Sharad Pawar-praful Patel-Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

NCP Crisis : पक्षांतर्गत कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादीची मोठी चलाखी; ना शरद पवार गटाचा व्हीप, ना प्रफुल्ल पटेलांची हजेरी...

सरकारनामा ब्यूरो

Delhi : दिल्ली सेवा विधेयक लोकसभेपाठोपाठ सोमवारी (ता. ८ ऑगस्ट) रात्री उशिरा राज्यसभेत मंजूर झाले. त्या विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत कारवाईचा मुद्दा अत्यंत चलाखीने टाळला आहे. या मतदानासाठी शरद पवार यांच्या गटाकडून कोणताही व्हीप लागू करण्यात आला नव्हता, तर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल हे मतदानावेळी गैरहजर राहिले, त्यामुळे व्हीप आणि त्या अनुंषगाने होणारी कारवाईचा प्रश्नच निर्माण झाला नाही. (Cleverness of NCP to avoid internal party action)

प्रशासकीय बदल्याचा संदर्भातील अधिकार हे जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे अर्थात दिल्ली राज्य सरकारकडे आहेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढत हे अधिकार केंद्राकडेच राहतील, अशी तजबीज केली आहे. दिल्ली सेवा विधेयकावर सोमवारी दिवसभर चर्चा झाली.

चर्चेनंतर रात्री उशिरा मतदान घेण्यात आले. त्यात विधेयकाच्या बाजूने १३१, तर विरोधात १०२ मते पडली, त्यामुळे सरकारने हे विधेयक बहुमताने मंजूर झाले. लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक आणि अविश्वास प्रस्तावाच्या मतदानावेळी बहुतांश पक्षांकडून व्हीप काढण्यात येतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अर्थात शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सोमवारी कोणताही व्हीप काढण्यात आलेला नव्हता. विशेष म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे खासदार प्रफुल्ल पटेलही (Prafull patel) त्या मतदानावेळी हजर राहिले नव्हते.

शरद पवार गटाकडून व्हीप काढण्यात आला असता तर प्रफुल्ल पटेल यांना मतदानासाठी हजर राहावे लागले असते. त्यांनी विरोधात मतदान केले असते तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली असतील, त्यामुळे मतदानावेळी प्रफुल्ल पटेल हे गैरहजर राहिले होते. शरद पवार गटाकडूनही व्हीप काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट जर एकमेकांच्या विरोधात बोलत असले तरी कागदोपत्री मात्र तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असेच धोरण पक्षाचे आहे.

निवडणूक आयोगात दाखवली हुशारी

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा करण्यात आलेला आहे. त्याबाबतचे उत्तर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाकडे मागण्यात आले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही’, असे उत्तर शरद पवार गटाकडून देण्यात आलेले आहे, त्यामुळे कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी दोन्ही गटांत जबरदस्त अंडरस्टॅंडिग असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT