Ajit Pawar, Eknath Shinde sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde and Ajit Pawar News : 'मोठ्या भावा'मुळे मुख्यमंत्र्यांसमोर बंडखोरीचे, तर अजितदादांसमोर घर शाबूत ठेवण्याचे आव्हान!

अय्यूब कादरी

Mahayuti and Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ राहणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीतील यशाच्या 'स्ट्राइक रेट'नुसार जागावाटप होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागे म्हणाले होते. याचा अर्थ असा की शिंदे गटाच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. इच्छुकांची संख्याही वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने(Shivsena) 15 जागा लढवल्या आणि 7 जिंकल्या. भाजपने 28 जागा लढवून 9 जिंकल्या. चार जागा लढवलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक उमेदवार विजयी झाला. 'स्ट्राइक रेट'चे गणित लावले तर मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष सरस ठरला आहे. त्यामुळे साहजिकच विधानसभेच्या अधिक जागांवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. भाजप 160 जागा लढवणार, असे सांगतिले जात आहे. असे झाले तर उर्वरित 128 पैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार, असा प्रश्न आहे. जागा कमी मिळाल्या तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत बंडखोरी बोकाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजितदादा पवार(Ajit Pawar) यांची परिस्थिती जागावाटपाच्या आधीच बिकट झाली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीतू बाहेर काढणार, अशी कुजबूज मोहीम राबवून त्यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न झाला. कमी जागा मिळतील, त्यावर समाधानी राहावे लागेल, असा अप्रत्यक्ष संदेश राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. तिकडे, शरद पवार यांनी अजितदादा पवार यांच्या आमदारांना धडकी भरवली आहे. शरद पवार यांनी अजितदादांच्या काही आमदारांच्या घरात सुरूंग पेरले आहेत. अशा तऱ्हेने अजितदादा पवार हे दोन्ही बाजूंनी संकटात सापडले आहेत. जागा कमी मिळाल्या तर त्यांचे अनेक आमदार शरद पवार यांच्या आश्रयाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात मुख्यमंत्री शिंदे यांना नमते घ्यावे लागले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही भाजपकडून निश्चित केले जात होते. भाजपचा हा अट्टाहास महायुतीच्या अंगलट आला. जाहीर केलेली उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे यांना बदलावी लागली होती. काही विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारावी लागली होती. यामागे भाजपचा अट्टाहास होता. तथाकथित सर्व्हेक्षणांतील निकष पुढे करत शिवसेनेच्या खासदारांविरोधात नाराजी असल्याचे कारण भाजपने समोर केले होते. 'मिशन 45' गाठण्यासाठी म्हणजे, राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व सूत्रे आपल्याकडेच केंद्रीत केली होती.

आता विधानसभेला त्या यशाची पुनरावृत्ती नाही झाली तर... -

भाजपच्या अशा भूमिकेमुळे शिवसेनेत नाराजी निर्माण झाली होती. या बाबींना कंटाळून मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) हे एके दिवशी काही तास 'नॉट रिचेबल' झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सावध झाले आहेत. कमी जागांवर तडजोड करणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत. किमान 100 ते 125 जागा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा सर्वाधिक दबाव कुणावर असेल तर तो मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेवर आहे. लोकसभा निवडणुकीने शिंदे यांच्या शिवसेनेला तारले आहे. आता विधानसभेला त्या यशाची पुनरावृत्ती नाही झाली तर शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांचे भवितव्य टांगणीला लागणार आहे.

विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, असे असतानाही... -

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. विदर्भात केलेल्या सर्व्हेक्षणात हे 24 मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत, असा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा दावा आहे. विदर्भात लोकसभेचे दहा मतदारसंघ आहेत. यापैकी केवळ तीन मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात भाजपच्या दोन आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली होती. ढासळलेला किल्ला सावरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असताना शिवसेनेचे मंत्री राठोड यांनी 24 जागांवर दावा करत बॉम्ब टाकला आहे.

भाजपच्या(BJP) बालेकिल्ल्यातच शिवसेनेला विधानसभेच्या 62 पैकी 24 जागा हव्या आहेत. याचा अर्थ असा आहे की शिवसेना कमी जागांवर तडजोड करण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही. विशेष म्हणजे, विदर्भात भाजप 'मिशन 45' राबवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकते विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विदर्भातील 62 पैकी 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजप नेत्यांना दिले आहे. आता शिसेनेलाच जर 24 जागा हव्या असतील तर भाजपचे लक्ष्य कसे साध्य होणार? शिवसेना 24 जागांवर अडूनच बसली तर उर्वरित 38 जागांपैकी भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा देणार, असाही पेच निर्माण होणार आहे.

हे येत्या काही महिन्यांत दिसून येणार -

शिवसेना विधानसभेच्या 100 पेक्षा कमी जागा घेणारच नाही, याचे संकेत मिळू लागले आहेत. 288 पैकी 160 भाजप आणि 100 जागा शिवसेना शिवसेना लढवणार असेल तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने करायचे काय? असा पेच निर्माण होणार आहे. त्यावर उपाय म्हणून भाजप आणि शिवसेना काही जागा सोडण्याची तयारी दाखवू शकतात, मात्र त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जागा कमी मिळाल्या तर भाजपमध्येही बंडखोरी उफाळून येऊ शकते. असे असले तरी तुलनात्मक विचार केल्यास भाजपमध्ये शिस्त अद्यापही दिसून येते. पक्षाने आदेश दिला तर तो मान्य करण्याशिवाय नेत्यांकडे पर्याय नसतो. मात्र लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर पक्षश्रेष्ठींचा दरारा कमी झाला आहे की कायम आहे, हे येत्या काही महिन्यांत दिसून येणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचीही पक्षासंघटनेवर मजबूत पकड आहे. एखाद्या नेत्याला शब्द दिला की मुख्यमंत्री शिंदे तो पाळतात, हे त्यामागचे मुख्य कारण आहे. असे असले तरी जागावाटपानंतर बंडखोरी उफाळून आली तर परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या हाताबाहेर जाऊ शकते, कारण विधानसभा निवडणूक शिंदे गटातील नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेनेतून फुटल्यामुळे लोकांची आधीच नाराजी आहे.

उमेदवारी मिळाली आणि पराभव झाला तर एखादेवेळेस चालू शकते, मात्र यावेळी उमेदवारीच नाही मिळाली तर नेत्यांचा विषय कायमस्वरूपी संपण्याचा धोका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत बंडखोरी बोकाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजितदादांच्या समोरही हा धोका आहेच, शिवाय त्यांचे आमदार शरद पवार यांच्याकडे जाण्याचाही जास्तीचा धोका त्यांचा वाट्याला येणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT