BJP Maharashtra Sarkarnama
विश्लेषण

BJP Pune Convention : 'चिंतन' अधिवेशन की विधानसभा निवडणुकीची 'चिंता'?

Sandeep Chavan

Maharashtra BJP and Vidhan sabha Election 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात दोन वरून एका आकड्यावर आली. 2019 ला 25 पैकी 23 जागा जिंकलेल्या भाजपला 2024 च्या लोकसभेत 28 जागा लढूनही फक्त 09 जागा जिंकता आल्या. 19 जागांवर नुकसान सोसावं लागलेल्या भाजपला आता विधानसभेची 'चिंता' सतावू लागल्यानं 'चिंतन' अधिवेशन घेण्याची गरज भासली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कुठं पडझड झाली हे आधी समजावून घेऊ...

मराठवाड्यात भाजपचा स्कोअर 'शून्य'!

मराठवाडा विभागातील एकूण 08 लोकसभा मतदारसंघांपैकी लढवलेल्या 04 ही जागांवर भाजपला नामुष्कीजनक पराभव पाहावा लागला. जालन्यातून सलग 05 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या रावसाहेब दानवेंसारख्या(Raosaheb Danve) दिग्गजाला, तर एकेकाळी राज्याच्या मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांनाही बीडमधून पराभूत व्हावं लागलं. लातूर, नांदेड या स्वत:च्या जागा देखील भाजपला गमवाव्या लागल्या. त्यामुळं यंदाच्या लोकसभेला मराठवाड्यात भाजपचा स्कोअर 'शून्य' राहिला.

विदर्भात होत्याचं नव्हतं झालं...

विदर्भातील एकूण 10 लोकसभा मतदारसंघांपैकी 07 जागा लढूनही भाजपच्या हाती केवळ अकोला आणि नागपूर या 02 जागा लागल्या. नवनीत राणा यांना पक्षाचं तिकीट देऊनही राणांची जादू चालली नाही. चंद्रपुरात तर सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) या विद्यमान मंत्र्यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. इतकंच नव्हे तर वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर हे हातचे मतदारसंघही गमवावे लागले. त्यामुळं विदर्भात भाजपचं होत्याचं नव्हतं झालं.

पश्चिम महाराष्ट्रात थोडी 'खुशी' नि जास्त 'गम'!

पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 लोकसभा मतदारसंघांपैकी 05 जागा लढल्या खऱ्या पण त्यातल्या 03 जागा गमवाव्या लागल्या. पुण्यासह साताराही जिंकला खरा पण सोलापूर, सांगलीसह माढा गमवावा लागला. 02 आल्या नि 03 गेल्या या परिस्थितीमुळं पश्चिम महाराष्ट्रात भाजपची थोडी 'खुशी' नि जास्त 'गम' अशी अवस्था झाली.

उत्तर महाराष्ट्रात 04 जागांचं नुकसान

उत्तर महाराष्ट्रातील एकूण 08 लोकसभा मतदारसंघांपैकी 06 जागा लढूनही भाजपला 04 जागी पराभव स्वीकारावा लागला. जळगाव आणि रावेर सोडल्यास भाजपच्या वाट्याला फारसं काही आलं नाही. 2019 च्या लोकसभेला जिंकलेल्या दिंडोरी, नंदुरबार, धुळे, नगर दक्षिण या 04 ही जागा भाजपच्या हातून निसटल्या. या ठिकाणी चारही विद्यमान खासदारांचा पराभव झाला. त्यात डॉ. भारती पवार(Bharti Pawar) आणि सुभाष भामरे या दोन केंद्रीय राज्यमंत्र्यांचाही समावेश होता. त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात भाजपचं 04 जागांचं नुकसान झालं.

मुंबईतला 'तो' पराभव जिव्हारी!

मुंबईतील एकूण 06 लोकसभा मतदारसंघांपैकी 03 जागा लढवल्या पण जिंकता आली फक्त एकच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जिंकले मात्र मोठा गाजावाजा करत भाजपच्या तिकीटावरून लढलेले प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम मात्र हरले. हाच मुंबईतला पराभव मात्र भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला.

भिवंडी गेली, केंद्रीय राज्यमंत्री हरले!

कोकण, ठाणे आणि पालघरमध्ये लढलेल्या 03 लोकसभा मतदारसंघांपैकी 02 जागा जिंकल्या मात्र भिवंडी गेली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग सर केला, आयत्या वेळचा उमेदवार देऊन पालघरचीही जागा ताब्यात घेतली मात्र कपिल पाटील यांना भिवंडी काही परत मिळवता आली नाही. त्यामुळं भिवंडी गेली, केंद्रीय राज्यमंत्री हरले, अशी भाजपची स्थिती झाली.

विधानसभेला भाजपच्या कपाळी लागणार का यशाचा बुक्का?

बालेवाडीत होत असलेल्या या एकदिवसीय अधिवेशनास दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन म्हणजे मागच्या चुका टाळून पुढं कशी वाटचाल करायची याची रणनीती आखणार असेल, असं वरकरणी का होईना दिसून येत आहे. भले, अजून विधानसभा निवडणूक घोषित झाली नसली तरी तिच्या आखाड्यात उतरणारे आपले पहिलवान कुस्ती कशी मारतील याचं प्रशिक्षण देणारं आणि त्यांना खुराक पुरवणारं असेल, हे नक्की! अर्थात, लोकसभेला माथी बसलेला अपयशाचा शिक्का पुसून काढत आगामी विधानसभेला भाजपच्या कपाळी यशाचा बुक्का लागणार का, या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारा काळच देईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT