Pankaja Munde and Vinod Tawde  File Photo
विश्लेषण

भाजपची राष्ट्रीय रणनीती ठरवण्याची बैठक अन् पंकजा मुंडेंसह तावडेंची हजेरी

देशातील पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या (BJP) कार्यालय प्रमुखांची मॅरेथॉन बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप आखण्यात आला. केवळ उत्तर प्रदेशच (Uttar Pradesh) नव्हे तर गोवा (Goa) आणि उत्तराखंडवर (Uttarakhand) विशेष भर देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या बैठकीला राज्यातून पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), सुनील देवधर (Sunil Devdhar), विजया रहाटकर (Vjaya Rahatkar) आदी सहभागी झाले होते. 

उत्तर प्रदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका आहेत. भाजपच्या दृष्टीने हे राज्य अतिशय महत्वाचे आहे. याच बरोबरीने भाजपची सत्ता असलेले गोवा आणि उत्तराखंड या राज्यांकडे दुर्लक्ष करणे भाजपला परवडणार नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना बैठकीत या गोष्टीची जाणीव करून दिली. मोदी सरकारच्या योजना चांगल्या असल्याचे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे महत्व त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. काँग्रेस कालबाह्य होत चालल्याचा निष्कर्षही या बैठकीत नड्डा यांनी काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशाबाबत योजना आखली आहे. राजनाथसिंह, नड्डा, बी.एल. संतोष आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मदतीने आगामी काळात उत्तर प्रदेशात प्रचाराची भक्कम आखणी करण्यात येणार आहे. त्याच्या आधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची दिशा ठरवून देण्यात आली.

पक्षाच्या दिवाळीनंतर होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव तसेच शहा आणि मोदी यांची भाषणे यातून आजचा रोडमॅप आणखी स्पष्ट होणार आहे. या बैठकीत मोदी सरकारच्या योजनांचा धडाक्याने प्रचार करण्यास सांगण्यात आले. या योजनांचा फायदा जनतेपर्यंत पोचविण्याची कामगिरी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. विरोधक मोदी सरकारच्या विकासकामांमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोपही  नड्डांनी या वेळी केला.

काँग्रेस जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांपासून तुटल्यानेच सातत्याने कमकुवत होत चालल्याचे निरीक्षण नोंदवून नड्डा यांनी दिला. राजकारणातही कायम प्रासंगिक राहिले पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला. चालू काळातील मुद्दे वेळच्या वेळी जनतेसमोर मांडले नाहीत तर मोठे पक्षही कालबाह्य होतात हे भाजप कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT