NCP Navsankalp Shibir : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे छत्रपती संभाजीनगर येथे होणारे शिबिर ऐनवेळी शिर्डी येथे घेण्यात आले. मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे काढण्यात येणार होता. हे कारण शिबिराचे स्थान बदलण्यास पुढे आले आहे.
मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे शिबिर घेताना स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे भाजपच्या या शिबिराचे सावटसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरावर होतेच.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, ‘‘पक्षाला मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता, जमिनीवर पाय ठेवून काम करावे लागणार आहे. 2047पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला बलवान पक्ष बनविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला एकसंघ करत नवा निर्धार करण्याची हीच वेळ आहे.’’
मात्र, अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे सोडून आपलेच रडगाणे या ठिकाणी गायले. या शिबिराची सर्वाधिक चर्चा झाली ती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि वादग्रस्त नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची उपस्थिती राहणार की नाही याची. मात्र या दोन्ही नेत्यांनी एक-एक दिवस या शिबिराला हजेरी लावली. धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केवळ आपलीच बाजू मांडली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुंडे यांचे विश्वासू साथीदार वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यावरून मुंडे यांच्याविरोधात प्रचंड राळ उठविली जात आहे. याच प्रकरणाचा खुलासा मुंडे यांनी याठिकाणी केला. आपणास या प्रकरणात विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचा खुलासा मुंडे यांनी यावेळी पहिल्यांदाच केला. आश्चर्य म्हणजे या प्रकरणी मौन धारण केलेल्या मुंडे यांनी फक्त आपल्या कार्यकर्त्यांपुढेच आपली बाजू मांडली. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची धारणा मुंडे हे निर्दोष आहेत अशीच आहे. त्यामुळे त्याच्यापुढे स्पष्टीकरण देण्याऐवजी मुंडे यांनी जनतेसमोर येणे गरजेचे होते व आहे.
दुसरे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा आपल्यावर कसा अन्याय झाला याचेच विवेचन केले. ‘‘मी श्रद्धेने वागलो, पण मला अश्रद्धेने वागणूक मिळाली,’’ असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. बहुजन समाजासाठी समता परिषदेच्या माध्यमातून काम सुरूच ठेवणार असल्याचे सांगताना सबुरीच्या धोरणावर ठाम असल्याचे नमूद केले, मात्र कोणीतरी आपल्याशी अश्रद्धेने वागल्यास त्याचा सामना कसा करायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.पक्षातील आणखी एक वादग्रस्त नेते नवाब मलिक यांनी मार्गदर्शन करताना मुंडे यांचे नाव न घेता, थेट त्यांच्यावरच हल्ला चढवला. केवळ एका व्यक्तीमुळे पक्ष आणि पक्षाचे नेतृत्व बदनाम होणार असेल, तर पक्षाने विचार करण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षबांधणी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी पालिका निवडणुकांबाबत परस्परविरोधी विधाने केल्याने कार्यकर्त्यांच्या मनात मात्र गोंधळ निर्माण झाला. वळसे पाटील यांनी आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी पूर्णतः तयार आहे, असे विधान करीत कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचा थेट संदेश दिला. मात्र त्याचवेळी जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून एकत्र लढण्याची तयारी असल्याचे सांगत पटेल यांनी वळसे पाटील यांच्या विधानाला विसंगत असे विधान केले. या दोघांच्या एकमेकांविरोधी वक्तव्यांमुळे पक्षात रणनीतीबाबत मतभेद असल्याची शंका निर्माण होते.
जनमानसात प्रतिमा खराब आहे त्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही. तसेच, पक्षात कुणाशीही गैरवर्तन होईल असे काम करणाऱ्या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल, असे अजित पवार यांनी जाहीर केले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहील. यासाठी तुमची साथ मला हवी आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनी शिबिराच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन शिर्डी मंदिरात असलेल्या मशिदीमधील दान एकाच कुटुंबाकडे जात असल्याचा सांगत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चा दारुण पराभव पाहता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अजित पवार यांच्याकडे येण्यास फार नेते उत्सुक नव्हते, नंतर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मात्र या पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. आमदार सतीश चव्हाण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविल्यानंतरही त्यांना या शिबिरादरम्यान पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. चव्हाण हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे चव्हाण यांना अजित पवार यांनी सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. मात्र या निवडणुकीत चव्हाणांचा पराभव झाला होता. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे सुरेश नागरे, नाना राऊत, संजय साडेगावकर, अविनाश काळे या नेत्यांनी 73 समर्थकांसह काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिर्डी मध्ये झालेल्या शिबिराचा राष्ट्रवादी काँग्रेसला झालेला हा फायदाच म्हणावा लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.