Congress  Sarkaranama
विश्लेषण

कर्नाटकातील आमदारानं काँग्रेसला दिल्लीत पाडलं तोंडावर

कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेस नेत्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly) अध्यक्ष विश्वेश्वर कागेरी हेगडे आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार (K R Ramesh Kumar) यांच्यातील संवाद आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विधानसभेमध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला. या वक्तव्यावरून काँग्रेसचे दिल्लीत नेतृत्व तोंडघशी पडले आहे.

कुमार यांच्या विधानाचे पडसाद दिल्लीतही उमटले आहेत. काँग्रेसवर या प्रकरणी टीका होऊ लागल्याने पक्षाने कुमार यांच्या वक्तव्यावर जाहीरपणे भूमिका घेत यापासून पक्षाला वेगळे केले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारामध्ये सभागृहात झालेल्या संवाद हा आक्षेपार्ह आणि असंवेनदशील होता. काँग्रेसला हे कदापी स्वीकारार्ह नाही. अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हे समाजाचे आदर्श असतात. त्यांच्याकडून असे वर्तन घडणे चुकीचे आहे.

बलात्कारापासून (Rape) वाचू शकत नसाल, तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं विधान रमेश कुमार यांनी केलं होते. विशेष म्हणजे त्यावर विधानसभेचे अध्यक्ष व सत्ताधारी भाजपचे (BJP) आमदारही काही बोलले नाहीत. उलट रमेश कुमार यांच्या विधानावर विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी हेसुद्धा हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याने आणखी संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर मोठा गदारोळ झाल्याने कुमार यांनी माफी मागून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

विधानसभेमध्ये पाऊस आणि पुरामध्ये झालेल्या नुकसानीवर चर्चा सुरू होती. या वेळी काही आमदार आपल्या भागातील लोकांना झालेल्या त्रासाची माहिती देऊ इच्छित होते. विधानसभा अध्यक्षांजवळ कामकाजासाठी मात्र फारसा वेळ नव्हता. त्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत चर्चा पूर्ण करायची होती. तर आमदार वेळ वाढवून देण्याची मागणी करत होते. त्यानंतर कागेरी हसत हसत म्हणाले की, मी आता अशा स्थितीत आहे की, जिथे मला केवळ आनंद घेत हा-हा म्हणायचे आहे. ठीक आहे. मला आता असे वाटते, की समोरील स्थिती नियंत्रित करणे सोडून द्यावे. तुम्ही सगळ्यांनी आपले म्हणणे मांडावे, असे मला सगळ्यांना सांगावेसे वाटते.

रमेश कुमार यांनी यावर आक्षेप घेत म्हटलं होतं की, 'एक म्हण आहे, जेव्हा बलात्कार होणारच असेल, तर झोपा आणि आनंद घ्या. तुम्ही अशाच स्थितीत आहात.' रमेश कुमार यांच्या विधानावर कागेरी यांच्यासह सभागृहातील सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांतील एकाही आमदाराने आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे कागेरी हे कुमार बोलत असताना हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT