The 2022 Shiv Sena split significantly altered Maharashtra's political landscape, opening new opportunities for BJP in several traditional Sena strongholds. Sarkarnama
विश्लेषण

BJP Vs Shivsena : भाजपनं खरंच शिवसेनेचं मुंडकं कापलंय! मुंबई, कोकण ते मराठवाड्यात 'कमळाचा' विस्तार; ठाण्यात एकनाथ शिंदेंनाही हादरे

BJP Vs Shivsena : २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली. मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात भाजपने संघटनात्मक ताकद वाढवत शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये प्रभाव निर्माण केला आहे.

Hrishikesh Nalagune

BJP Vs Shivsena : "शिवसेनेचे दोन तुकडे करत हातपाय तोडले. हळूहळू भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आमचे भविष्य काय असेल हे पाहायला ज्योतिषाकडे जायची गरज नाही. कालचे भाजप नेते शिवसेना कमकुवत करण्याचं काम करत आहेत, अशा उद्विग्न भावना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केल्या.

सत्तार यांनी उघडपणे या भावना व्यक्त केल्या असल्या तरी 3 वर्षांपासून दोन्ही शिवसेनेतील नेते, कार्यकर्ते खाजगीमध्ये अशाच भावना व्यक्त करत आहेत. भाजपकडून तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जात आहे, भाजपकडून आमची ताकद कमी केली जात आहे, असे आरोप आहेत. याला कारणेही तशीच आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात 'शिवसेना' आणि 'बालेकिल्ला' हे समीकरण 3 दशके अभेद्य होते. मात्र, २०२२ मधील ऐतिहासिक फुटीनंतर शिवसेना दोन गटांत विभागली गेली. या फुटीमुळे तयार झालेल्या राजकीय पोकळीचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पक्षाने उठवला आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाडा या शिवसेनेच्या मुख्य शक्तीस्थानांवर भाजपने अत्यंत पद्धतशीरपणे आपली पकड मजबूत केली आहे.

१. मुंबई महानगरपालिका : शिवसेनेच्या 'लाईफलाईन'ला सुरुंग

मुंबई हा शिवसेनेचा सर्वात मोठा आर्थिक आणि राजकीय कणा आहे. गेल्या अडीच दशकांपासून मुंबईवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते. पण २०१४ पासून आक्रमक राजकारण करत असलेल्या भाजपने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ८२ जागा जिंकत शिवसेनेला धोक्याची घंटा दिली होती. त्यानंतरच्या काळात आशिष शेलार आणि किरीट सोमैया यांच्या माध्यमातून भाजपने मुंबई महापालिकेतील 'कथित भ्रष्टाचाराची' प्रकरणे लावून धरली. कॅग (CAG) ऑडिट, हजारो कोटींच्या कामांची चौकशी यांमुळे शिवसेनेची कोंडी झाली.

अशात शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईतील अनेक माजी नगरसेवक आणि तळागाळातील शाखाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. यामुळे मुख्य शिवसेनेची ताकद दोन गटात विभागली गेली. याच संधीचा फायदा घेत भाजपने आक्रमक मुंबईकर कार्ड आणि 'कथित भ्रष्टाचाराचे' मुद्दे लावून धरले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने मुंबईतील मराठी बहुल वॉर्डांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने उद्धव ठाकरे यांच्या पारंपरिक मतपेढीला मोठे खिंडार पाडले. मुंबईत भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. २२७ जागांपैकी भाजपने तब्बल ८९ जागांवर विजय मिळवला आणि महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाली.

२. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा): 'हिंदुत्वाच्या' गडावर कमळाचा ताबा

मुंबईनंतर १९९० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मराठवाड्यात विस्तार झाला. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव या जिल्ह्यात शिवसेनेने 'हिंदुत्वाचा' अजेंडा राबवून सत्ता मिळवली. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकत होता. पण शिवसेनेच्या फुटीनंतर येथील आजी-माजी आमदार, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदेंकडे गेले.

