Mallikarjun Kharge| Rahul Gandhi  Sarkarnama
विश्लेषण

Delhi Election Results : दारुण पराभवातही काँग्रेसला दिसला आशेचा किरण; आता पुढची 5 वर्षे बोलायला मोकळे...

Congress Politics in Delhi BJP Won AAP Defeat : काँग्रेसला सलग तीन निवडणुकांमध्ये एकाही मतदारसंघात विजय मिळवता आलेला नाही.

Rajanand More

Congress Vote share : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सलग 15 वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला सलग तीन निवडणुकांमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेसच्या इतिहासात निवडणुकांबाबत एवढी मोठी नामुष्की पक्षावर कधीच ओढवली नसेल. खरंतर आम आदमी पक्षाची सत्ता गेली असली तरी काँग्रेससाठी हा सर्वात मोठा पराभव म्हणावा लागेल. पण असे असूनही काँग्रेसचे नेते मात्र एका गोष्टीवरून चेहऱ्यावर आनंद दाखवू लागले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या निवडणुकीत काँग्रेसला शुन्य जागा मिळाल्या. मागील दोन निवडणुकीतही काँग्रेसला भोपळा फोडता आला नव्हता. त्यामुळे आपले काहीच नुकसान झाले नाही, याचा आनंद नेते साजरा करू लागले आहेत. यामागचे कारण म्हणजे ‘आप’चा पराभव. दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना आपचा पराभव करायचा होता आणि तसे झालेही. त्याचाच सर्वाधिक आनंद या नेत्यांना झाला आहे.

आपला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले असून 10 टक्के मते कमी झाली आहेत. तसेच भाजपची मते जवळपास 7 टक्क्यांनी वाढली आहेत. भाजपने 48 जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. दुसरीकडे काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळाली नसली तरी मतांची टक्केवारी मात्र वाढली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 6.34 टक्के मते मिळाली आहे. 2020 मधील निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का 2.1 ने वाढला आहे.

मतांचा हा वाढलेला टक्काच काँग्रेस नेत्यांना आशेचा किरण वाटतो. काँग्रेसचे काहीच नुकसान झाले नाही उलट फायदा झाल्याचे नेते सांगू लागले आहेत. आपच्या नेत्या आतिशी यांच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणतात, मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केली. आमची मतांची टक्केवारी वाढली आहे. आपचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी सर्वकाही गमावले. आम्ही काहीच गमावले नाही. भाजपने सत्ता काबीज केली. पण सर्वात मोठा ‘लूझर’ आप आहे.

कधीकाळी आपच्या आमदार राहिलेल्या अलका लांबा यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या दिल्लीतील अनेक नेत्यांना आपचा पराभव सेलिब्रेशनसाठी पुरेसा आहे. त्याचे कारणही तसेच आहे. दिल्लीत आपचा उदय आणि काँग्रेस अस्त हे समीकरण त्यामागे आहे. आपने लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासूनच काँग्रेसच्या दारुण पराभवाला सुरूवात झाली. अनेक मातब्बर नेत्यांचे राजकीय करिअर त्यामुळे पणाला लागले. केवळ दिल्लीच नाही तर पंजाबमध्येही आपने काँग्रेसला पराभूत केले. गुजरातच्या निवडणुकीतही पक्षाला फटका बसला होता. नुकत्याच झालेली हरियाणाची विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद नाही.

आपची ताकद वाढलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसला निवडणुकीत फटका बसला आहे. पक्षाचे सर्वाधिक नुकसान दिल्लीत झाले. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही अनेकदा काँग्रेस आणि नेत्यांवर जिव्हारी लागणारे शाब्दिक वार केले. हिणवले. त्यामुळे तो राग काँग्रेस नेत्यांचा मनात होताच. तसेच आपचे पतन झाल्याशिवाय पक्षाचा उदय होणार नाही, असे नेत्यांना वाटत असावे. त्यामुळे कसाही करून आपचा पराभव करायचा, मग सत्ता कुणाचीही येवो, अशीच काँग्रेसची नीती राहिली. निवडणुकीत त्यांचा संपूर्ण प्रचार आपविरोधीच होता.

आता पुढे काय?

निवडणूक जवळ आल्याशिवाय कामाला लागायचे नाही, हे मागील काही निवडणुकीतील चित्र आतातरी काँग्रेसला बदलावे लागणार आहे. पण दिल्लीत दोन टक्के वाढलेल्या मतांच्या आशेवर पुढील पाच वर्षे समाधान मानून गप्प बसणार असतील तर पुन्हा भोपळा मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. दिल्लीत आपला 40 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहे. त्यामुळे या पराभवाने आप पुन्हा ताकद दाखवू शकणार नाही, या भ्रमात काँग्रेसने राहू नये. उलट वाढलेली दोन टक्के मते कशी वाढली, ती आणखी वाढवण्यासाठी काय करावे लागेल, याची रणनीती आता आखायला हवी. आपच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपल्या वाढलेल्या दोन टक्के मतांचे रुपांतर विजयात कसे करता येईल, याचे चिंतन काँग्रेसने करावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT