Congress  Sarkarnama
विश्लेषण

Congress News : आघाडीच्या राजकारणात काँग्रेसचीच होतेय कोंडी

Congress India Alliance Crisis : काँग्रेसने ज्या इंडिया आघाडीचे जाळे टाकले होते त्याच जाळ्यात आता काँग्रेस देशभरातच अडकू लागली आहे. काँग्रेसची कोंडी होताना दिसत आहे.

प्रमोद बोडके - सरकारनामा ब्युरो

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी २८ पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत काँग्रेसने सहभागी होत भाजपला आव्हान दिले. यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. ‘इंडिया’च्या जागा वाढल्या. परंतु सत्तेपासून वंचितच राहावे लागले. भाजपला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने ज्या इंडिया आघाडीचे जाळे टाकले होते त्याच जाळ्यात आता काँग्रेस देशभरातच अडकू लागली आहे. काँग्रेसची कोंडी होताना दिसत आहे.

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९३ तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. एवढे दिग्गज एकत्रित येऊन देखील भाजपला आपण पराभूत करू शकत नाही, याचा अंदाज इंडिया आघाडीतील नेत्यांना आल्यानंतर त्या-त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील प्रमुख नेते स्वतंत्र व सावध भूमिका घेताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत जागा वाढल्या परंतु सत्ता मिळाली नाही, ही रुखरुख या आघाडीतील जवळपास सर्वच पक्षांत होती.

या रुखरुखीचे खापर व आघाडीच्या नेतृत्वाबद्दल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाज उठविला. त्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,(Arvind Kejriwal) जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसवर फोडण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी झाली का? याचे उत्तर बारकाईने शोधण्याची गरज आहे. या प्रश्‍नाचे उत्तर महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष, माकप, भाकप आणि शेतकरी कामगार पक्ष अधिक चांगल्या पध्दतीने देऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचं उमेदवार आणि समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात होते.

महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविली परंतु या निवडणुकीत समन्वयाऐवजी आघाडीचा गोंधळच अधिक दिसला. त्याचा परिणाम निकालात झाला. ‘महाविकास’च्या या निकालाचे खापर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काँग्रेसवरच (Congress) फोडू लागले आहेत. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया, विसंवाद यामुळे मोठे नुकसान झाल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये आगोदरच असलेली धुसफूस आणि त्यातच मित्रपक्ष शिवसेना व राष्ट्रवादीने दाबलेली दुखरी नस यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधकांना चांगल्याच गुदगुल्या होत असतील.

चव्हाण, राऊत व्यक्त झाले

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. या लढतीत आप जिंकेल, असा अंदाज आणि विश्‍वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांच्या या अंदाजाची चर्चा दिल्ली काँग्रेसपर्यंत झाली. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर चव्हाण यांनी आपल्या वाक्यांची सारवासारव केली.

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे वाढलेला आत्मविश्‍वास, वाटाघाटींमध्ये घातलेला वेळ यामुळे आघाडीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांसमोर सांगितले. आजपर्यंत विजय वडेट्टीवार थेट बोलत होते. आता त्यांना नितीन राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही साथ मिळू लागली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचा आवाज दिल्ली काँग्रेसच्या कानावर वेळीच पडण्याची आवश्‍यकता आहे.

दिल्ली निकालानंतर बदल इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढत आहे. त्यांच्या या स्वबळाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. या दोन्ही पक्षांची दिल्लीत ताकद किती? हा जरी प्रश्‍न फारसा महत्वाचा नसला तरीही इंडिया आघाडीची दिशा या नेत्यांच्या भूमिकेतून समोर येत आहे.

दिल्ली विधानसभेचा निकाल आठ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. इंडिया आघाडीत राहून काँग्रेस विरोधाचा ‘आप फॉर्म्युला’ यशस्वी झाल्यास इंडिया आघाडीचे चित्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल. दिल्लीनंतर बिहार निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी दिल्लीचा ‘आप फॉर्म्युला’ महत्वाचा ठरु शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT