Milind Deora, Rahul Narwekar  Sarkarnama
विश्लेषण

Bjp News : भाजपचे एका दगडात दोन पक्षी : देवरा राज्यसभेत, नार्वेकर लोकसभा मैदानात!

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai News : भाजपने लोकसभा निवडणुकीची किती जोरदार तयारी केलीय ती आता उमेदवार जाहीर करताना दिसून येत असून, दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. या आदेशाने भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांना आधी शिवसेनेत घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाग पाडले आणि त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवले. आता राहुल नार्वेकर यांना लोकसभेसाठी उतरवत देवरा यांच्या मदतीने भाजपकडे जागा खेचून आणण्याचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, यासाठी त्यांनी एकूण 543 जागांवर आपली काय ताकद आहे, याचा गेले दोन एक वर्षे बारीक अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा मिशन 370 सुद्धा निश्चित करताना या जागा हमखास जिंकणार, असा त्यांचा ग्राउंड रिपोर्ट तयार असल्याचे समजते. यात दक्षिण मुंबईची जागा येते. देवरा यांनी काँग्रेस सोडण्याची तयारी केल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मदतीने भाजपचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यांची भेट झाल्याचे कळते. (Bjp News)

या भेटीत दक्षिण मुंबईची तयारी झाली. तुम्ही आमचेच, पण भाजपमध्ये थेट यायचे नाही, जायचे शिंदे शिवसेनेत. तुमची राज्यसभा पक्की. यानिमित्ताने दाखवायला तुम्ही शिवसेनेचे. यामुळे शिंदे सेनेला मानणारा मतदार भाजपला मतदान करेल, वर भाजपची मते नार्वेकर यांना पक्की असतील.

मिशन लोकसभा 370 चे गणित अशा या डावपेचात आहेत. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना पराभूत करण्यासाठी भाजपची ही रणनीती किती यशस्वी होते, हे आता संमिश्र लोकवस्तीचे मतदार ठरवणार आहेत. एक मात्र तितकेच खरे आहे, की देवरा जरी शिंदे शिवसेनेकडे गेले असले तरी त्यांच्या मागोमाग काँग्रेसला मानणारा वर्ग हललेला नाही. विशेष म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघाचा कानोसा घेतला असता मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. यामुळे भाजपला वाटते तितकी ही लढत सोपी नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू झाली असून, नार्वेकर हे आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात फोडणार आहेत.नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत दोनदिवसीय वार्डनिहाय दौरा नियोजित आहे. ते वरळीत शनिवारी सकाळी 11 वाजता वॉर्ड क्रमांक 193 ला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:40 वाजता वॉर्ड क्रमांक 196 कार्यालयास भेट देणार आहेत. दुपारी १२:२० वाजता वॉर्ड क्रमांक १९५ला नार्वेकर यांची भेट असेल. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) स्थानिक नागरिकांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर वॉर्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकांऱ्यांसोबत संवाद साधतील.

भाजपने या लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देताना अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष भर दिला आहे. ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी भाजपने मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेची साथ घेतली तर नवल वाटायला नको. त्यातच भाजप मनसे (Mns) युतीच्या चर्चांनादेखील काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती.

मनसेच्या साथीने मराठी मते स्वतःकडे वळवण्यास भाजपला मदत होईल. माझगाव, शिवडी, लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे. बाळा नांदगावकर (Bala Nanandgavkar) यांचा मराठी भागात असलेला प्रभाव याचीही भाजपला मदत होऊ शकते.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT