Maharashtra politics : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. त्याआधीच काही मिनिटांपर्यंत युती-आघाड्यांचे भिजत घोंगडे होते. प्रामुख्याने महायुतीत अनेक ठिकाणी तोडगा न निघाल्याने युती तुटल्याची घोषणा खुद्द स्थानिक नेत्यांनीच केली आहे. भाजपसह शिवसेनेच्या इच्छुकांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काही मोजके अपवाद वगळता भाजप व शिवसेना आमनेसामने असणार, हे सध्याच्या घडीचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्याची घोषणा खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनी केली. त्यापाठोपाठ अमरावती, नवी मुंबई, जालना, पुणे, नाशिक, नवी मुंबई, सांगली, पिंपरी चिंचवड, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, धुळे, उल्हासनगर, नांदेड आदी महापालिकांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याच्या बातम्या येत आहेत. स्थानिक नेत्यांकडूनच तसेच संदेश दिले जात आहेत. काही ठिकाणी भाजप नेत्यांकडूनही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी मात्र आज पुण्यात मीडियाशी बोलताना संभ्रमात टाकणारे विधान केले आहे. युती तुटल्याची घोषणा नेते करतात. पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात काही वक्तव्ये केली असतील तर ती अधिकृत मानू नये. कुठेच युती तुटली नाही. अर्ज भरण्याची मुदत संपत असल्याने एबी फॉर्म वाटल्याचे सामंतांनी सांगितले. एवढेच नाही तर आमच्याकडे अजून तीन दिवस असल्याचे सांगत त्यांनी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तोडगा काढतील, असा आशेचा किरणही दाखविला आहे.
थोडक्यात छाननी आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंतच युतीच्या चर्चा सुरूच राहणार असल्याचे संकेत सामंतांनी दिले आहेत. फडणवीस आणि शिंदे या तीन दिवसांत सर्व चक्रं फिरवून विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवितील, असेच सांगण्याकडे त्यांचा रोख होता. पुढील तीन दिवसांत जागावाटपावर तोडगा काढून अर्ज भरलेल्या इच्छुकांना ते मागे घेण्यास सांगितले जाऊ शकते. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचाही पर्याय समोर येऊ शकतो. त्यासाठी दोन्ही नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला जेमतेम १० ते १५ जागा द्यायला तयार आहे. पण सेनेला अधिक जागा हव्या आहेत. रविंद्र धंगेकर यांच्या लेकाला उमेदवारी देण्यावरूनही मोठा ताणतणाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळेही ही चर्चा पुढे सरकरत नाही, असे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी जागा मिळत असल्याने युती तुटल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. हीच स्थिती बहुतेक ठिकाणची आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत वादातील जागांबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी फडणवीस आणि शिंदे प्रयत्नशील असतील. तोडगा न निघाल्यास दोन्ही पक्षांना निवडणुकीत काही महापालिकांमध्ये मतविभाजनामुळे नुकसान सहन करावे लागू शकते.
दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची युती अनेकठिकाणी होऊ नये, यासाठी विरोधकही देव पाण्यात ठेऊन असल्याचे सांगितले जात आहे. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आदी महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचीही ताकद आहे. तिथे युती तुटल्यास मतविभाजनाचा फटका दोघांनाही बसू शकतो. या मतविभाजनाचा फायदा आपल्याला होईल, अशी आशा महाविकास आघाडीतील पक्षांना आहे. पण महाराष्ट्रातील भाजपचे चाणक्य असलेल्या फडणवीसांकडून विरोधकांना ती संधी दिली जाणार नाही. पुढील तीन दिवसांत शिंदेसोबत चर्चेतून ते मार्ग काढून युती भक्कम करतील, असे मानायला हरकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.