BJP Maharashtra news : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. प्रामुख्याने भाजपला खात्री असलेल्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात सलग दुसऱ्या निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढविली. हे दोन्ही पराभव भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. दोन्ही मतदारसंघ २०२० पूर्वी भाजपचे बालेकिल्ले होते. पण ते आता ढासळले आहेत.
विधानपरिषदेत शिक्षक आणि पदवीधरचे प्रत्येक सात सदस्य असतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळे आता महाविकास आघाडीचे संख्याबळ एकने वाढले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे आणि औरंगाबाद या दोन पदवीधर मतदारसंघात बाजी मारली. तर नागपुरात काँग्रेस पुन्हा वरचढ ठरली. तर महायुतीतील भाजपला केवळ पुणे शिक्षक मतदारसंघावर समाधान मानावे लागले.
अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकला. राज्यात अडीच वर्षांचा कालावधी वगळता भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ आणि आता २०२४ पासून दुसऱ्यांदा या पदावर आहेत. तर अडीच वर्षे ते उपमुख्यमंत्रीही होते. २०१४ पासून राज्यात भाजपची ताकद प्रचंड वेगाने वाढली आहे.
विधानसभेत १३७ आमदारांचे पाठबळ एकट्या भाजपच्या मागे आहे. पण असे असूनही पदवीधर मतदारसंघात मागील काही काही वर्षांत भाजपवर नामुष्की ओढविली आहे. पदवीधरमध्ये केवळ कोकण मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार आहे. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब, नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात हर्षदा देशमुख आणि औरंगाबादमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील, अमरावतीत काँग्रेसचे धीरज लिंगाडे तर नाशिकमध्ये अपक्ष सत्यजित तांबे हे आमदार आहेत.
निरंजन डावखरे हे २०१२ मध्ये कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण २०१८ च्या निवडणुकीआधीच त्यांनी आमदारकीसह पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यानंतर ते पुन्हा २०२४ मध्ये निवडून आले. त्यामुळे डावखरे हे मुळचे भाजपचे नेते नाहीत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यानंतर हा मतदारसंघ भाजपच्या नावावर झाला.
बालेकिल्ले ढासळले
नागपूर या भाजपचा तब्बल ४० वर्षे बालेकिल्ला होता. २०२० मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या संदीप जोशी यांचा पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला. यावेळी आपला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने शर्तीचे प्रयत्न केले. पण पदरात अपयशच पडले. पुण्यातही चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर यांनी पदवीधरांचे नेतृत्व केले आहे. पण २०२० मध्ये राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवत भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली.
कधीकाळी मुंबईही भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला. आता शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ आहे. ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे पदवीधरचे सातपैकी पाच आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. भाजपचा केवळ एक आमदार असून एक आमदार अपक्ष आहे.
शिक्षक मतदारसंघात काय स्थिती?
शिक्षक मतदारसंघाच्या सात जागांपैकी भाजपचे दोन जागा आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुण्यात भाजपचे कौस्तुभ गावडे निवडून आल्यानंतर शिक्षक आमदारांचा आकडा दोनवर गेला आहे. नागपुरात भाजपच्या ताब्यात शिक्षक मतदारसंघही नाही. नागपुरात सुधाकर आडबाले हे अपक्ष आमदार आहेत. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता.
कोकणातून ज्ञानेश्वर म्हात्रे हेही भाजपचे आमदार आहेत. तर नाशिकमध्ये किशोर दराडे आणि अमरावतीत किरण सरनाईक हे शिवसेनेचे, मुंबईत जगन्नाथ अभ्यंकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे आमदार आहेत.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार (कंसात पक्ष) -
पदवीधर मतदारसंघ आमदार
कोकण - निरंजन डावखरे (भाजप)
मुंबई - अनिल परब (शिवसेना यूबीटी)
नागपूर - अभिजीत वंजारी (काँग्रेस)
अमरावती - धीरज लिंगाडे (काँग्रेस)
पुणे - हर्षदा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
औरंगाबाद - डॉ. प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
नाशिक - सत्यजित तांबे (अपक्ष)
शिक्षक मतदारसंघ आमदार
मुंबई - जगन्नाथ अभ्यंकर (शिवसेना यूबीटी)
नाशिक - किशोर दराडे (शिवसेना)
अमरवाती - किरण सरनाईक (शिवसेना)
कोकण - ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)
पुणे - कौस्तुभ गावडे (भाजप)
औरंगाबाद - विक्रम काळे (राष्ट्रवादी)
नागपूर - सुधाकर आडबाले (अपक्ष)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.