Congress Party’s Vision and Strategic Roadmap CWC Meeting in Ahmedabad: Sarkarnama
विश्लेषण

Congress CWC Meeting: काँग्रेसची नवी प्रयोगशाळा! कार्यकर्त्यांच्या `फीडबॅक`वर निर्णय घेणार

Congress Party’s Vision and Strategic Roadmap CWC Meeting in Ahmedabad: ‘पक्षातील नेत्यांचा एक गट भाजपशी संगनमत करून राहतो, त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे. अशा नेत्यांना दूर केल्याशिवाय काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही,’ एवढ्या स्पष्टपणे राहुल गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मते मांडली.

सरकारनामा ब्यूरो

सुरेंद्र पाटसकर

गुजरातमध्ये सत्तेवरून काँग्रेस पायउतार होऊन ३० वर्षे झाली आहेत. पुढील निवडणुकीत राज्यात सत्तेवर येण्याचे स्वप्न त्यांनी बघितले आहे. त्यासाठी पक्षरचनेतील नव्या प्रयोगांची सुरुवात गुजरातपासून करण्यात येणार आहे. परंतु, अंतर्गत कलहामुळे त्यात अडथळेच जास्त आहेत.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच अहमदाबादमध्ये पार पडली. यावेळी प्रथमच काँग्रेसने राज्याला केंद्रस्थानी ठेवून ठराव मंजूर केला. पुढील विधानसभा निवडणुकीत २०२७ मध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करून काँग्रेस सत्तेवर येईल, अशी घोषणा याच राष्ट्रीय कार्यकारिणीच्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. त्यांनी एक प्रकारे या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना भाजपलाही आव्हान दिले. हे करत असतानाच पक्षासमोर सध्या असलेल्या आव्हानांचीही जाणीव आपल्याला आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पक्षातील नेत्यांचा एक गट भाजपशी संगनमत करून राहतो, त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली आहे. अशा नेत्यांना दूर केल्याशिवाय काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही,’ एवढ्या स्पष्टपणे राहुल गांधी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत मते मांडली. राज्यातील काँग्रेसचे पुनरुज्जीवन करणे ही काही दोन-तीन वर्षांत होणारी प्रक्रिया नाही, तर ५० वर्षांचा प्रकल्प आहे. यासाठी २०-३० पदाधिकाऱ्यांना हटवावे लागले तरी चालेल, असे सांगायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

गुजरातमधील काँग्रेसची स्थिती कशी आहे, याचे चित्र स्पष्ट होण्यासाठी राहुल गांधी यांची वक्तव्ये पुरेशी आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे बैठकीत काहीशी खळबळ उडाली. आपल्याच पक्षातील लोकांनाच त्यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल दोष दिल्याने अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. या सगळ्याचा दुसरा अर्थ असा की राज्यातील नेत्यांमध्ये अंतर्गत कलह आहेत, त्यामुळे त्याचा फायदा इतर पक्ष घेत आहेत.

पुढील निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची घोषणा राहुल यांनी केली असली तरी हे सोपे काम नाही. राज्यविधानसभेच्या २०२२मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले होते. आधीच्या निवडणुकीपेक्षा ६० जागा त्यांनी कमी मिळाल्या. त्यांची मतांची टक्केवारी २७ टक्के होती. आधी पेक्षा ही टक्केवारी १५ टक्क्यांनी कमी होती. राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) १३ टक्के मते मिळविली ही कौतुकास्पद गोष्ट होती. दुसरीकडे भाजपने १५६ जागा आणि ५३ टक्के मते मिळवत राज्यात सत्ता राखली. २०१७च्या तुलनेत काँग्रेसला हा मोठा धक्का होता.

आरोप-प्रत्यारोप

जिल्हा समितीच्या निवडीची प्रक्रिया सुरू होताच पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपशी संबंध असल्याचेही आरोप काही स्थानिक आमदारांवर करण्यात आले. असाच आरोप अहमदाबादमधील हिमंतसिंह पटेल यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपण केलेल्या आंदोलनांची आणि कामांची यादी सर्वांसमोर मांडली. असाच वाद अहमदाबाद शहर युवक काँग्रेसचे विशालसिंह गुर्जर आणि काँग्रेसचे निरीक्षक बी. के. हरीप्रसाद यांच्यात झाला. त्याची परिणती गुर्जर यांना निलंबित करण्यात झाली.

सत्तेचे विकेंद्रीकरण

काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेमध्ये १९६७पर्यंत जिल्हा समित्यांना अधिक महत्त्व दिले जात होते. कालौघामध्ये ते महत्त्व कमी होत गेले. पक्षनेतृत्त्व आता पुन्हा आपल्या मूळ रचनेकडे जाऊ इच्छित आहे. जिल्हा काँग्रेस समितीने सुचविलेले एकही नाव केंद्रीय निवडणूक समितीकडून फेटाळले जात नव्हते. जिल्हा समित्या पुन्हा एकदा तेवढ्या सक्षम करण्याचा पक्षाचा मानस आहे. ही प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत १२५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या उद्देशाने, पक्षाने ५२,००० बूथ पातळीवर नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ​

राहुल गांधी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ग्रामपंचायतींच्या मजबुतीकरणासाठी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला होता. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे धोरण राहुल गांधी आता पक्षासाठी वापरण्याच्या विचारात आहेत. त्याची सुरुवात गुजरातमधून होणार आहे. पक्षातील सर्व निर्णय निवडक दोन-तीन लोकांनी घ्यायच्याऐवजी पक्षातील सर्वांत खालील पातळीवरील कार्यकर्त्यांच्या `फीडबॅक`च्या आधारावर घेतले जावेत, अशी त्यांची संकल्पना आहे. त्याचा प्रयोग गुजरातमध्ये सर्वप्रथम करण्यात येणार आहे.

गुजरातनंतर राजस्थानात काम सुरू करण्यात येणार आहे. निर्णयप्रक्रियेत आता जिल्हा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पक्षाचे महत्त्वाचे निर्णय गांधीनगर किंवा अहमदाबादमध्ये न होता, जिल्हा आणि तालुका मुख्यालयात घेतले जातील, अशी ही संकल्पना आहे. राज्यातील पंचायत निवडणुकीपूर्वी ही नवी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. ही व्यवस्था प्रत्यक्षात येते का आणि त्याचा फायदा किती होतो हे पुढच्या निवडणुकीत कळेलच.पक्षाच्या अंतर्गत मतभेदांवर नियंत्रण मिळवून, जनतेशी थेट संवाद साधण्याचे प्रयत्न यशस्वी ठरल्यास, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला भाजपाच्या विरोधात एक मजबूत पर्याय म्हणून उभे राहता येईल.

गुजरातमध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर काही गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत.

१) पक्षश्रेष्ठींनी आत्मपरीक्षण करावे

प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचा एक गट पक्षसोडून भाजपमध्ये समाविष्ट होते. २०१७ ते २०२२ या कालावधीत साधारण ३६ काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. इतकेच नव्हे तर गेल्या विद्यमान विधानसभेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला, ते भाजपमध्ये गेले, पुन्हा निवडणूक लढविली आणि निवडून आले. या सगळ्यापासून पक्षश्रेष्ठी हात झटकू शकत नाहीत. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकूर या पाटीदार नेत्यांनी गेल्या निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचा हात हातात घेतला होता. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पुरेसे गंभीर नाही, नेतृत्व कमकुवत आहे, त्यामुळे ओबीसी समुदाय पक्षापासून दूर जात आहे, असे या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे सांगितले.

२००२ ते २०१७ या कालावधीत काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी २८ ते ४२ टक्क्यांच्या दरम्यान होती. परंतु, अंतर्गत धुसफूस आणि वेगळा दृष्टिकोन देण्यास आलेले अपयश यामुळे आम आदमी पक्षाला हातपाय पसरण्याची संधी मिळाली. गेल्या निवडणुकीत लेवा पटेल १३ टक्के, कडवा पटेल ६ टक्के, ओबीसी ६ टक्के, अनुसूचित जाती २० टक्के आणि अनुसूचित जमाती ५ टक्के यांनी काँग्रेसची साथ सोडली. कागदावर गणित मांडायचे झाल्यास आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसता तर २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसला ५५ जागा मिळू शकल्या असत्या.

२) योग्य नेतृत्व

सध्या काँग्रेसला एका चांगल्या नेतृत्वाची राज्यात गरज आहे. जनतेत मिसळणारे, त्यांच्या समस्या जाणून घेणारे, त्यांच्यासोबत उभे राहणारे नेतृत्व काँग्रेसला गरजेचे आहे. हे जर साध्य करायचे असेल, तर जुन्या नेत्यांना बाजूला सारायला लागेल. याचाच उल्लेख राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाच्यावेळी केला होता.

३) ग्रामीण भागाशी नाळ पुन्हा जोडणे

गुजरातच्या ग्रामीण भागात (साधारण १०९ मतदारसंघ) काँग्रेसचा चांगला पाया आहे. भाजपचा पाया प्रामुख्याने शहरी भागातील ७४ मतदारसंघांत आहे. अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर या शहरी भागातील ३६ मतदारसंघांपैकी केवळ पाच जागा जिंकण्यात त्यांना यश आले होते. पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सत्ता मिळवायची असेल, तर मध्यमवर्गीयांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या शहरी मतदारसंघांवर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागेल. अर्थात जातीय समीकरणे काँग्रेसला सांभाळावी लागतील.

या तीन मुद्द्यांकडे लक्ष दिले तर काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार जिल्हा काँग्रेस समित्यांचे पदाधिकारी बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र त्याचबरोबर अंतर्विरोधही पुढे आला आहे. या प्रक्रियेवर पहिली टीका जिग्नेश मेवाणी याने केली आहे. ‘‘आपण सध्या अशा टप्प्यावर आहोत की लग्नाच्या घोड्याकडून शर्यतीतील घोड्याची निवड केली जात आहे.’’ दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर ज्यांना कोणताच अनुभव नाही ते तज्ज्ञांची निवड करत आहेत. या म्हणण्याला पार्श्वभूमी आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याची.

राज्यातील काँग्रेसच्या स्थितीचे वर्णन करताना राहुल गांधी म्हणाले होते की काँग्रेसमध्ये स्पर्धेचे घोडे, लग्नात वापरायचे घोडे आणि लंगडे घोडेही आहेत. परंतु, आता स्पर्धेत वापराच्या घोड्यांनाच वापरले जाईल. विशेष म्हणजे मेवाणी हे गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नेमलेल्या निरीक्षकांना मेवाणी यांनी विरोध दर्शविला आहे. त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केले होते. काँग्रेस कार्यकारिणी किंवा राहुल गांधी यांचा हा दोष नाहीये, तर राज्यातील नेतृत्वाचा आहे, असे सांगण्यासही मेवाणी विसरलेले नाहीत.

या टीकेनंतर प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शक्तिकांत गोहिल यांनाही बोलणे भाग पडले. काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपशी साटेलोटे आहे असे वाटते, त्यांनी पुरावे सादर करावेत. नुसत्या जर-तरवर कारवाई करता येत नाही, असे सांगणे त्यांना भाग पडले. असे असले तरी निरीक्षकांच्या निवडीवरून वाद असल्याचे गोहिल यांनी मान्य केले. माजी आमदार व जुनागड जिल्ह्यासाठीचे निरीक्षक भारत मखवाना यांनीही अनेकांनी निवडीत पक्षपातीपणा होत असल्याच्या तक्रारी केल्याचे मान्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT