Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विश्लेषण

Vidhan Parishad Vishleshan : विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडी; काँग्रेसची मते ठरली गेमचेंजर, क्रॉस व्होटिंगचा 'मविआ'ला फटका

Congress News : सर्वच पक्षांच्या उमेदवारांना विजयाची समान संधी असताना या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Sachin Waghmare

Mumbai News : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले.11 जागांसाठी 12 जण निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पाहवयास मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडे बाजार रंगला. सर्वच पक्षांच्या उमेदवारांना विजयाची समान संधी असताना या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

त्यांना 23 मतांचा कोटा पूर्ण करता न आल्याने पराभव स्वीकारावा लागला. या मतदानावेळी काँग्रेस पक्षाची आठ मते फुटल्याचे उघड झाले. त्यामुळे याचा फटका आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधून (Congress) फुटण्याची शक्यता असलेले तीन-चार आमदार आहेत. अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून विधिमंडळ आवारात रंगली होती. विशेषतः या चर्चेला हे आमदार फुटणार असल्याचे सांकेतिक पद्धतीने सांगत आमदार कैलास गोरंट्याल यांनी दुजोरा दिला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगली होती. त्यांनी कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला आहे, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवालाही असल्याचे या चार जणांचे काय करायचे याचा निर्णय झाला नसल्याचे सांगत रंगत आणली होती.

विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी चुरशीने शुक्रवारी दुपारपर्यंत मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले होते. विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या चार पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले होते. हे सर्व पक्ष आमदारांवर लक्ष ठेवून होते.

दुसरीकडे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने आमदारांना एकत्रित ठेवले नव्हते. त्यामुळे सर्वांचे या निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागले होते. या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष सोडला तर सर्वच पाच पक्षाला कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहावे लागले. केवळ काँग्रेसकडे ३७ मते होती. त्यांच्या एक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा लागणार होता. त्यामुळे त्यांच्यापुढे कसलीच अडचण नव्हती.

त्यामुळे उर्वरित 14 मते काँग्रेस कोणाला देणार याची उत्सुकता होती. त्याशिवाय त्यांची पाहिल्या पसंतीची मते कोणाला देणार यावर जय-पराजयाचे गणित बदलणार होते. त्यामुळे काँग्रेसची मते ही या निवडणुकीत गेमचेंजर ठरली. दुसरीकडे या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती होती. त्यामुळे काँग्रेस सोडले तर इतर पाच पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी मतांची जोडणी करावी लागणार होती.

महायुतीमधील तीन पक्षांना साधारण 12 मतांची जोडणी करावी लागली तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना व राष्ट्रवादीची काँग्रेस शरद पवार गटाला अतिरिक्त मतांची जोडणी करावी लागली. या निवडणूक रिंगणात भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर काँग्रेस एक, शेकाप एक व शिवसेना ठाकरे गटाचा एक उमेदवार रिंगणात उतरला होता.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून (Bjp) पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली. भाजपकडे 104 मतांचा कोटा असल्याने त्यांच्या चार जागा सहज निवडून आल्या पाचव्या जागेसाठी त्यांना जवळपास 9 मतांची गरज होती. त्यांच्या पारड्यात त्यापेक्षा अधिक मते पडली.

विशेष म्हणजे भाजपच्या सर्वच उमेदवाराने कोट्यापेक्षा अधिक मते मिळाली. योगेश टिळेकर 26, पंकजा मुंडे 26, परिणय फुके 26, अमित गोरखे 26, सदाभाऊ खोत यांना 24 मते मिळाली. भाजपचे संख्याबळ 104 असताना 128 अधिकचे 24 मते त्यांना मिळाली.

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यांच्याकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे दोघे निवडणूक लढले. त्यांच्याकडे 39 मते होती त्यांना सात मतांची आवश्यकता होती. त्यांना विजयासाठी आवश्यक मते मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेसाठी मैदानात उतरवले होते. त्यांच्या दोन जागा निवडून येण्यासाठी 46 मतांची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्याकडे 40 स्वतःची तर 10 अपक्षांची मते होती. त्यामुळे त्यांना ही मते मिळाली.

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची एक जागा निवडून येण्यासाठी 23 मते लागणार होती. त्यांच्याकडे 15 मते असल्याने आठ मतांची आवश्यकता होती. अपक्ष शंकरराव गडाख, माकपचे विनोद तिकटे यांना त्यांच्याकडे वळवल्याने 17 मते झाली होती. नार्वेकर यांची गाडी २१ मतावर बराच वेळ अडकली होती. ११ जागेसाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली.

शेकापच्या जयंत पाटील यांना 23 मते आवश्यक होती. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 तर शेकाप 1, माकप 2, अपक्ष एक असे 16 मते होती. त्यांना अजून 7 मतांची गरज होती. मात्र त्यांना केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे मते मिळाली. दुसरीकडे अपक्ष अथवा काँग्रेसची मते मिळाली नसल्याने जयंत पाटलांना पराभव स्वीकारावा लागला.

महाविकास आघाडीला बसला फटका

ही सर्व आकडेवारी पाहिली तर काँग्रेससोडता इतर पक्षांना जुळवा-जुळव करावी लागणार होती. त्यामुळे या पाच पक्षांत मोठी चुरस होती. सर्वच पक्षांना विजयाची समान संधी असताना त्यामध्ये महायुतीने बाजी मारली. तर जयंत पाटलांना यांना या चुरशीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत फॊडाफोडीच्या राजकारणाचा फटका महाविकास आघाडीला बसला असून आता ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT