Imran Pratapgarhi News Sarkarnama
विश्लेषण

Imran Pratapgarhi News: मोदीजी बाय बाय...शायरी म्हणून ठीक, पण जमिनीवर नियोजन काय?

Congress Politics: कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सर्वच पक्षांकडून विविध घोषणा, दावे केले जातात. काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी मोदीजी बाय बाय...अशी शायरी सादर करून अकोला येथील कार्यक्रमात रंग आणली खरी, मात्र एवढे पुरेसे आहे का, हा प्रश्न कायम आहे.

अय्यूब कादरी

वातावरण कसेही असले तरी निवडणूक लढवण्यासाठी हरेक प्रकारे जोर कसा लावायचा, हे काँग्रेसने (Congress)भाजपकडून शिकायला हवे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना शिकायचेच असले तर ते शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (CM Revanth Reddy) यांच्याकडूनही शिकू शकतात. मात्र, राज्यातील काँग्रेसचे नेते शिकणार नाहीत, याची प्रचिती वारंवार येत आहे. मोदीजी बाय बाय...अशा शायरीने केवळ मनोरंजन होऊ शकते, ते सत्यात उतरवायचे असेल तर जमिनीवर उतरून काम करावे लागेल, लोकांमध्ये मिसळावे लागेल... काँग्रेसच्या नेत्यांनी हे अभावानेच केले आहे.

अकोला येथील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खासदार इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांनी मोदीजी बाय बाय... अशी शायरी केली. त्यामुळे प्रचार सभेत रंगत आलीही असेल. अशी शायरी, भाषणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो, हे खरे आहे.

या उत्साहाला नियोजनाची, मतदारसंघांत संपर्काची जोड द्यावी लागते. कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते, जे राज्यातील बहुतांश मतदारसंघात दिसून आले. सताधाऱ्यांविरुद्ध लोकांमध्ये नाराजी असते, तशी ती या सत्ताधाऱ्यांबाबतही होती. काँग्रेसने या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला का, हा प्रश्न आहे. प्रयत्न केले असतील तर ते पुरेसे होते का, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येईल.

काँग्रेसमध्ये दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. अनेक नेत्यांना सत्तेशिवाय राहण्याची सवय नव्हती. मोदी लाटेत अशा नेत्यांचे बालेकिल्ले उद्धवस्त झाले. त्यानंतरही काही नेत्यांची सरंजामी वृत्ती लोप पावली नाही. गेल्या दहा वर्षांत अशा नेत्यांनी रस्त्यावर उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला नाही. तिकडे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा काढली, मात्र हे सरंजामदार निवांत राहिले. त्यांना कामाला लावण्याची धमक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना दाखवता आली नाही. संघर्ष करण्याऐवजी अशा नेत्यांनी मग सुरक्षित मार्ग शोधला. हा सुरक्षित मार्ग म्हणजे भाजप प्रवेश किंवा महायुतीतील अन्य पक्षांत प्रवेश. काँग्रेसमधून बाहेर पडणारे लोंढे नेतृत्वाला काही केल्या थांबवता आले नाहीत.

काँग्रेस सोडून गेलेले काही नेते तसे पाहिले तर पक्षाच्याही काही कामाच्या नव्हते. सरंजामी वृत्तीमुळे लोकांचा त्यांच्यावर राग होताच. काँग्रेसमध्ये असे नेते आहेत म्हणून भाजपला मतदारांचा पाठिंबा मिळाला होता. आता अशा नेत्यांचे काय करायचे, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या अंतर्विरोधाचे काय करायचे, हे भाजप पाहून घेईल.

मुद्दा असा की सोडून गेलेले काही नेते काँग्रेससाठी असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारातील होते. सोडून गेलेल्या काही नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघांत गेली अनेक टर्म काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नव्हता. असे असतानाही पक्षसंघटनेतील महत्त्वाची पदे त्यांना देण्यात आली. काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी अशा नेत्यांनी कोणते प्रयत्न केले होते, कोणते उपक्रम राबवले होते, याचा शोध आता काँग्रेसनेच घ्यायला हवा. जे प्रामाणिकपणे लढताहेत त्यांना आता काँग्रेसने बळ देण्याची गरज आहे. सोडून गेलेल्या नेत्यांमुळे निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

निवडणूक कोणतीही असली तरी भाजप त्यासाठी झोकून देऊन काम करतो. कार्यकर्ते पक्षादेश मानून वणवण फिरत असतात. पक्षाच्या आदेशापुढे कार्यकर्त्यांसाठी बाकी गोष्टी दुय्यम असतात. असे चित्र आपल्या पक्षात दिसते का, हे काँग्रेसने तपासून घ्यायला हवे. तेलंगणाचे काँग्रसचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे उदाहरण राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पाहायला हवे. रेड्डी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांच्या पायाला अक्षरशः भिंगरी लागली. त्यांनी सर्व प्रदेश आपल्या पायांखालून घातला. यात्रा काढून ते लोकांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नंतर त्यासाठी आंदोलने केली. त्यामुळे लोकांमध्ये काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण झाला आणि शक्तिशाली सत्ताधारी बीआरएस पक्षाचा पराभव करून तेलंगणात काँग्रेस सत्तेवर आली.

असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट्रातील लोकांच्या मनात निर्माण करता आला का, हे एक कोडेच आहे. येथील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एखादी यात्रा काढल्याचे ऐकिवात नाही. प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांना बळ दिल्याचे चित्रही दिसले नाही. मग ऐन निवडणुकीत मोदीजी बाय बाय...म्हणून काय होईल? सत्ताधाऱ्यांविरुद्धची नाराजी म्हणून काँग्रेसला फायदा होऊ शकतो, मात्र गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने मन लावून प्रयत्न केले असते तर आणखी वेगळ्या निकालाची अपेक्षा करता आली असती. असे असले तरी काँग्रेसचे काही दिग्गज नेते आता अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत आहे, हे पक्षासाठी आशादायक चित्र म्हणावे लागेल.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT