PM Modi, Rahul Gandhi Sarkarnama
विश्लेषण

PM Modi vs Rahul Gandhi : भाजपच्या 'त्या' विजयात काँग्रेसला दिसू लागला आशेचा किरण; राहुल गांधींच देऊ शकतात PM मोदींना टक्कर?

BJP victory news, INDIA alliance crisis : इंडिया आघाडीत सर्व मित्रपक्षांचा भाजपला कडाडून विरोध आहे, तो राज्यांपुरता सीमित न राहता देशपातळीवर दिसायला हवा.

Rajanand More

Congress political strategy : देशाच्या राजकारणात मागील १२ वर्षांत निर्विवादपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा वरचष्मा राहिला आहे. पंतप्रधानांच्या तोडीचा नेता विरोधकांना अद्याप गवसलेला नाही. प्रत्येक निवडणुकी विरोधक एकत्र येण्याचा आव आणतात. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात काँग्रेससह सर्वच पक्षांची ताकद तोकडी असल्याचे दिसते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण सत्ता काबीज करण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही. मित्रपक्षांमधील हेवेदावे आणि मोदींना टक्कर देणारा नेत्यावरूनच आघाडीत उघड मतभेद, ही त्यामागची काही कारणे सांगता येतील.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे. पण आतापासूनच या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणीभूत पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरला आहे. बंगालमधील भाजपच्या विजयात काँग्रेसला आशेचा किरण दिसू लागला आहे. तमिळनाडूमध्ये डीएमकेचा पराभव अन् विजय यांचा उदय तर केरळात मिळालेल्या सत्तेमुळे काँग्रेसचे नेते हुरळून गेले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले आहे. मित्रपक्षांचा होत असलेल्या पराभवातच काँग्रेसची हित दडल्याचे नेत्यांना वाटू लागले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेत इंडिया आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. पण अर्ध्यातूनच ते भाजपसोबत गेले. बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही आघाडीत फारशा रमल्या नाहीत. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसला फारसा भाव दिला नाही. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे एकमेव नेते राहुल हे पंतप्रधानपदाचे उमेदावर असण्यावर सकारात्मक होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही राहुल यांच्या प्रमोशनवर भाष्य केले नव्हते. महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनही त्यावर थेट भाष्य करणे टाळले होते.

इंडिया आघाडीतील प्रत्येक मित्रपक्ष त्यावेळी आपआपल्या राज्यात ताकद टिकवून होते. लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उरलीसुरली ताकदही हिरावून घेतली. अपवाद केवळ अखिलेश यादव ठरले. केजरीवाल, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, तेजस्वी यादव यांच्या पक्षांचा पराभव झाला. आता केवळ उत्तर प्रदेशचा निकाल बाकी आहे. लोकसभा निवडणुकीत अखिलेश आणि राहुल या जोडीने कमाल केली होती. विधानसभा निवडणुकीतही अखिलेश यांनी भाजपला हिसका दाखविल्यास राहुल यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरू शकते. पण सध्या योगी आदित्यनाथ यांच्या कामाचा धडका आणि मोदींचा करिष्मा पाहता लोकसभेची पुनरावृत्ती होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

उत्तर प्रदेशात अखिलेश यांना अपेक्षित यश न मिळाल्यास तसेच पंजाबमध्येही आपची जादू न चालल्यास खरंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी ही जमेची बाजू ठरू शकते. असे निकाल लागल्यास संपूर्ण देशात केवळ जम्मू आणि काश्मीर वगळता इंडिया आघाडीतील एकाही प्रादेशिक पक्षाची कोणत्याही राज्यात सत्ता नसेल. इंडिया आघाडीत केवळ काँग्रेस हाच भाजपला टक्कर देणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष उरले. राहुल गांधी त्यावरच वारंवार जोर देतात. केवळ काँग्रेसलच भाजपला पराभूत करू शकते, असे राहुल गांधी सांगतात. इथेच राहुल गांधी यांचा नव्याने उदय होऊ शकतो. मित्रपक्षांची ताकद कोणत्याच राज्यात शिल्लक न राहिल्यास देशपातळीवरील विरोधकांचा एकमेव नेता म्हणून राहुल गांधी यांच्या बाजूने उभे राहण्याशिवाय किंवा त्यांना विरोध न करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसेल.

इंडिया आघाडीत सर्व मित्रपक्षांचा भाजपला कडाडून विरोध आहे, तो राज्यांपुरता सीमित न राहता देशपातळीवर दिसायला हवा. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपआपल्या राज्यात भाजपला प्रत्यु्त्तर देण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावेल. पण देशपातळीवर विरोधकांचा एकत्रित आवाज दिसल्याशिवाय आणि राज्याराज्यांमध्ये तसा संदेश गेल्याशिवाय आघाडी भाजपला रोखू शकत नाही, याची जाणीव या पक्षांनाही आहे. सर्व पक्षांनी राहुल गांधी यांच्याकडे आघाडीचे नेतृत्व दिल्यास आपल्या मतदारांपर्यंत ते सकारात्मक राजकारणाचा संदेश पोहचवू शकतात. काठावरील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठीही विरोधकांना अशी एकी दाखवावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT