Mumbai, 16 March : विधान परिषदेच्या तीन जागांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता.16 मार्च) सकाळी आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे. ही उमेदवारी जाहीर करताना भाजपने विदर्भ आणि मराठवाड्याला संधी दिली आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी विदर्भाला झुकते माप देताना हक्काची जागा असूनही ती पश्चिम महाराष्ट्राला मिळू शकलेली नाही, त्यामुळे विधान परिषदेच्या उमेदवारीत भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अन्याय केल्याची चर्चा रंगली आहे.
विधान परिषदेतील (Vidhan Parishad) आमदार गोपीचंद पडळकर, रमेश कराड, प्रवीण दटके हे भाजपचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले, त्यामुळे त्यांच्या रिक्त पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सांगलीचे असून ते जतमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. रमेश कराड हे मराठवाड्यातील लातूर ग्रामीणमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत, तर प्रवीण दटके यांना भाजपने नागपूर मध्य मतदारसंघातून तिकिट दिले होते, ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
विधान परिषदेच्या मागील तीन जागांपैकी एक जागा पश्चिम महाराष्ट्र, एक जागा विदर्भ आणि एक जागा मराठवाड्यातील होती, त्यानुसार नव्या निवडीतही त्या त्या विभागाला प्रतिनिधीत्व दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, विधान परिषदेची एक जागा संजय केनेकर यांच्या माध्यमातून मराठवाड्याला देण्यात आली आहे. उर्वरीत दोन्ही जागा विदर्भाला देण्यात आलेल्या आहेत.
दादाराव केचे यांच्या आर्वी मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून काम केलेले सुमित वानखेडे यांना तिकिट देण्यात आले होते. त्या वेळी केचे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता, त्यानुसार केचे यांना संधी देण्यात आली आहे.
दुसरे संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर असून ते फडणवीसांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजपच्या यादीवर फडणवीसांचे वर्चस्व दिसून येत असले तरी पश्चिम महाराष्ट्रावर या निवडणुकीत अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.