Indian Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारतर पुढील वर्षभर पंतप्रधान असतील, असे भाकीत काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच केले आहे. पण राहुल गांधींकडून याबाबत विधान केले जात असतानाच विरोधी पक्षांच्या गोटात सुरू असलेल्या हालचालींकडे कानाडोळा तर केला नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने तब्बल २४० पर्यंतचा आकडा गाठत भाजपला बहुमतापासून दूर ठेवले. त्याचा आनंद विरोधकांकडून आजही साजरा केला जात आहे. राहुल गांधींचे भाकित हे त्याचाच पुढचा टप्पा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे कारण म्हणजे एकीकडे इंडिया आघाडीकडून भाजपला बहुमतापासून रोखल्याचा ढोल बडवला जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२९ च्या निवडणुकीची पायाभरणी केली आहे.
इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत २३ पक्ष सहभागी झाले होते. भाजपला प्रखरपणे विरोध करण्याची जणू शपथच या बैठकीत घेण्यात आले. पाच अजेंडे यात निश्चित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीला आणखी बराच कालावधी असल्याने आघाडीला तयारीसाठी पुरेसा वेळ आहे. पण एनडीए सरकार आणि भाजपनेही आघाडीत बिघाडी करण्यासाठी जमीन नांगरून ठेवली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घटना त्याच्या साक्षीदार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये सत्ता, टीएमसीत फूट
भाजपने नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. भाजपने केवळ राज्यात सत्ता मिळविली नाही तर दिल्लीतील सरकारची स्थितीही मजबूत केली आहे. पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. जवळपास ६० हून अधिक आमदार आणि २० खासदारांनी बंड केले आहे. आमदारांनी सरकारच्या विरोधात राहण्याची भूमिका घेतली असली तरी खासदारांनी मात्र एनडीएला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली आहे.
इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या तृणमूलसाठी हा मोठा झटका आहे. आघाडीची ताकदही घटणार आहे. तर दुसरीकडे एनडीए सरकार अधिक मजबूत होणार आहे. अन्य राज्यांमध्येही त्याचे पडसाद उमटू शकतात. लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत असेल. २०२४ मधील भरपाई करण्याची संधी भाजपला असणार आहे.
महाराष्ट्र, बिहारमध्ये विजय
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची वाताहात झाली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला ५० जागांवर गुंडाळले. भाजपने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक जागा जिंकण्याचा पराक्रम करत आपली ताकद दाखवून दिली. आघाडीसाठी ही मोठी नामुष्की ठरली. बिहारच्या निवडणुकीतही विरोधकांची धुळधाण झाली. नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगत भाजपने आपला नेता या खुर्चीवर बसविला.
दिल्लीत डबल इंजिन
भाजपने दिल्लीत २७ वर्षांनंतर सत्ता मिळविली. आम आदमी पक्षाचा दारुण पराभव करत भाजपने विरोधकांना सुपडासाफ केला. हरियाणा, आसाममध्ये सलग विजय मिळवत भाजपने कमाल करून दाखविली. २०२४ च्या निवडणुकीनंतर सहा राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात एनडीएची सत्ता आली आहे.
इंडिया आघाडी विस्कटणार?
इंडिया आघाडीकडून लोकसभेची तयारी सुरू केली आहे. पण त्याची सुरूवात डीएमके आणि आम आदमी पक्षाच्या भूमिकेमुळे नकारात्मक झाली आहे. तमिळनाडूतील निवडणुकीनंतर वेगळे राजकीय समीकरण उदयाला आले आहे. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने डीएमके पक्ष काँग्रेसपासून दुरावला आहे. आम आदमी पक्षानेही काँग्रेस विरोधात नाराजी व्यक्त करत काढता पाय घेतला आहे. तृणमूलची स्थिती दयनीय झाली आहे. आता केवळ जम्मू काश्मीरमध्ये आघाडीतील मित्रपक्षाची सत्ता आहे. त्यामुळे आघाडी कमकुवत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पक्षांमध्ये फूट
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधीच आपचे राज्यसभेचे सात खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपची राज्यसभेतील ताकद वाढली आहे. तृणमूलमधील राज्यसभेच्या चार खासदारांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. सध्याचे भाजपचे संख्याबळ पाहता या चार जागाही भाजपकडे येतील. लोकसभेतही भाजप मजबूत स्थिती येण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. तृणमूलच्या लोकसभेतील २० खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिल्यास भाजपचे इतर मित्रपक्षांवरील अवलंबत्व कमी होऊ शकेल. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर समाजवादी पक्षातही तृणमूलप्रमाणेच बंड होईल, असे भाजप नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजपचा विविध राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यासोबतच आघाडीतील प्रादेशिक पक्षांनाही खिळखिळे करण्याचा प्लॅन यशस्वी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.