दोन्ही शिवसेनेच्या या वादात भाजपने 'शहरांच्या नामांतराचे' क्रेडिट स्वतःकडे घेत हिंदू मतांचे ध्रुवीकरण केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही शिवसेनेच्या मतविभागणीचा फायदा घेत मराठवाड्यात भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आज महापालिका, जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत सध्या भाजप बहुमतासह सत्तेत आहे. शिवसेनेकडे असलेली जिल्हा बँकेसारख्या इतर संस्थाही ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

३. छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद मतदारसंघ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद मतदारसंघही शिवसेनेकडेच होता. २०१९ मध्ये अंबादास दानवे इथून आमदार होते. पण 2025-26 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगरपालिका, जालना जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये वाढलेल्या ताकदीच्या जोरावर भाजपने यंदा विधानपरिषद मतदारसंघ यंदा आपल्याकडे खेचून घेतला आहे.

४. कोकण : शिवसेनेचा पाया उखडला

कोकण हा शिवसेनेचा सर्वात निष्ठावान बालेकिल्ला मानला जायचा. पण नारायण राणे आणि त्यांच्या मुलांच्या माध्यमातून भाजपने कोकणात थेट शिवसेनेलाच लक्ष्य केले. नारायण राणे यांना राज्यसभा खासदारकी आणि केंद्रात मंत्रिपद देऊन भाजपची ताकद वाढवली. नितेश राणे, निलेश राणे यांना भाजपमध्ये घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर कोकणातील दीपक केसरकर, उदय सामंत, राजन साळवी, रामदास कदम यांच्यासारखे बडे नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले. यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद कमकुवत झाली.

भाजपने याचा फायदा घेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट भाजपचे वर्चस्व आणले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. नितेश राणे मंत्रीपद आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री देण्यात आले. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. थोडक्यात कोकणातील तिन्ही जिल्ह्यात शिवसेनेचा एकही खासदार नाही. रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असली, तरी संपूर्ण कोकण पट्ट्यात 'नंबर वन'चा पक्ष बनण्यात भाजप यशस्वी ठरला आहे.

५. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली: शिंदेंचा गड, पण भाजपचा छुपा विस्तार

ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेना आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे साम्राज्य होते. बंडानंतर हा जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्य बालेकिल्ला बनला. आज ठाण्यात उद्धव ठाकरे यांची ताकद जवळपास संपुष्टात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभेचे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेवरही शिवसेनेची सत्ता आहे. पण महायुतीमध्ये एकत्र असतानाही भाजपने ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या प्रभावाला समांतर ताकद निर्माण केली आहे.

कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर भागात भाजपने आपले नगरसेवक आणि संघटनात्मक बांधणी एवढी मजबूत केली आहे की, अनेक जागांवर शिंदेंच्या शिवसेनेला भाजपवर अवलंबून राहावे लागत आहे. कल्याण महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा फरक आहे. म्हणजेच, ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद संपवून भाजपने शिंदेंच्या सोबतीने आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याचीच घंटा आहे.

भाजपची प्रमुख रणनीती काय होती?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पारंपरिक मराठी आणि हिंदुत्ववादी मते ही एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात विभागली गेली. मते विभागल्यामुळे ठाकरेंचे अनेक पारंपरिक गड भाजपला सहज जिंकता आले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन चालताना, जागावाटपात आणि निधी वाटपात भाजपने नेहमीच वरचष्मा ठेवला. शिंदेंच्या पक्षाला ताकद देतानाच, भाजपने त्यांच्याच मतदारसंघात आपले स्वतंत्र केडर उभे केले.

मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांचा प्रचार करताना भाजपने स्वतःला मुख्य चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले, ज्यामुळे दोन्ही शिवसेनेचा पारंपरिक मतदार भाजपच्या विकासाच्या राजकारणाकडे आकर्षित झाला.

एकूणच शिवसेनेतील अंतर्गत युद्धाचा सर्वाधिक राजकीय फायदा भाजपने उठवला आहे. जिथे ठाकरे मजबूत होते, तिथे शिंदेंच्या मदतीने खिंडार पाडले आणि जिथे शिंदे मजबूत आहेत, तिथे सत्तेच्या बळावर भाजपने स्वतःची ताकद दुप्पट केल्याचे दिसून येते. यामुळेच आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले 'कमळमय' होताना दिसत आहेत. यातूनच शिवसेनेचे सत्तार हे उघडपणे तर अनेक नेते खाजगीमध्ये भाजप शिवसेनेचं मुंडकं छाटतोय अशी भावना व्यक्त करतायत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT