CM Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अवस्था 'धरलं तर चावतंय सोडलं तर पळतयं' 'हे' नेते कारणीभूत

अय्यूब कादरी

Shivsena Eknath Shinde News : 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' मराठीत अशी एक म्हण आहे आणि ती सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तंतोतंत लागू होत आहे. याला कारणीभूत ठरत आहेत राज्याचे आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत!

सावंत यांच्या वादग्रस्त विधानांची लांबलचक यादी होऊ शकते. ते काय बोलतात, हे त्यांना तरी कळत असेल का? असा प्रश्न सुजाण नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी सावंत यांच्यासह रामदास कदम, आनंदराव अडसूळ, दीपक केसरकर हेही चांगलाच हातभार लावत आहेत.

गेल्या 24 तासांत सावंत (Tanaji Sawant) यांची दोन वादग्रस्त विधाने व्हायरल झाली. त्यांचे बोलणे आणि हावभाव हे सरंजामी थाट दर्शवत असतात. समोरच्याला काहीही कळत नाही, सारे जणू आपल्यालाच कळते, अशा आविर्भावात ते बोलत असतात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवा अर्चनाताई पाटील या 81 हजार मतांनी पिछाडीवर पडल्या.

सावंत यांच्यासाठी हा जबर धक्का होता, तरीही त्यांच्या वागण्या, बोलण्याच्या पद्धतीत बदल झाला नाही. महायुतीतील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते, मात्र त्यामुळे बाहेर आले की उलटी होते, असे वादग्रस्त वक्तव्य सावंत यांनी केले. 'आपल्याला ते पटलेच नव्हते, त्यामुळे मी तुमच्याकडे मत मागायला आलो नव्हतो' असे बोलत असल्याचा सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे विधान लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराशी संबंधित आहे.

सावंत हे आपल्या पुतण्याला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते, मात्र मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आणि भाजपचे (BJP) आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे सावंत नाराज झाले होते. त्यानंतर गावभेट दौऱ्यात प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला 'औकातीत राहायचे', असे सावंत सुनावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

तानाजी सावंत कमी की काय म्हणून रामदास कदम यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ, शिक्षणमंत्री दीपक केसरकर हेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या अडचणीत भर टाकत आहेत. रामदासभाई दोन दिवसांपूर्वी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. तुळजापूर मतदारसंघावर भगवा फडकावा, अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

तुळजापूर मतदारसंघ भाजपकडे असून, राणाजगजितसिंह पाटील आमदार आहेत. रामदासभाईंच्या वक्तव्यामुळे महायुतीत वाद निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्राला भिकेला लावतो, खेकड्यांमुळे धरण फुटले, कोण आहे तो हाफकीन माणूस, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मुत्यूंना अख्खे मंत्रीमंडळ जबाबदार, अशी या आधीची सावंत यांची वादग्रस्त वक्तव्ये आहेत. त्यात गेल्या दोन दिवसांत त्यांनी आणखी भर टाकली आहे.

धाराशिव जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक भाई उद्धवरावदादा पाटील यांचा आहे. या जिल्ह्यातील जुन्या शेतकऱ्यांचा पिंड शेकापचा आहे. सावंत यांनी वाशी तालुक्यात ज्या शेतकऱ्याची औकात काढली, ते जुन्या पिढीतील आहेत. त्यामुळे सावंत यांच्यावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही जुनी पिढी विधानसभेच्या निवडणुकीत सावंत यांना हिसका दाखवणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड राग आहे. त्यातच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे अडसूळ नाराज झाले होते. महायुतीत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये त्यांनी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या वाचाळ नेत्यांना जाहिरपणे समज दिल्याचे ऐकिवात नाही.

त्यामुळे अशा नेत्यांना वादग्रस्त विधाने करण्याची सूट तर देण्यात आली नाही ना, असा समज पसरू लागला आहे. सूट देण्यात आली नसली तरी या नेत्यांना आवरणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी अशक्य अशीच बाब दिसत आहे. या सर्व वाचाळ नेत्यांपैकी कहर केला आहे तो आरोग्यमंत्री सावंत यांनी. त्यांच्याजागी अन्य एखादा मंत्री असता आणि त्याने इतकी वादग्रस्त विधाने केली असती तर त्याला मंत्रिमंडळातून कधीच डच्चू मिळाला असता.

मात्र, सावंत यांच्याबाबतीत मुख्यमंत्री शिंदे असे करू शकत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे सावंत हे प्रचंड नाराज होते. त्यामुळे ते सरकार पाडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सावंत यांनी मोठी आर्थिक बाजू सांभाळली होती, असेही सांगितले जाते. मंत्रिमंडळातून काढले तर त्यांचा वाचाळपणा आणखी वाढेल आणि ते आपल्याच अंगलट येईल, कदाचित अशी भीतीही मुख्यमंत्री शिंदे यांना असावी.

मुख्यमंत्री शिंदे हे या वाचाळ नेत्यांवर नाराज असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते कठोर कारवाई करतील, याची शक्यता कमीच वाटते. कारवाई केली आणि हे नेते ठाकरे गटात परत गेले तर काय, याची भीती मुख्यमंत्र्यांना लागलेली असावी. त्यामुळेच धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था मुख्यमंत्री शिंदे यांची झाली आहे. विरोधकांच्या नव्हे, तर आपल्याच काही नेत्यांच्या चक्रव्यूहात अडकल्यासारखी स्थिती मुख्यमंत्री शिंदे यांची झाली आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT