bjp news Sarkarnama
विश्लेषण

BJP News: आजार एक अन् उपचार मात्र दुसरेच...! भाजप आणखी किती गाफील राहणार

अय्यूब कादरी

केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळू शकले नाही. महाराष्ट्रात तर भाजपचा दारूण पराभव झाला. 28 जागा लढवलेल्या भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत काम न करणाऱ्या, पुरेसे मताधिक्य न दिलेल्या आमदारांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार नाही, असा निर्णय कोअर कमिटीच्या (BJP Core Committee Meeting) बैठकीत झाल्याची चर्चा आहे. हे खरे असेल तर आजार एक आणि उपचार दुसरेच, असा हा प्रकार होणार आहे.

भाजपच्या अपयशाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे. तशी ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अपयशाची जबाबदारी फडणवीस यांनी स्वीकारली आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती.

केंद्रीय नेतृत्वाने त्याला नकार देत काम सुरू ठेवण्याचे आदेश फडणवीस यांना दिले होते. पुरेसे मताधिक्य न देणाऱ्या आमदारांची उमेदवारी डावलण्यात येणार असेल तर या अपयशाला जबाबदार म्हणून बावनकुळे आणि फडणवीस यांनाही उमेदवारी नाकारण्यात येणार आहे का? भाजपला आजार एक आणि त्यावर उपचार मात्र दुसरेच केले जात आहेत. त्यामुळे आजार कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

भाजपच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी 5 वर्षे मागे जावे लागेल. 2019 ची निवडणूक झाली आणि त्यानंतर शिवसेना-भाजपची युती तुटली. युतीतील दोन्ही पक्षांचे संख्याबळ कितीही असले तरी मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याचा निर्णय झाला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आणि शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी ते अडून बसले.

मुख्यमंत्रिपद विभागून घेण्याचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'मातोश्री'वर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झालेल्या बैठकीत दिला होता, असाही दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. भाजपने हा दावा स्पष्टपणे नाकारला. दरम्यान, बाळासाहेबांच्या खोलीत बसून दिलेला शब्द भाजपने फिरवला, असा संदेश लोकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये गेला होता. भाजपची खरी अडचण त्यावेळेसपासून सुरू झाली होती. त्याचा अंदाज न आल्याने भाजप गाफील राहिला.

या मुद्द्यावरून 25 वर्षांची युती अखेर तुटली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. तिकडे, सूडाने पेटून उठलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार पाडण्यासाठी अगदी सुरुवातीपासून हालचाली सुरू केल्या होत्या.

अडीच वर्षांनंतर त्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून ते साध्य करून दाखवले. मी दोन दोन पक्ष फोडून परत आलोय, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. फडणवीस आणि भाजप प्रचंड गाफील असल्याचे ते लक्षण होते. कारण, जमिनीवर काय परिस्थिती आहे, सरकार पाडणे, पक्ष फोडणे, फुटिरांना पक्षाचे नाव, चिन्ह मिळवून देणे आदी प्रकार लोकांना आवडले नव्हते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राचे मुख्यमंत्रिपद भाजपने घालवले, असा भावनिक मुद्दा तयार झाला होता. याशिवाय, फडणवीस यांच्या निकटवर्तीय काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला होता. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी एक कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका निभावल्याची भावना समाजात निर्माण झाली होती. शिवसेना फोडण्यात आली, हेही लोकांना आवडले नव्हते.

बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष भाजपने फोडला, असा संदेश बऱ्यापैकी रुजला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नकली शिवसेना असे म्हणत खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांची नकली संतान असे म्हटले होते. मला नकली संतान म्हणणारे बेअक्कल, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले होते. भाजपच्या नेत्यांनी प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचाही प्रयत्न केला होता.

भाजपच्या अपयशाला वरील सर्व मुद्दे कारणीभूत आहेत. लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि कमकुवत वाटणाऱ्या महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्या जवळपास 18 सभा झाल्या होत्या आणि भाजपचे फक्त 9 तर महायुतीचे एकूण 17 उमेदवार विजयी झाले. याचा अर्थ स्पष्ट आहे, मतदारांनी मोदींनाही नाकारले. मग राज्यातील भाजप आमदार, नेत्यांची काय बिशाद? लोक इतके चिडलेले होते की त्यांनी भाजपला धडाच शिकवला. मग यासाठी भाजप आता कुणाला जबाबदार धरणार आहे?

उदाहरणादाखल पाहायचे तर उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर राहिल्या. आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघातून अर्चनाताईंना 30 हजारांपेक्षा अधिक मतांनी, भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शी मतदारसंघातून 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर राहिल्या.

भाजपचे माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदारसंघातून भाजपचे लातूर मतदारसंघातील उमेदवार सुधाकर श्रंगारे मोठ्या पिछाडीवर राहिले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपले पुत्र सुजय विखे पाटील यांना निवडून आणू शकले नाहीत.

राज्यभरात कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती राहिली. पुरेसे मताधिक्य न देणाऱ्यांची उमेदवारी कापणार, असा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल, तर मग कारवाई कशी आणि कुणा-कुणावर होणार, हा मोठा प्रश्न आहे. आजार काय आहे, हे भाजप अद्यापही समजून घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजार एक आणि उपचार दुसरेच, असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. परिणामी, भाजपचा आजार आणखी बाळावण्याचा धोका आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT