New Delhi : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षालाच चक्रव्यूहात अडकवले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करता करता त्यांनी आरक्षणावर केलेले विधानावर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या जाळ्यात काँग्रेस अडकले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता राहुल गांधींसह पक्षानेही डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.
अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी आरक्षणाबाबत म्हटले होते की, ‘आरक्षण थांबवण्याचा विचार काँग्रेस तेव्हाच करेल, जेव्हा भारतात पक्षपातीपणा थांबेल, पण अशी स्थिती भारतात नाही.’ या विधानावरून भाजपने राहुल यांना घेरले आहे. आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुरूवातीपासूनच मानसिकता असल्याचा हल्लाबोल भाजपने केला आहे. काँग्रेसने आता ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने 400 पारचा नारा दिला होता. भाजपला 400 हून अधिक खासदार संविधान बदलण्यासाठी हवे असल्याचा प्रचार त्यावेळी काँग्रेससह इतर मित्रपक्षांनी केला होता. अर्थात त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांची तशी विधानेही समोर आली होती. त्यालाच काँग्रेसने खतपाणी घातले आणि भारतभर त्याच प्रचारावर जोर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस खोटे बोलत असल्याचे जीव तोडून सांगितले. पण निकालातून काँग्रेसचा प्रचार प्रभावी ठरल्याचे दिसले. यावेळी राहुल यांच्या विधानावरून भाजपने त्यांना जाळ्यात अडकवण्यास सुरूवात केली आहे. आता काँग्रेस आणि राहुल गांधींनी आपण आरक्षणविरोधी नसल्याचे सांगताना आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा खुलासा केला आहे.
आम्ही आरक्षणाची मर्यादा 50 टक्केंच्या पुढे नेऊ, असेही राहुल यांनी वाद वाढू लागल्यानंतर म्हटले आहे. पण तोपर्यंत भाजपने राहुल यांच्यासह काँग्रेसला पुरतं खिंडीत गाठले आहे. बसपाचे मायावतींनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आरक्षणविरोधी असल्याचे चित्र आता भाजपकडून उभे केले जात आहे. राहुल यांच्या विधानाने पक्ष अडचणीत आला आहे.
जम्मू-काश्मीरसह हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्र आणि झारखंड तर पुढील वर्षी बिहार व इतर राज्यांतील निवडणूक आहे. या निवडणुकांमध्ये राहुल यांचे आरक्षणाबाबतचे हे विधान महत्वाचे ठरणार आहे. भाजपकडून त्याचा पुरेपुर वापर केला जाईल, हे स्पष्ट आहे. पंतप्रधान मोदींचा विधानसभेचा प्रचार सुरू झाल्यानंतर तेही थेटपणे काँग्रेसवर हल्ला चढवतील, यात शंका नाही. आता त्याला काँग्रेस आणि राहुल गांधी कसे उत्तर देणार, हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.