Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay Raut sarkarnama
विश्लेषण

फडणवीस घरी गेलेल्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश अन् राऊतांचा अचूक बाण

सरकारनामा ब्युरो

पणजी : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गोवा भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर बड्या नेत्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या नेत्याच्या घरी गेले होेते. यावरून शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील (Goa) राजकारण चांगलंच तापलं आहे. या धामधुमीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांनी मंगळवारी रात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह पत्नी डेलिलाह लोबो (Delilah Lobo) यांनीही काँग्रेसचा हात हातात धरला आहे. यामुळे भाजपमधील नाराजी गळती थांबत नसल्याचे समोर येत आहे.

फडणवीस हे गोवा भाजपचे प्रभारी आहेत. त्यामुळे या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. लोबो यांच्या कळंगुटमधील घरी जाऊन फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला होता. मात्र, याला यश आले नाही. अखेर लोबोंनी भाजपला रामराम करून काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. मायकल लोबो हे कळंगुट मतदारसंघाचे आमदार होते. तर त्यांच्या पत्नी सरपंच असून भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. दोघांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मायकल लोबो यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

फडणवीसांनी गोव्यात शिवसेनेची लढाई 'नोटा'शी आहे, असा खोचक टोमणा मारला होता. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. फडणवीस तिथे गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला आहे. एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला आहे. भाजपचे आमदार प्रविण झांटे यांनीही पक्ष सोडला आहे. फडणवीसांनी आधी त्यांच्या पक्षातील लढाई करावी. गोव्यात आमची लढाई नोटांशी आहे. महाराष्ट्रातून भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. तिथे महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT