Lok Sabha Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या 'नमत्या' भूमिकेने भाजपला फुटला 'घाम'

Sachin Deshpande

Congress Politics : लोकसभा निवडणूक जवळ येत असताना काँग्रेस नेत्यांनी अगदी पडती भूमिका घेत राज्यस्तरीय पक्षांसोबत जुळवून घेण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या या पडत्या भूमिकेमुळेच काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वाढली असून, त्यामुळे राज्यस्तरीय पक्षांना बळ मिळणार आहे. राज्यस्तरीय पक्ष संपविण्याचा भाजपच्या उद्योगाने आधीच कंटाळलेल्या स्थानिक पक्षांना काँग्रेस अधिक जवळचा पक्ष वाटत आहे. त्यात इंडिया आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसने नमते होत, वेळ प्रसंगी पडती बाजू घेत, कुठेही देशाचा सर्वात जुना पक्ष आहे हा मुद्दा न रेटत अगदी राज्यस्तरीय पक्षाचे नेते म्हणतील, त्या जागा निश्चितीची तयारी सुरू केली आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचे पाय जमिनीवर आले आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पक्षांसोबत वरिष्ठांनी जुळवून घेण्याचे सोडलेल्या फर्मानामुळे काँग्रेस नेते तर अडचणीत आहेतच. पण, त्याच बरोबर या खेळीने सर्वाधिक डोकेदुखी ही भाजप नेत्यांची वाढली आहे. भाजप नेत्यांना 400 पार चा नारा डोळ्यांसमोर दिसत असून, त्यामुळे अनेकांना घाम फुटल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे. एकीकडे राज्यस्तरीय पक्षांसमोर काँग्रेसची पडती बाजू आणि दुसरीकडे भाजप समोरचे मोठे लक्ष पाहता सर्वात जास्त टेन्शन भाजपच्या नेत्यांमध्ये आहे. भाजपने लोकसभेच्या 2014, 2019 मध्ये विजय संपादन केल्यानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी स्थानिक पातळीवर महत्त्वाची ठरते. त्याचाही विचार भाजप नेत्यांना चांगलाच सतावत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अँटी इन्कम्बन्सीमुळे 2019 मध्ये भाजपने तब्बल 90 खासदारांचे तिकीट कापले होते. तशीच शक्यता यंदा व्यक्त केली जात आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात भाजप खासदारांचे रिपोर्ट कार्ड हे बोगस आहे. त्यांना भाजप डच्चू देण्याच्या तयारीत आहे. इतकेच नाही तर अशा ठिकाणी महिलांना, तरुणांना संधी देऊ अशी बोटचेपी भूमिका भाजप घेण्याच्या तयारीत आहे. आम्ही तरुणांना संधी देणार आहोत, असे म्हणत बोगस खासदारांचे तिकीट कापले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या निवडणुकीत 90 खासदारांना डच्चू दिला होता. त्यामुळे यंदा किती खासदारांना भाजप डच्चू देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन टर्म विजयानंतर होत असलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 90 पेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2019 च्या निवडणुकीत 175 खासदारांना भाजपने पुन्हा संधी दिली होती, पण दोन टर्म निवडणुकीनंतर अँटी इन्कम्बन्सी ही पक्षासाठी लागू होत असताना खासदार सक्रिय नसेल निष्क्रिय असेल, तर या अँटी इन्कम्बन्सीचा फटका खासदारांना अधिक बसतो. भाजपने 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 21 जागा अधिक जिंकल्या होत्या, तर काँग्रेसच्या 8 जागा अधिक जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत भाजपने 2019 च्या निवडणुकीत 438 जागा लढवित 303 लोकसभा मतदारसंघांत विजय संपादित केला होता. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी भाजपसाठी 370 जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. म्हणजे तब्बल 67 जागा अधिक जिंकण्याची गरज आहे. हे करताना आधीच्या सर्व जागा कायम ठेवाव्या लागतील.

तर देशभरात काँग्रेसने 424 मतदारसंघांत निवडणूक लढवित 52 जागांवर विजय संपादित केला. या 424 जागा आता काँग्रेस स्वतःजवळ कमी ठेवत आणि राज्यस्तरीय पक्षांसोबत अधिक शेअर करण्याच्या तयारीत आहे. स्थानिक मुद्दे, राज्यस्तरीय पक्षांचे स्थानिक संगठन यामुळे भाजपच्या नेत्यांना टेन्शन वाढल्याचे चित्र आहे. काँग्रेसची ही खेळी वर वर पाहता नमती भूमिका घेणारी असली तरी भाजपसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यात विविध पक्षांची फोडाफोडीचे खापर आणि विविध राज्यांत सत्ता ओरबाडण्याची भाजपची खेळी त्यांच्याच अंगलट येते काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात समाजवादी पार्टी सोबत काँग्रेसने नमती भूमिका घेत असे चित्र दाखवित 17 जागा पदरी पाडून घेतल्या. उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी पार्टी ही विरोधात आहे. त्यांच्याकडे विधानसभेच्या मोठ्या संख्येत जागा आहे. असे असताना समाजवादी पार्टीने काँग्रेसला 17 लोकसभा जागा देत मोठा दिलासा काँग्रेस नेत्यांना दिला आहे. 80 जागांपैकी 17 जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे. समाजवादी पार्टी जवळपास 63 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. देशाच्या सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात भाजप सोबत थेट सपाची लढत असेल.

आज काँग्रेसने दिल्ली, हरियाणा, गुजरात, चंदीगड आणि गोवा या राज्यांत आपसोबत जुळवून घेत आपला जागा सोडल्या आहेत. दिल्लीत काँग्रेस चार जागांवर, तर आप तीन जागांवर निवडणूक लढविणार आहे. हरियाणात काँग्रेस 9 जागांवर लढविणार आहे, तर कुरुक्षेत्र ही जागा आपला सोडण्यात आली. आप गुजरातमध्ये भावनगर आणि भरुच लढणार आहे. चंदीगड आणि गोव्यात काँग्रेस दोन जागा लढवणार आहे. काँग्रेसने मेघालय आणि आसाममधील काही जागांच्या बदल्यात पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 42 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली होती.

महाराष्ट्रात 48 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या सोबतच्या महाविकास आघाडीत वंचितची एंट्री किंचित न ठेवता ती वाढविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे, तर वंचितने जवळपास 12 जागा मागितल्या ते चार ते सहा जागांवर महाविकास आघाडीत येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे सर्व करताना काँग्रेसला कुठेही मोठा भाऊ हा फिल आला तर त्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंध आणि वंचितला सोबत घेण्याची काँग्रेसची तयारी ही भाजपची महाराष्ट्रातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. चार पक्षांनी एकत्र निवडणूक लढविणे ही मोठी राजकीय खेळी महाराष्ट्रात सफल होते की नाही हे पाहण्यासारखे असेल. तूर्तास काँग्रेसच्या नमत्या भूमिकेमुळे भाजप नेत्यांना देशात तरी घाम फुटल्याचे चित्र आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT