Indian political analysis : देशात नुकत्याच पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक पार पडली. केरळ वगळता अन्य चार राज्यांत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यापैकी दोन राज्यांमध्ये भाजपचे नेते तर एका राज्यात एनडीएतील पक्षाचा नेता या पदावर विराजमान झाला. तमिळनाडूत सुपरस्टार विजय यांनी बाजी मारली. या चार राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे काँग्रेस कनेक्शन. लवकरच केरळचीही त्यात भर पडेल. हे कनेक्शन नेमके काय ते आपण समजून घेऊयात.
सुवेंदू अधिकारी
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. राज्यातील ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे त्यांची निवड ऐतिहासिक ठरली आहे. अधिकारी हे आधी काँग्रेस आणि नंतर तृणमूल काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. बंगालमधील पूर्व मेदिनीपूरमध्ये त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांचा आधीपासूनच दबदबा होता. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत १९८९ मध्ये सुवेंदू यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेतून राजकीय कारकीर्द सुरू केली.
१९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत सुवेंदू हे तृणमूल काँगेसमध्ये दाखल झाले. तब्बल २२ वर्ष या पक्षात वाहून घेतल्यानंतर २०२० मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले अन् सहा वर्षांतच मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे तृणमूलमध्ये असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी त्यांना जाहीरपणे टार्गेट केले होते. पण आता भाजपने त्यांनाच मुख्यमंत्री केले आहे.
हिमंता बिस्वा सरमा
हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या टर्ममध्ये आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अधिकारी यांच्याप्रमाणेच तेही मुळचे काँग्रेसचे. विद्यार्थी देशपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. २००१ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावरच त्यांनी विधानसभेची पहिली निवडमूक लढविली. त्यानंतर २०१६ च्या निवडणुकीआधी ते भाजपमध्ये दाखल झाले अन् राज्यातील काँग्रेस सरकारला ग्रहण लागले. सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला आहे.
एन. रंगास्वामी
पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदी एन. रंगास्वामी हे तब्बल पाचव्यांदा पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी १९९० मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढली होती. २००१ मध्ये ते ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २००६ मध्ये दुसऱ्यांदा ही खुर्ची मिळविली. पक्षात मतभेदामुळे त्यांनी २०११ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत ऑल इंडिया एनआर काँग्रेसची स्थापना केली. आता त्यांचा पक्ष एनडीएमध्ये राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेत आहे.
सी. जोसेफ विजय
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवत मातब्बल डीएमके आणि एआयएडीएमके पक्षांना धूळ चारली आहे. विजय यांनी दोन वर्षांपूर्वी टीव्हीके पक्षाची स्थापना केली आहे. त्यांचा आणि काँग्रेसचे थेट कनेक्शन नसले तरी त्यांचा कल काँग्रेसच्या बाजूने राहिल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. १७ वर्षांपूर्वीच ते यूथ काँग्रेसचे सदस्य होण्यासाठी उत्सूक होते. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. पण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे काँग्रेस कनेक्शन समोर आले होते.
केरळचे मुख्यमंत्री
केरळमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा दहा वर्षांनंतर सत्ता काबीज केली आहे. अद्याप काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हे जाहीर केलेले नाही. पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, पाचपैकी केवळ याच राज्यात काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. पण तमिळनाडूमध्ये पक्ष सत्तेत सहभागी आहे. तर अन्य तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसशी जुने नाते आहे. त्यामुळे या राज्यांतील निवडणूक काँग्रेससाठी आगळीवेगळी ठरली, असे म्हणायला हरकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.