BJP, Congress
BJP, Congress File Photo
विश्लेषण

भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का! काँग्रेसचा मोठा विजय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मंडी लोकसभा मतदारसंघ (Mandi Loksabha) आता काँग्रेसने (Congress) भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) हे मंडी मतदारसंघातीलच आहेत. याचबरोबर राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांपैकी काँग्रेसने दोन ठिकाणी विजय मिळवला असून, एका ठिकाणी आघाडी घेतली आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असून, त्याआधी भाजपला जनतेने दणका दिला आहे.

मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा सिंह (Pratibha Singh) या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार व कारगिल युध्दात सहभागी झालेले ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर (Khushal Thakur) यांना पराभूत केले आहे. प्रतिभा सिंह यांनी ठाकूर यांचा 8 हजार 766 मतांनी पराभव केला आहे. हा भाजपसह मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण मागील निवडणुकीत मंडीतून भाजपचे उमेदवार राम स्वरूप हे तब्बल 3.98 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. स्वरूप यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

मंडी लोकसभा जागेबरोबरच हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. जुब्बल-कोथकाई आणि फतेहपूर या दोन ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला असून, अर्की येथे काँग्रेस आघाडीवर आहे. तिन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी झालेल्या या पोटनिवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जात होत्या.

निवडणूक आयोगाने 3 लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये मध्य प्रदेशातील खांडवा, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला झाली होती. आसाममधल्या 5, पश्चिम बंगालमधल्या 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी 3, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुका झाल्या होत्या. आंध्र प्रदेश, हरयाना, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड आणि तेलंगणमधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातही याच दिवशी पोटनिवडणुका झाल्या. या सर्व पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT