BJP MP Nishikant Dubey’s remarks spark strong political backlash in Maharashtra, exposing deeper political motives.  Sarkarnama
विश्लेषण

Nishikant Dubey Controversy : दुबेंचा डाव आधी समजून घ्या, ही गरळ उगाच नाही; महाराष्ट्राला डिवचण्याची ही आहेत 3 कारणे...

Who is BJP MP Nishikant Dubey and What Did He Say? : खासदार दुबे यांच्या बोलण्यामागे केवळ उद्धव आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची किंवा हिंदी भाषा सक्तीविरोधाची किनार दिसत नाही.

Rajanand More

बातमीत थोडक्यात काय?

  • भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस, आणि दक्षिण भारतीय भाषिकांविषयी चिथावणीखोर आणि द्वेषमूलक विधाने करून वाद निर्माण केला आहे.

  • त्यांच्या विधानांमागे निवडणूकपूर्व राजकीय हेतू, विशेषतः बिहार निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो.

  • मराठी विरुद्ध अमराठी, हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि उत्तर-दक्षिण भारतीय यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत समाजात ध्रुवीकरण वाढवण्याचा धोका आहे.

National Political Implications of the Controversy : भाजपचे झारखंडमधील खासदार निशीकांत दुबे यांनी सोमवारी महाराष्ट्राविषयी, मराठी माणसांविषयी बरीच गरळ ओकली. तुम्ही कुणाची भाकरी खाताय, हे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. महाराष्ट्राबाहेर या, आपटून-आपटून मारू, असा चिथावणीखोर इशाराही त्यांनी दिला. पण ही गरळ उगाच नाही. दुबे जे बोलतात ते नेमका निशाणा लागेल असेच. त्यामागे त्यांचा हेतूही स्पष्ट असतो. यापूर्वी त्यांनी थेट सरन्यायाधीशांना लक्ष्य केले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे महाराष्ट्राविषयी त्यांच्या बोलण्यामागेही असाच हेतू स्पष्टपणे दिसतो.

खासदार दुबे यांच्या बोलण्यामागे केवळ उद्धव आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची किंवा हिंदी भाषा सक्तीविरोधाची किनार दिसत नाही. मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला (गुजराती) मनसे कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारली आणि त्यानंतर मराठी विरुध्द अमराठी असा रंग त्याला देण्यात येऊ लागला. त्यानंतर बरेच कंगोरे निर्माण करण्यात आले. दुबेंची प्रतिक्रियाही त्याचाच परिपाक आहे. त्यामागे शुद्ध राजकीय हेतू उघडपणे दिसतो.

हिंदू-मुस्लिम वाद

महाराष्ट्रात भाजपचे काही नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू विरुद्ध मुस्लिम वादाला कशी फोडणी देता येईल, याची झलक अधूनमधून दाखवली जातेच. त्यात निशिकांत दुबेंनीही तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यांनी राज ठाकरेंना आव्हान देताना हिंमत असेल तर हिंदी भाषिकांप्रमाणे ऊर्दू बोलणाऱ्यांनाही मारा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. ऊर्दू बोलणारे म्हणजे मुस्लिम. एवढेच नाही तर मुंबईतील माहिम दर्ग्याबाहेर जाऊन मारून दाखवा, असं ते म्हणालेत. यामागे हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्याचा त्यांचा हेतू स्पष्टपणे दिसतो.

बिहारची निवडणूक

बिहार विधानसभेची निवडणूक पुढील काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातही अनेक बिहारी लोक उदरनिर्वाहासाठी आलेली आहे. बहुतेक जण मोलमजुरी किंवा पाणीपुरी, भाजीपाला विक्री अशा छोट्या व्यवसायांमध्ये आहेत. पण त्यांचे मतदान बिहारमध्ये आहे. दुबेंनी बिहारमध्ये टाटांनी सुरू केलेल्या पहिल्या कारखान्याचा उल्लेख करून महाराष्ट्राला खुजे ठरवले आहे. टाटांनीही पहिली पसंती बिहारला दिली होती, असा त्यांचा रोख होता. त्याचप्रमाणे अमराठी उद्योजकांच्या भाकरीवर महाराष्ट्र जगतो, असेही त्यांना थेट सांगायचे होते. यामागे त्यांना बिहार निवडणुकीसाठी मतांची बेगमी करायची आहे, हे दिसते.

दक्षिण भारतीयांना गोंजारले

सध्याच्या स्थितीत मराठी विरुध्द उत्तर भारतीय हा वाद पेटवत न ठेवता त्याला दक्षिण भारताशी जोडण्याची काम दुबेंनी केले आहे. त्यांनी तमिळ-तेलुगू भाषिकांना मारून दाखवण्याचे आव्हानही दिले आहे. तमिळनाडू येऊन दाखवा, असेही ते म्हणाले आहेत. दक्षिण भारतात कर्नाटक वगळता भाजपला इतर कुठल्याही राज्यांत फारसा वाव नाही. आता कुठे आंध्र प्रदेशात सत्तेची चव चाखण्याची संधी मिळाली आहे. मात्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा या राज्यांत फारसे अस्तित्वही नाही. भाषा वादातून दक्षिणेतील राज्यांना आणि तेथील तेलुगू, तमिळ भाषिकांना मराठी लोकांच्या विरोधात भडकवून आपलेसे करण्याचा केविलवाणा प्रयत्न दुबेंनी केला आहे.

राज ठाकरेंनी आधीच स्पष्ट केले आहे की, आपला हिंदीला विरोध नाही तर इयत्ता पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून इयत्ता पाचवीपासून हिंदी भाषा शिकवली जाते. त्याला कधीच कुणी विरोध केला नाही. पण मराठी विरुध्द अमराठी वादात हिंदीच्या मुद्द्यावरून तेल ओतण्याचे काम काही अमराठी लोकांसह त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या मराठी लोकांकडूनही केले जात आहे. लोकशाहीमध्ये विरोधी भूमिका असायलाच हवी. पण आपल्या भूमिकेमुळे समाजात अशांतता निर्माण होणार नाही, याची दक्षताही प्रत्येकाने घ्यायला हवी. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्वसामान्यांना टार्गेट करणे थांबवावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न: निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राबाबत काय वादग्रस्त विधान केले?
    उत्तर: त्यांनी "तुम्ही कुणाची भाकरी खाताय?" असे म्हणत मराठी माणसांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले.

  • प्रश्न: दुबेंच्या विधानांमागे कोणता राजकीय हेतू दिसतो?
    उत्तर: बिहार निवडणुकीसाठी हिंदी भाषिकांच्या सहानुभूती मिळवण्याचा उद्देश दिसतो.

  • प्रश्न: त्यांनी कोणत्या इतर भाषिक समूहांना लक्ष्य केले?
    उत्तर: त्यांनी तमिळ-तेलुगू भाषिकांना देखील आक्षेपार्ह आव्हान दिले.

  • प्रश्न: राज ठाकरे यांची भूमिका काय आहे?
    उत्तर: त्यांनी हिंदी भाषेला विरोध नसून, पहिलीपासून सक्तीला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT