Pankaja Munde News Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra politics : पंकजा मुंडेंच्या 'परिक्रमेतील' शक्ती दखल घ्यायला लावणारी !

Pankaja Munde News : पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती.

Datta Deshmukh

Beed Politics : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकतीच राज्यातील प्रमुख ज्योतीर्लिंग व शक्तीपिठांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. दर्शन या हेतूने काढलेल्या आठ दिवसांच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा पंकजा मुंडे यांच्या राजकीय शक्तीचा प्रत्यय होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यांच्या या परिक्रमेची व राजकीय शक्तीची दखल घ्यावी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

यापूर्वी पंकजा मुंडे यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. त्याचा फायदा राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला होता. त्याची दखल घेत पंकजा मुंडेंना भाजपच्या (BJP) सुकाणू समितीमध्ये स्थान मिळाले होते. नंतर सत्तेत देखील प्रमुख खात्यांचे मंत्रिपदे मिळाली. भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा, आक्रमक वक्त्या, भाजपमधील प्रमुख ओबीसी लिडर अशी त्यांची राजकीय बलस्थाने पक्षांतर्गत विरोधकांना खुपू लागली. त्या मुळे मंत्रिपदावर असल्यापासूनच त्यांच्या राजकीय खच्चीकरणाच्या परिक्रमेला सुरुवात झाली. त्यांच्याकडील काही खाते काढण्यापासून त्यांच्या खात्यातील माहिती विरोधकांना पुरविण्याचे कामही पक्षातूनच झाल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला होता.

दरम्यान, त्यांच्या विधानसभेतील पराभवाला देखील पक्षातूनच खतपाणी मिळाल्याची खदखदही समर्थकांच्या मनात कायम आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यसभा व विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ऐवजी कधी काळी त्यांचे समर्थक राहीलेल्या डॉ. भागवत कराड, रमेश कराड यांना संधी मिळाली. विशेष, म्हणजे एकावेळी तर पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या अर्जाची तयारी केलेली असता टाळले गेले. एकूणच त्यांना वारंवार टाळल्याने त्यांचे समर्थक भाजपवर नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनीही अनेकदा आपली नाराजी बोलून दाखविली आहे. विशेष, म्हणजे मोदी-शहाच आपले नेते असल्याचेही त्यांनी निक्षुन सांगीतले असून आपल्या भवितव्याबाबत त्यांनाच बोलणार असेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान, हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मासाच्या निमित्ताने त्यांनी राज्यातील प्रमुख ज्योतीर्लिंग व शक्तीपिठांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा काढली. ता. ४ ते ११ या आठ दिवस पाच हजार किलोमिटर अंतराच्या परिक्रमेच्या निमित्ताने त्यांचे सर्वत्र भव्यदिव्य स्वागत झाले. समर्थकांची गर्दी आणि भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांची शिवशक्ती परिक्रमेला उपस्थिती हे या परिक्रमेचे वैशिष्ट्य ठरले. विविध ठिकाणच्या भाषणांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील सल देखील बोलून दाखविली. नव्या राजकीय समिकरणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा दावा होऊ शकतो. त्यामुळे पंकजा मुंडे कुठून लढणार असा पेच आहे.

मात्र, आपण खासदार डॉ. प्रितम मुंडे (Pritam Munde) यांच्या जागेवर लोकसभा निवडणुक लढविणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकूणच या गर्दी आणि उत्फुर्त स्वागतामुळे पंकजा मुंडे यांचे चाहत्यांचा उत्साह दुणावला असून आता याची दखल राजकीय परिघाला देखील घ्यावी, लागेल असे जाणकारांचे मत आहे. सध्या त्यांच्यावर केंद्रीय कार्यकारीणीत सचिव आणि मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी आहे. मात्र, आता त्यांना पुन्हा राज्याच्या प्रवाहात आणावे लागेल आणि लवकरच तसे घडू शकते, असे भाजपमधील जाणकारांचे मत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT