टाचार, स्थलांतर, फसवी दारूबंदी सर्व काही ‘जैसे थे’ राहील. जनतेचे कष्टप्रद जीवन कायम राहील. ‘जनसुराज’ जिंकेल अथवा नाही, बिहारने जिंकायला हवे. चांगले उमेदवार जिंकले तरच बिहारचे खरे हित साधले जाईल. आम्हाला चांगले उमेदवार शोधण्यात फार अडचणी आल्या. तरीही आम्ही चांगला पर्याय दिला आहे.

आता तो स्वीकारायचा की नाही, हे बिहारच्या जनतेने ठरवायचे आहे. त्यांच्या पक्षाची ‘आप’शी होत असलेली तुलना प्रशांत यांना मान्य नाही. त्यांनी सांगितले, की ‘आप’ हा पक्ष आंदोलनातून जन्माला आला होता. मात्र, जनसुराज हा पक्ष आंदोलन किंवा चळवळीतून जन्माला आलेला पक्ष नाही. माझा आंदोलनांवर विश्वास नाही. आम्ही तीन वर्षे आंदोलने केली नाहीत. आम्ही तीन वर्षे पायी चालत बिहार पिंजून काढला. पदयात्रा अन् थेट जनसंपर्कातून ‘जनसुराज’चा जन्म झाला आहे. दोन वर्षांच्या संवाद मोहिमेनंतर २ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘जनसुराज पक्षा’ची अधिकृत स्थापना करण्यात आली. या पक्षाने उमेदवार निवड, घोषणापत्रापासून प्रचाराची नवी शैली अवलंबण्याचा प्रयत्न केला आहे.

‘पासवान निर्णायक नाही’

प्रशांत किशोर यांच्या मते, २०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान हा निर्णायक घटक ठरला होता. पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने तेव्हा फक्त संयुक्त जनता दलाचे उमेदवार जेथून निवडणूक लढवीत होते त्या जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच ‘राजद’च्या पदरात ३८ जागा पडू शकल्या. तेजस्वी यादव यांच्या ‘राजद’ला त्यामुळेच ७४ जागांवर यश मिळू शकले. अन्यथा २५-३० जागांवरच ‘राजद’ला यश मिळाले असते.

यंदाच्या निवडणुकीत मात्र, त्यांना या समीकरणाचा फायदा मिळू शकणार नाही. हे आपले केवळ काल्पनिक विश्लेषण नाही. कारण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण त्याचा परिणाम पाहिलाच. त्यावेळी ‘राजद’ला ज्या जागांवर विजय मिळाला, त्या प्रत्यक्षात २५ ते ३५ विधानसभा मतदारसंघांइतक्याच होत्या. मात्र, यावेळी कोणताही पक्ष-गट वेगळा उभा राहत नाही. बिहारमध्ये काँग्रेसची महागठबंधनमध्ये राजदमागे फरपट होत आहे. काही मतदारसंघात काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने राजदच्या नेत्यांनाच उमेदवारी द्यावी लागली आहे.

त्यामुळे यावेळी राजदला मिळणाऱ्या मतांचा टक्का सुमारे २५ टक्क्यांच्या आसपास किंवा २२ ते ३० टक्क्यांदरम्यानही असू शकतो, असे भाकीतही किशोर यांनी केले. ‘एनडीए’ने दहा हजारांचे मदतीचे आश्वासन मतदारांना दिले आहे, तर तेजस्वी यादव यांनी प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले. त्यावर टीका करताना किशोर म्हणाले, की जगात कोणतेही राष्ट्र साडेतीन कोटी नागरिकांना सरकारी नोकऱ्या देऊ शकत नाही. नागरिकांना फसविणे हे अत्यंत चुकीचे आहे.

नव्या मुद्द्यांवर निवडणूक

प्रशांत किशोर यांच्यामुळे बिहारची निवडणूक केवळ सत्ताधारी ‘एनडीए’ आणि महागठबंधन विरोधक यांच्यात मर्यादित राहणार नाही, तर ‘पर्याय-बदल-विकास-पारदर्शकता’ या बिहारच्या राजकारणासाठी नव्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल, असे संकेत मिळत आहेत. ‘जनसुराज’चा भर गावपातळीवर स्थानिक नेतृत्व पुढे आणण्यावर आहे. त्यांनी ‘जात नव्हे क्षमता’ या निकषावर उमेदवार निवडले आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या विकासाचा आग्रह त्यांनी धरला आहे. बिहारच्या राजकीय मानसिकतेत बदलाची मागणी ते करत आहेत. बिहारमध्ये तीन प्रमुख सामाजिक-राजकीय प्रवाह दिसतात. जातीय आणि सामाजिक घटक म्हणून यादव, कुर्मी, दलितांचा प्रभाव आहे.

परंपरा आणि प्रस्थापित नेतृत्वावर या घटकाचा भर आहे. दुसरीकडे विकासाभिमुख अपेक्षा बाळगणारे युवक, विद्यार्थी, बेरोजगार या घटकांना संधी हवी आहे. त्यांना ज्वलंत मुद्द्यांपासून पलायन नको आहे. तसेच तिसरा घटक शहरी मतदार, नवमतदार आणि मध्यमवर्ग असून त्यांना नवे नेतृत्व, नवा पर्याय हवा आहे. कारण बिहारमध्ये नेतृत्वाचे तेच ते चेहरे दिसतात. त्याबद्दल मोठी नाराजी आहे. बिहारमध्ये १८ ते ३५ वयोगटातील मतदारांचे प्रमाण ४५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीत युवा मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. याच वयोगटाला ‘जनसुराज’ थेट आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

'किंगमेकर’ की नवे ध्रुवीकरण

‘जनसुराज’बाबत तीन शक्यता आहेत. थेट सत्ता नाही, पण जर ‘जनसुराज’ने ३ ते ८ टक्के मते मिळविली तर अनेक जागांवर मतविभाजन होईल. त्यामुळे महागठबंधन किंवा ‘एनडीए’ यापैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळवण्यात अडचण येऊ शकते. काही निवडक क्षेत्रांत ‘जनसुराज’ तुल्यबळ लढत देण्याची चिन्हे आहेत. स्थलांतरित मजुरांचे जिल्हे, शिक्षणग्राम पाटणा-बक्सर-छपरा परिसर, शहरी पट्ट्यात त्यांना पसंती मिळू शकते. जर कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर ‘जनसुराज’ची सत्तास्थापनेत निर्णायक भूमिका ठरू शकते. थोडक्यात बिहारमध्ये ‘बदलाचा स्वर’ उमटत आहे, पण त्याची व्याप्ती अजून निश्चित नाही. बदलाच्या मानसिकतेतील युवकांचा विश्वास जिंकण्याची क्षमता ‘जनसुराज’मध्ये दिसते. तरीही ‘जनसुराज’ संपूर्ण सत्तांतर घडवेल असे म्हणणे अजून घाईचेच ठरेल. पण बिहारच्या राजकारणातील भविष्यातील दिशा बदलण्यास ते नक्कीच प्रारंभ करतील.

यानंतरच्या निवडणुकांत त्याचा मोठा विस्तार होऊ शकतो. त्यांच्या पक्षाचा प्रभाव स्थायी बदल घडविण्याच्या अन् नव्या राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहावा लागेल. बिहारमध्ये अनेक निवडणुकांनंतर प्रथमच ‘विकासासाठी पर्याय’ हा मुद्दा केंद्रस्थानी आल्याचे दिसते. त्याचे श्रेय मात्र प्रशांत किशोर यांना द्यावेच लागेल. भलेही त्यांनी जिंकलेल्या जागांची संख्या कितीही असो.

बलस्थान

  •  ‘नवा पर्याय’ म्हणून प्रतिमा

  •  बिहारमध्ये त्याच त्या चेहऱ्यांबद्दल नाराजी

  •  प्रशांत किशोर (पीके) यांचा सत्तेपेक्षा परिवर्तनावर भर

  •  निवडणूक रणनीतीचे सखोल ज्ञान

  •  ‘पी.के.’ निवडणूक ‘डेटा-संघटना-प्रचारसंदेशां’चे कुशल समन्वयक

  •  दोन वर्षांचा पायी जनसंपर्क दौरे, ही प्रशांत किशोर यांची जमेची बाजू

  •  ‘सोशल मीडिया’ आणि ‘डिजिटल’ प्रभाव

  •  ‘व्हिडिओ डॉक्युमेंटेशन’, ‘पॉडकास्ट’, युवा परिषदांद्वारे मोहीम

  •  अन्य पक्षांचा ‘सोशल मीडिया’चा वापर तुलनेने प्रभावी नाही

आव्हाने

  •  उमेदवार अन् कार्यकर्त्यांचे जाळे मर्यादित

  •  निवडणूक यंत्रणा उभी करणे महत्त्वाचे

  •  जातीय राजकारणाची रुजलेली ‘मिथके’

  •  जातनिरपेक्ष विकासावर

  • ‘जनसुराज’चा भर

  • बिहारचा मतदार आपल्या जातीचाच नेता निवडतो

  •  मोठ्या पक्षांजवळ मजबूत निधी

  • अन् आघाड्यांचे वर्चस्व

  • नवा पक्ष सर्वदूर झटपट विस्तारण्यास मर्यादा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT