Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Sarkarnama
विश्लेषण

फडणवीसांच्या सुसाट गाडीला श्रेष्ठींकडूनच ब्रेक; पण त्यानंतरही घडविले पक्षनिष्ठेचे दर्शन!

दत्ता देशमुख

बीड : गुरुवारच्या राजकीय घडामोडींत सगळ्या सूत्रांची माहिती आणि सर्व राजकीय अंदाज चुकले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. आतापर्यंत फडणवीसांची गाडी ज्या प्रमाणे सुसाट होती, त्याला ही घडामोड काहीसा श्रेष्ठींकडून ब्रेक असल्याचे मानले जाते. मात्र, हा ब्रेक असला तरी याचे परिणाम दिसायला आणखी वेळ आहे. परंतु, यातून देवेंद्र फडणवीसांची पक्षनिष्ठाही दिसली. विशेष म्हणजे यामुळे देवेंद्र फडणवीस आता विरोधकांचे पहिले नाही तर दुसऱ्या क्रमांकाचे टार्गेट दिसतील. (Devendra Fadnavis created a vision of party loyalty)

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये मोदी लाट आणि तेवढीच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनाची सहानुभूती होती. मात्र, त्याच काळात देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा नारा दणाणला. एकनाथ खडसेंसारख्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काही दावेदारांना अलगद दूर करुन देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. शिवसेनेची कुरबुर असतानाही त्यांनी राज्याचा कारभार सक्षमपणे हाताळला. विशेष म्हणजे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही गंभीर आरोप झालेले नाहीत. या काळात मराठा आरक्षणासाठी ३६ मोर्चे निघूनही त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळले.

मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखविलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा सोशल मीडियावर आरोप झाले असले तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्व गुणांवर पुन्हा मोहोर उमटली. भाजपने सर्वाधिक १०५ (पंढररपूर पोटनिवडणुकीत एक जागा अशा एकूण १०६) जागा जिंकल्या. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक धुरीण भाजपपेक्षा त्यांचे नेतृत्व मान्य करुन भाजपत आले. यात राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, पद्मसिंह पाटील अशा अनेकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सरकारमध्येही आणि भाजप मंत्र्यांमध्येही देवेंद्र फडणवीसांचा शब्द अंतिम असायचा.

श्रेष्ठींचा विश्वास व वरदहस्त आणि स्वत:चे नेतृत्व आणि संघटन या बळावर त्यांनी पक्षातील स्पर्धकांनाही अंतरावर ठेवण्यात यश मिळविले. पंकजा मुंडे यांच्याबाबतचा सिलसिला कालपर्यंत सुरुच होता. तर, एकनाथ खडसेंचे उदाहरणही समोर आहे. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा मंडळींना उमेदवारी टाळणे असो की विधान परिषद व राज्यसभेसाठी गोपीचंद पडळकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय अशांची वर्णी असो देवेंद्र फडणवीसांच्या यादीवरच श्रेष्ठींकडून मोहोर उमटायची. कारण, या आठ वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनिष्ठा, नेतृत्वगुण सिद्ध केले होते. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीनंतरही विरोधी पक्षनेते म्हणून सक्षम काम करतानाच सरकारइतकेच विरोधी पक्षाला केंद्रस्थानी ठेवण्यात त्यांना यश मिळाले.

दरम्यान, या काळात त्यांना केंद्रात बोलावणे आल्याचे सांगितले जात होते. मात्र, इतर पक्षांतून त्यांच्यामुळेच भाजपमध्ये आलेल्या पाटील, विखे व इतरांना ते राज्यातच हवे होते. दरम्यान, राज्यात दहा दिवसांपासून प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. याचे केंद्रस्थान देवेंद्र फडणवीस व भाजप असल्याचे लपून नाही. ‘मी पुन्हा येणार’...ही घोषणा त्यांनी सत्यापर्यंत आणली होती. मात्र, भाजप व आपण स्वत: सत्तेसाठी हापालेलो नाहीत, हे दाखविण्यासाठी व शेवटच्या टप्प्यात शिवसेनेला मिळत असलेली सहानुभूती संपविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीस हे समीकरण आधोरेखीत होत होते.

मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मराठा समाजातील एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन समाजातील आपल्या प्रतिमेलाही उजाळा दिला. शिवाय पवारांप्रमाणे सरकारच्या बाहेर राहून सरकारचे कंट्रोलर म्हणून त्यांना पवारांच्या रांगेत बसण्याची संधी होती होती. मात्र, हे सगळे घडत असतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असा श्रेष्ठींचा निरोप आला. देवेंद्र फडणवीस यांच्या आठ वर्षांतील सुसाट गाडीला हा मोठा ब्रेक मानला जात आहे. सध्याची राजकीय स्थिती व नवे समीकरणे पाहता उद्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट हा तगडा राहील यात शंका नाही. त्यामुळे २०२९ मध्ये देवेंद्र फडणवीस केंद्रात स्पर्धक होतील, या भीतीनेच त्यांना उपमुख्यमंत्री करुन त्यांच्या गाडीला ब्रेक लावल्याचे बोलले जात आहे. मात्र, यात काहीसा दम असला तरी याचे चांगले- वाईट परिणाम दिसायला आणखी वेळ आहे. आता नव्याने अस्तित्वात आलेल्या सरकारची कामगिरी व उद्याच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरी आणि या काळात देवेंद्र फडणवीस यांना काम करण्यास पक्ष किती स्पेस आणि बळ देतो, यानंतर त्यांचे खच्चीकरण केले जात आहे, हे म्हणण्यास वाव आहे.

पक्षश्रेष्ठींच्या फोननंतर त्यांनी लागलीच दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारुन आपली पक्षनिष्ठा अधिक दृढ केली असाही याला एक अँगल आहे. विशेष म्हणजे राज्यातील घटनांबाबत पंतप्रधान कधीही लक्ष घालत नसतात. मात्र, त्यांनीही देवेंद्र फडणवीसांना फोन करणे हा देखील फडणवीसांच्या बाजूने जमेचा मुद्दा असल्याचे जाणकारांचे मत आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शिवसेना फोडणे, तीन पक्षांचे सरकार पाडणे यात गुरुवारपर्यंत देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी मानले जायचे. फडणवीस मुख्यमंत्री असते, तर भविष्यात विरोधकांचे ते पहिले टार्गेट राहिले असते. परंतु आता ते दुसऱ्या क्रमांकाचे टार्गेट राहतील, असेही जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT