Devendra Fadnavis-chandrakant Patil
Devendra Fadnavis-chandrakant Patil Sarkarnama
विश्लेषण

फडणवीसांना त्रास द्याल; तर धडा शिकवला जाईल : भाजप आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पोलिसांच्या बदल्यामधील घोटाळा बाहेर काढल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. उद्या सकाळी ते चौकशीला सामोरे जाणार आहेत. या प्रकरणावरून भाजपने आता रान पेटवायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा देत फडणवीसांना नाहक त्रास द्याल, तर धडा शिकवला जाईल, अशी भाषा केली आहे. फडणवीसांना आलेल्या नोटिशीमुळे एकंदरीतच राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. (Chandrakant Patil's warning to maha Aghadi on notice of Fadnavis)

बदल्यांचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर मुंबई पोलिसांनी ती गोपनीय माहिती तुमच्याकडे कशी आली, अशी माझ्याकडे विचारणा केली आहे. तसेच या माहितीचा स्त्रोत स्पष्ट करण्याचे सांगितले आहे. यापूर्वी त्यांना दोनवेळा नोटीस पाठविण्यात आली होती. उद्या ते चौकशीला सामोरे जाणार आहेत. त्यावरून आता चांगलेच राजकारण रंगले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांवर टीका केली आहे.

पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांतील घोटाळाप्रकरणी CRPC 160 अन्वये दिलेली नोटिस म्हणजे चोर सोडून संन्याशाला...असा हा प्रकार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून असलेल्या विशेषाधिकारांबाबत या सरकारला, राजशिष्टाचार विभागाला काहीच माहिती नाही? की कायदे पाळायचेच नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेषाधिकार असूनही चौकशीला सामोरे जाण्याच्या, प्रश्नांना उत्तरे देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. महाविकास आघाडी सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्ये जपतो, हेच यातून स्पष्ट होते आहे. मुंबईनंतर पुणे पोलिसांनीही अशीच नोटिस काढल्याचं समजतंय. अरे, तुम्ही असं सत्य झाकू शकाल? हे प्रकरण न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यावरही महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकवू शकेल? किती बौद्धिक दिवाळखोरी? आम्ही लोकशाहीसाठी सहकार्य करू तसेच रस्त्यावरही उतरू. चौकशीसाठी बोलावून देवेंद्र फडणवीस यांना नाहक त्रास दिला, तर महाविकास आघाडी सरकारला योग्य धडाही निश्चितच शिकवू, हे नीट लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, फडणवीस हे चौकशीसाठी उद्या सकाळी ‘बीकेसी’मध्ये हजर राहणार होते. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांना ‘बीकेसी’मध्ये येण्याची गरज नसल्याचे सांगून तेच फडणवीसांच्या बंगल्यावर जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT