Congress MP politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ काही महिन्यांत संपणार आहे. एकेकाळी मध्य प्रदेश आणि दिग्विजय सिंह हे समीकरण देशाच्या राजकारणात गाजत होते. पण कालांतराने त्यांचे वर्चस्व कमी होत गेले अन् कमलनाथ यांचा उदय झाला. दोघांमधील राजकीय शत्रुत्व लपून राहिलेले नाही. आता दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा त्यांचा राजकीय गेम केल्याची चर्चा सुरू आहे.
दिग्विजय सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी आपण आता राज्यसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. ते मध्य प्रदेशातून राज्यसभेत गेले आहेत. पण जाता-जाता त्यांनी कमलनाथ यांच्यासह काँग्रेस पक्षाचीही कोंडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण निवृत्त होत असलेल्या जागी दलित किंवा आदिवासी समाजातील नेत्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी, असे दिग्विजय यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांच्या या घोषणेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या घोषणेने मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. अद्याप त्यासाठी जवळपास १४ महिन्यांचा कालावधी आहे. पण आतापासूनच राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. दिग्विजय सिंह यांच्या या राजकीय डावपेचाचा फटका थेट कमलनाथ यांनाच बसणार असल्याचे बोलले जात आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र नकुलनाथ यांचा छिंदवाडा या बालेकिल्ल्यातच पराभव झाला. कमलनाथ यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. या पराभवामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते.
सलग दोन पराभवानंतर कमलनाथ यांच्याकडून राज्यसभेत जाण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, दिग्विजय सिंह यांनी त्यांचा खेळ बिघडविला आहे. दिग्विजय सिंह यांनी दलित कार्ड बाहेर काढत सवर्ण असलेल्या कमलनाथ यांची कोंडी केली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी हे मागील काही वर्षांपासून सातत्याने दलित, आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याबाबत बोलत आहेत. कमलनाथ यांनी राज्यसभेवर दावेदारी सांगितल्यास ते दलित विरोधी असल्याचा सूरही उमटू शकतो.
दिग्विजय सिंह यांच्या या गुगलीने कमलनाथ यांच्यासोबतच पक्षालाही कोड्यात टाकले आहे. दोन्ही नेत्यांना डावलणे पक्षाला परवडणारे नाही. आधीच मध्य प्रदेशात काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. दिग्विजय सिंह यांनी पुन्हा दलित कार्ड बाहेर काढत एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता कमलनाथ आणि काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.