BJP Political News : महाराष्ट्राच्या खडकाळ भूमीत 133 कमळे उगवतील हे भारतीय जनता पक्षाला 15 वर्षांपूर्वी सांगितले असते तर सामान्य कार्यकर्त्याला पटलेही नसते. मात्र, दिल्लीत भाजपचा नियोजन आराखडा तयार होता. त्याचे मूर्तरूप आता दिसले असून भारतीय जनता पक्षाने लढविलेल्या जागांपैकी जवळपास 70 टक्के जागा जिंकण्याचा विक्रम घडविला आहे.
साधारण 26 .22 टक्के मते मिळवत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. या यशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशल नियोजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलेली साथ, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन नेत्यांचे बारीक लक्ष आणि असंख्य कार्यकर्त्यांचे प्रयत्न दडलेले आहेत.
महाराष्ट्रात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस निवडून आले होते. ‘मी पुन्हा येईन’चा नारा प्रत्यक्षातही आला होता. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा पुढे आणला. यामुळे युती तुटली आणि भाजपच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावला गेला. विरोधी बाकांवर फेकल्या गेलेल्या भाजपला त्यानंतर नव्याने फेरबांधणी करावी लागणार होती.
शिवसेनेने दिलेल्या धोक्याचा हिशेब चुकता करण्यासाठी दोन पक्ष फोडून भाजप पुन्हा सत्तेत आला, पण विभाजित शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी या नव्या चेहऱ्याचे स्वागत केले तरी आपले मुख्यमंत्रिपद गेले ही खंत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होती.
केवळ काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपयश पाहावे लागल्यानंतर ही खंत कुठेतरी अधिकच बोचरी झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीला केवळ काही महिने शिल्लक असताना हिंदुत्वाचा गजर करीत ओबीसी समाजाची मोट बांधत भाजपने जे यश मिळवले आहे, ते विक्रमी तर आहेत पण अभूतपूर्वही आहे.
मध्य प्रदेश, गुजरात या भाजपच्या प्रयोगशाळा मानल्या जातात. तेथे राबविलेली समीकरणे अन्य राज्यांमध्ये तशीच राबवली जातात. महाराष्ट्राची भूमी वेगळी होती. येथे काँग्रेसच्या अधिपत्याखालील सहकार क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्रात हाती काही येणे शक्य नव्हते आणि विदर्भ तर काँग्रेसचा गड होता. या परिस्थितीला उलटविण्यासाठी उजव्या परिवाराच्या मदतीने भाजपने जे प्रयत्न केले त्याचे परिणाम आजच्या निकालात दिसत आहे.
‘400 पार’च्या आसपास जाता न आल्याचे अपयश आजच्या निकालांनी धुवून काढले आहे. देशात अजूनही मोदीत्वाची लाट असल्याचे निकालांनी दाखवून दिले आहे. हे दाखवून देण्यातला मोठा कार्यभाग देवेंद्र फडणवीस यांनी साधल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे पक्षकार्यकर्त्यांना वाटते.
आता सर्वत्र चर्चा सुरू आहे ती प्रदेशनिहाय मिळालेल्या यशाची. विदर्भ ही भारतीय जनता पक्षाला कायम साथ देणारी भूमी त्यांनी काबीज केलीच आहे. पण त्याचबरोबर मराठा आंदोलनाने अस्वस्थ झालेला मराठवाड्याचा भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचा पट्टादेखील निकालांनी भाजपने अनुकूल केला आहे. पाच वर्षांपूर्वी जिंकूनही पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही, याचे शल्य केवळ कार्यकर्त्यांच्या मनात नव्हते तर नागरिकांच्याही मनात होते, असा आजच्या निकालांचा सोपा अर्थ काढला जाऊ शकेल.
लोकसभेत ‘मविआ’पेक्षा भाजप केवळ एक टक्का मतांनी मागे होता. त्या एक टक्क्याची भरपाई करत यावेळी पक्षाने महाराष्ट्रातल्या बहुतेक भागात बाजी मारली. जिल्हानिहाय अवलोकन केले तर आता प्रत्येक जिल्ह्यात कमळ फुलले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या जातीमुळे त्यांना यश मिळत नाही, असे साधारणतः बोलले जात होते. मात्र, ही अडथळ्याची शर्यतही भारतीय जनता पक्षाने या वेळेला पार केली असून नेतृत्वाचा चेहरा हा सर्वमान्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
फडणवीस नागपुरातून प्रदेशाध्यक्ष पदांवर पोहोचल्यानंतर त्यांना पक्षबांधणी करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नव्हता. शिवाय पक्षातील अन्य कार्यकर्ते समवयस्क किंवा ज्येष्ठ नेते त्यांच्या उदयावर काहीसे नाराज होते. आजच्या निकालांनी ही नाराजी दूर केली असून महाराष्ट्राने फडणवीस यांच्या चेहऱ्याला सर्व मान्यता दिली, असल्याचा एक संदेश दिला आहे.
कार्यकर्त्यांना सत्तेची फळे न मिळणे बाहेरून आलेल्या मंडळींना लढण्याची संधी देणे सत्ता पदे त्यांच्याकडे जाणे अशा अनेक गोष्टी कुरकुरीचा विषय ठरल्या होत्या. ही नाराजी दूर करण्याची संधी लोकसभेमधील अपयशाने दिली असावी, असे बोलले जाते. त्या निवडणुकीतील अपयशामुळे भाजपचा कार्यकर्ता एक झाला आणि आपल्याला काय मिळाले याचा विचार न करता ताकदीने विधानसभेच्या निवडणुकीत उतरला, असे सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यसभेत तर बहुमत मिळवू शकणार आहेत. आजच्या या निकालांनी कदाचित भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर चमकू शकणारा दुसऱ्या पिढीतला नेता दिला आहे. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे हे देखील अकाली गेले. त्यानंतर नितीन गडकरी हे राष्ट्रीय पातळीवर गाजणारे मराठी नेते ठरले. आता फडणवीस राजकीय क्षितिजावर दीर्घ कारकीर्द गाजवू शकतील, असे दिसत आहे.
भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात प्रचंड यश मिळाले. 2014 मध्ये भाजप स्वबळावर लढली. तेव्हाच्या यशावरही यंदा भाजपने मात केली आहे. आता या आधारावर पक्ष प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात पोहोचला असून या विजयाच्या शिल्पकाराचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्विवादपणे दिले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.