Solapur Market Committee elections sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आले एकत्र; लोकहो, आता आणखी काही पाहायचे राहिले?

Solapur Market Committee elections : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. एखाद्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपचे एकत्र येणे, हे सध्याच्या परिस्थितीत विचित्र वाटते.

अय्यूब कादरी

Solapur News : अय्यूब कादरी

राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो... अशी वाक्ये सतत कानावर पडतात. गेल्या पाच-सहा वर्षांतील राज्यातील राजकीय घडामोडी याची साक्ष देणाऱ्याच आहेत. सध्या भाजप आणि काँग्रेस या पक्षांत सध्या कमालीचे राजकीय वैर निर्माण झालेले आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विखारी टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्या दृष्टीने समाजातही उभी फूट पडली आहे. कार्यकर्ते, समर्थक टोकाची भूमिका घेत एकमेकांचे अक्षरशः कपडे फाडत असतात.

आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सत्ताप्राप्ती हे राजकारणाचे अंतिम ध्येय असते. यासाठी भाजपकडून हिंदुत्वावादी विचारसरणीचा, तर काँग्रेसकडून धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पुरस्कार केला जातो आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विचारधारेवर ठाम आहेत. हा संघर्ष देशभरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाजमन कलुषित झालेले आहे. विचाराधारांतील या संघर्षाने गंभीर वळण घेतले आहे. एकमेकांवर टीका करताना मर्यादा, पातळी सोडली जात आहे. विचारांसाठीच आपण राजकारण करतो, असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातो आहे.

मात्र दोन्ही पक्षांचा हा दावा खोटा असतो, याची कल्पना बहुतांश लोकांना असते. तरीही असे लोक आपल्या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या पक्षाच्या बाजूने उभे राहतात. काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण केले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच केला आहे. भाजपला राज्यघटना मोडीत काढायची आहे, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप आणि काँग्रेस मिळून लढवणार आहेत. हे धक्कादायक, आश्चर्यकारक आहे. दोन्ही पक्षांच्या तथाकथित नैतिकतेचे वाभाडे काढणारे आहे.

विचारांसाठी एखादा पक्ष राजकारण करत असेल का, याबाबत साशंकताच आहे. सत्ता हे पक्षांचे अंतिम ध्येय असते, स्वकल्याण हे नेत्यांचे अंतिम ध्येय असते. कुठे आहे भाजपचा हिंदुत्त्ववाद? कुठे आहे काँग्रेसची धरमनिरपेक्षता? सत्तेसमोर सर्वकाही गौण आहे. आपापल्या पक्षांच्या विचारसरणीचे समर्थन करण्यासाठी समाजमाध्यमांत आणि प्रत्यक्षात जमिनीवर धुमाकूळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी ही बाब नीट समजून घेतली पाहिजे. आपले इप्सित साध्य करण्यासाठी नेतेमंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे.

सहकार क्षेत्रातील निवडणुका बहुतांश वेळा पक्षविरहित होत असतात, हे मान्य. काही नगरपालिकांमध्ये यापूर्वीही भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत, हेही मान्य. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत या दोन पक्षांचे एकत्र येणे धक्कादायक आहे. विरोधी पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेसने बाजार समिती निवडणुकीसाठी एकत्र येत आश्चर्यकारक पायंडा पाडला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष, अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि काँग्रेसचे नेते, माजी आमदार दिलीप माने यांच्या पुढाकाराने या दोन पक्षांची आघाडी झाली आहे. आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापुरातील भाजपचे बडे नेते समजले जातात. काँग्रेसला सोबत घेताना आमदार कल्याणशेट्टी यांनी दोन्ही देशमुखांना विश्वासात घेतले नाही का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आपण काँग्रेसला सोबत घेतले आहे, असेही आमदार कल्याणशेट्टी म्हणाले आहेत.

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांनी भाजप आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे, असे कल्याणशेट्टी म्हणाले आहेत. त्यानुसार आता कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकमेकांचे तोंड न पाहणारे कार्यकर्ते आता एकत्र येऊन लढत असल्याचे चित्र सोलापुरात दिसणार आहे.

काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना, हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे, शिवसेनेचे अनेक नेते सातत्याने करत असतात. आता सोलापूर बाजार समितीत जे घडत आहे, त्यावर या नेत्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच आपण सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती केली आहे, असे आमदार कल्याणशेट्टी म्हणाले आहेत, ही विचार करण्यासारखी बाब आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप-काँग्रेसचे हे पॅनेल काम करणार आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने म्हणाले आहेत. या प्रक्रियेत दोन्ही देशमुख सहभागी नाहीत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे काही दिवसांपूर्वी दिलीप माने यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते, हेही येथे लक्षात घ्यायला हवे. माजी मंत्री असलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना बाजूला सारण्याचा भाजपकडून प्रयत्न होतो आहे का, अशीही चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सोलापूरची बाजार समिती अत्यंत महत्वाची आहे. कांदा, मिरची, द्राक्षे, मनुके, भरडधान्य, भाजीपाला आदींची या बाजार समितीत मोठी आवक होते. कांद्याच्या आवकेत सोलापूर बाजार समितीने अनेकवेळा लासालगाव बाजार समितीला मागे टाकले आहे. सोलापूर बाजार समितीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. निव्वळ नफा 100 ते 150 दीडशे कोटी रुपये आहे. आमदार कल्याणशेट्टी म्हणतात तसे ही निवडणूक खरेच कार्यकर्त्यांसाठी लढली जाणार आहे का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपक्षेता एकत्र आले, की स्वार्थ एकत्र आला, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT