Satyajeet Kadam News: विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून भाजप नेत्यांनी हेळसांड केल्यानंतर नाराज झालेल्या माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा रस्ता धरला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, पक्ष प्रवेशापूर्वी कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद देणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता महामंडळाचे वाटप होणार आहे. शिवाय राज्यपाल नियुक्त पाच आमदारांची निवड होणे बाकी आहे. अशातच सत्यजित कदम यांना शिंदेंच्या शिवसेनेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद मिळेल की विधानपरिषद मिळेल याची चर्चा अधिक रंगली आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारीवरून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत आला. त्याच पद्धतीने महायुतीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या खेळखंडोबामुळे देखील हा मतदारसंघ चर्चेत होता.
सुरुवातीला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून यांच्या शिवसेनेतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सत्यजित उर्फ नाना कदम यांनी प्रयत्न करत होते. ते भाजपचे पोटनिवडणुकीतील उमेदवार होते. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी संदर्भात पाठपुरा सुरू होता. मात्र, कदम ऐवजी महाडिक यांनी पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यासाठी उमेदवारी मागितल्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली. त्यामुळे नाराज झालेल्या सत्यजित कदम यांना आपल्या उमेदवारीवर पाणी फिरवावे लागले. ऐनवेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली.
भाजप नेत्यांवर नाराज झालेल्या सत्यजित कदम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद देण्याचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कदम यांनी शिवसेनेतून आपले काम सुरू ठेवले. उत्तरचे उमेदवार क्षीरसागर सागर यांना निवडून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या नजरा महामंडळ आणि समित्यांच्या निवडीकडे लागली आहे. सत्यजित उर्फ नाना कदम यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद मिळेल. याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात मंडळ आणि समितांचे निवडी होणार असल्याचे संकेत आहे. मात्र राज्य नियोजन मंडळापेक्षा विधान परिषदेसाठी देखील कदम यांचे नाव आघाडीवर आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कदम यांना राज्य नियोजनवर पाठवणार का विधान परिषदेत पाठवणार? याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद कदम यांना दिल्यास माजी खासदार संजय मंडलिक यांना विधान परिषदेवर घेण्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.