Arvind Kejriwal in Jail Sarkarnama
विश्लेषण

Delhi CM Arvind Kejriwal : ‘जेल का जवाब वोट से’…केजरीवालांची ‘ट्रिक’ फेल? मालीवाल ‘इफेक्ट’ येणार अंगाशी...

Lok Sabha Election 2024 Exit Poll Arvind Kejriwal AAP : एक्झिट पोलमध्ये दिल्लीतील सर्व सात जागांवर पुन्हा भाजपचा विजय होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

Rajanand More

Exit Poll 2024 : लोकसभा निवडणूक निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलने विरोधकांना धडकी भरवली आहे. देशातील पुन्हा भाजपची सत्ता तर इंडिया आघाडीचा सुपडा साफ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजधानी दिल्लीतही आप आणि काँग्रेसची आघाडी चालली नसल्याचे दिसते.

भाजपला रोखण्यासाठी आप आणि काँग्रेसने दिल्लीसह चंदीगड, हरियाणा आणि गुजरातमध्ये आघाडी केली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही, असे एक्झिट पोलमधील अंदाजावरून स्पष्ट होते. प्रामुख्याने दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या प्रचाराचा काहीच परिणाम दिल्लीकरांवर झाला नाही.

दिल्लीत आघाडीला एकही जागा मिळताना दिसत नाही. कथित मद्य धोरण घोटाळा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना झालेली अटक आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण इंडिया आघाडीला भोवल्याचे दिसते.

‘जेल का जवाब वोट से’   

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन दिला. त्यानंतर केजरीवालांनी दिल्लीत रोड, सभांमधून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. ‘जेल का जवाब वोट से’, ही मोहिम हाती घेतली. पण दिल्लीकरांना ते रुचलेले दिसत नाही.

मालीवाल प्रकरण भोवले?

निवडणुकीदरम्यान केजरीवालांचे पीए विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप खासदार स्वाती मालीवाल यांनी केला. त्यानंतर कुमार यांना अटक झाली. हे प्रकरण भाजपने चांगलेच लावून धरले. केजरीवालांनी त्यावर फारसे भाष्य केले नाही. त्यामुळे ते कुमार यांची बाजू घेत मालीवाल यांच्यावर अन्याय करत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा फटका निवडणुकीत बसल्याचे एक्झिट पोलवरून दिसते.

राजकीय भवितव्यावर प्रश्न

केजरीवालांना रविवारी पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसला तरी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांच्यावर दबाव चांगलाच वाढू शकतो. काँग्रेस आणि आपमध्येही पुन्हा दुरावा वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक पुढीलवर्षी असून त्यावेळी केजरीवालांची जादू पुन्हा चालेल की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भाजप यशस्वी

एक्झिट पोलमधील अंदाज खरे ठरल्यास भाजपसाठी हा मोठी विजय असेल. काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली असल्याने दिल्लीत सत्ता काबीज करण्याच्यादृष्टीने भाजपचा मनोबल नक्कीच वाढणार आहे. मागील दहा वर्षांत राजधानीतील स्थिती बरीच बदलली आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून नेतृत्व सिध्द केलेल्या केजरीवालांवर भ्रष्टाचाराचा डाग लावण्यात भाजप यशस्वी ठरली आहे.

मद्य धोरण घोटाळ्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल, पण आप आणि केजरीवालांची प्रतिमा दिल्लीकरांसमोर मलीन करण्यात भाजपने यश मिळवले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत आपसोबत आघाडीत करत काँग्रेसनेही आगीत उडी घेतल्याचे चित्र निर्माण जाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT