Rahul Gandhi, Amit Shah, Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi : राहुल गांधींचा नवा डाव बेसावध भाजपला पुरता अडकवून टाकणार...

BJP Vs Congress : लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतरही सावध न होता पुन्हा ध्रुवीकरणाचा खेळ खेळणाऱ्या काही कार्यकर्त्यांकडे भाजपने वेळीच सावध होऊन लक्ष दिले नाही. ही संधी साधत राहुल गांधी यांनी भाजपसमोर नवा डाव टाकला आहे. संविधान आणि शिवाजी महाराजांचा संबंध जोडत त्यांनी संविधान नष्ट करण्यासाठी एक विचारधारा कार्यरत असल्याचा आरोप केला.

अय्यूब कादरी

Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने सेट केलेले नरेटिव्ह तोडता तोडता भाजपच्या (BJP) नाकीनऊ आले होते. हे नरेटिव्ह सेट करण्याची संधी भाजपच्या नेत्यांनीच विरोधकांना दिली होती.

त्यापैकी सर्वाधिक परिणामाकरक आणि भाजपसाठी हानिकारक ठरलेला मुद्दा होता संविधान बदलाचा. लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर भाजप राज्यघटना बदलणार, असे नरेटिव्ह विरोधकांनी तयार केले होते.

कर्नाटकमधील भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांचे एक विधान यासाठी कारणीभूत ठरले होते. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्यात, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आणि भाजपला कोंडीत पकडले. या कात्रीत अडकलेली मान भाजपला अखेरपर्यंत सोडवता आली नाही.

आता विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या विरोधात हा मुद्दा तापवला जाणार, असे संकेत लोकसभेतील विरोधी पक्षनते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून मिळाले आहेत. भाजप संविधान बदलणार, असा संदेश गेल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आणि त्याचा फटका भाजपला बसला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा मुद्दा आता मागे पडणार असे वाटत असतानाच भाजपचे तेलंगणातील वादग्रस्त आमदार टी. राजासिंह हे एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले होते.

नेहमीच वादगग्रस्त वक्तव्ये करणारे टी. राजा यांनी पुन्हा भाजपची कोंडी केली. भाजपला 400 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या तर देश हिंदुराष्ट्र झाला असता, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे भाजपच्या विरोधात सेट झालेल्या नरेटिव्हवरील धूळ पुन्हा एकदा झटकली गेली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच जाहीर सभांमध्ये राहुल गांधी यांनी संविधानाची छोटी प्रत हातात घेऊनच भाषणे केली होती.

भाषणांदरम्यान ते संविधानाची प्रत उपस्थित लोकांना दाखवायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आपल्याला संरक्षण करायचे आहे, अशी साद ते लोकांना घालायचे. राहुल गांधी यांच्या हस्ते आज (5 ऑक्टेबर) कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान यांचा कसा थेट संबंध आहे, हे उलगडून सांगितले.

राहुल गांधी यांनी नव्याने टाकलेला हा डाव भाजपसाठी किती अडचणीचा ठरणार, हे नजीकच्या काळात दिसून येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितले ते 21 व्या शतकात संविधानात जसेच्या तसे आहे, असे सांगत त्यांनी शिवरायांची दूरदृष्टी अधोरेखित केली आणि हे संविधान नष्ट करण्यासाठी एक विचारधारा कार्यरत आहे, असे सांगितले. संविधान हे शिवरायांच्या विचारांचे चिन्ह आहे, असेही ते म्हणाले.

शिवाजी महाराजांना छत्रपती बनण्यापासून ज्यांनी रोखले, तेच आज आज संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आले नाही, याचाही उल्लेख राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा त्यांना संविधानाबाबत द्यायचा तो संदेश दिला.

राहुल गांधी यांनी संविधान बदलासह शिवरायांचे विचारही भाजपला नष्ट करायचे आहेत, अशी टीका केली. राज्यात आज परिस्थिती काय आहे? ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे काही वाचाळवीर समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. प्रार्थनास्थळांत घुसून मारण्याची भाषा करत आहेत.

शिवरायांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन कारभार केला. त्यांनी कोणावरही अन्याय केला नाही, हे सर्वश्रुत आहे. राज्यघटनाही तेच सांगते. त्यामुळे राहुल गांधी यांनी शिवरायांचे विचार राज्यघटनेच्या माध्यमातून जिवंत आहेत आणि ती राज्यघटना एक विचारधारा म्हणजे भाजप नष्ट करू इच्छिते, अशी टीका केली आहे. लोकसभेला बसलेल्या धक्क्यानंतरही भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सुधारणा झालेली दिसत नाही. महाराष्ट्रात शांतता हवी आहे, विकास हवा आहे, सलोखा हवा आहे, पक्षांची फोडाफोडी नको आहे, असा संदेश मतदारांनी दिला आहे.

असे असतानाही भाजपचे दिल्लीतील नेतेही पुन्हा फोडाफोडीची, ध्रुवीकरणाची भाषा करत आहेत. राज्यातील वरिष्ठ आणि लहान नेतेही ध्रुवीकरणाची भाषा बोलत आहेत. ही संधी साधून राहुल गांधी यांनी नेमका प्रहार केला आहे. राहुल गांधी जे बोलले ते लोकांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे. भाजप हे नरेटिव्ह कसे तोडणार, कोंडी कशी फोडणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सेट केलेले नरेटिव्ह तोडण्यातच भाजपचा सर्वाधिक वेळ खर्ची झाला होता. कधी नव्हे ते पहिल्यांदा भाजपच्या बाबतीत अशी परिस्थिती उद्भवली होती. यापूर्वी भाजप नरेटिव्ह सेट करायचा आणि विरोधक त्यांच्या मैदानावर जाऊन खेळायचे. आता उलटे झाले आहे. विरोधक नरेटिव्ह सेट करत आहेत आणि भाजप त्यात अडकून पडत आहे.

राहुल गांधी यांनी आज जो नरेटिव्ह सेट केला आहे, ती संधीही भाजपनेच उपलब्ध करून दिली आहे. अतंर्गत कलहामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष हैराण आहेत. त्यातच आता हा नवा नरेटिव्ह त्यांच्यासोमर आ वासून उभा राहणार आहे. भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःवर आवर घातला असता, वाचाळवीरांना आवरले असते तर त्यांच्यासमोर नवा डाव टाकण्याची संधी राहुल गांधी यांना मिळाली नसती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT