पांडुरंग म्हस्के -
Ajit Pawar, NCP and Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण आलेले वाल्मिक कराडांच्या कथित सहभागावरून मंत्री धनंजय मुंडे आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवले आहे. मात्र मुंडे यांचा राजीनामा घेणार नाहीत, अशी भूमिका पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. मुंडे, पवार व पक्षही या प्रकरणात अडकत चालला आहे.
मस्साजोगचे (ता.केज, जि.बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज ढवळून निघाला आहे. त्यातच अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव या प्रकरणात जोडण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ सुरु आहे. कराड यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र अद्याप कराड यांचे नाव थेटपणे पुढे आलेले नाही.
या आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई सुरु केल्याने पुढील काळात (दबावरहित आणि निष्पक्ष तपास झाल्यास) कराड यांचा संबंध या प्रकरणाशी जोडला जाऊ शकतो. कराड यांचा संबंध जोडला गेल्यास मात्र धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांचा राजीनामा अपरिहार्य ठरणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी ही मोठी नाचक्की ठरणार आहे.
या गुन्ह्यातील आरोप सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, त्याचबरोबर त्यांचे नाव कुठे आल्याशिवाय चौकशी होणार नाही असे सांगत अजित पवार मुंडे यांची पाठराखण करीत असले, तरी नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर धरणातील पाण्याबाबत चुकीची टिप्पणी केल्यानंतर स्वतः प्रीतिसंगमावर जाऊन आत्मक्लेश केल्याचे अजित पवार विसरले असावेत, असेच त्यांच्या विधानावरून वाटत आहे.
मुळात संतोष देशमुख (Santosh Deshmukh)यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी एका विशिष्ट समाजाचे असल्याने त्याला जातीचा रंग दिला जात आहे. गुन्हेगाराला जात नसते असे फक्त बोलण्यापुरते असले, तरी या प्रकरणी सर्वच राजकारणी याच मार्गाने जात दोन्ही समाजाचे ध्रुवीकरण करण्यावरच जोर देत आहेत. त्यातही काही समाजाच्या नेत्यांना जोर देऊन या घटनेच्या विरोधात आवाज उठविण्यास मोकळे रान देऊन समतोल राखण्याचा राजकीय डाव यातून सुरु आहे. मात्र ही गोष्ट अजित पवार यांच्यासारख्या राजकारण्यांच्या ध्यानात येत नसेल का? मात्र तरीही ते या प्रकरणी कोणतीही ठोस भूमिका व्यक्त करताना दिसत नाहीत. गुन्हा सिद्ध झाला तर नैतिक राजीनामा देऊ म्हणण्यापेक्षा माझ्यावर लांछन आले म्हणून आधीच राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यास प्रतिमासंवर्धन होऊ शकते.
एकंदर राजीनामा दिला म्हणजे राजकीय प्रवास संपतो असे अजिबात नाही. मात्र जनक्षोभ शांत होण्यास आणि सामाजिक नैतिकतेला उभारी मिळत असते. राजकीय जीवनात याला फार महत्व असते. याचाच विसर सध्याच्या राजकारण्यांना पडला की काय असे वाटत राहते. अनेकदा एखाद्या नेत्यावर राजकीय आरोप झाले की दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे उदाहरण दिले जाते. मात्र त्यांच्यासारख्या नीतिवान राजकारण्यांशिवायही राजकारणातील अनेक मंडळींनी आपले राजीनामे दिल्याची उदाहरणे कमी नाहीत.बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. बॅरिस्टर रामराव आदिक उपमुख्यमंत्री असताना एका एअर होस्टेसची छेडछाड केल्याचा आरोप झाल्याबरोबर आपल्या पदाचा राजीनामा दिला.
शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलीच्या वैद्यकीय परीक्षेत गुण वाढवल्याचा आरोप झाला, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना यांच्या जावयाच्या अनधिकृत बांधकामाचे प्रकरण उजेडात आल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना यांच्यावर आदर्श इमारतीच्या बांधकामाच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला. बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन यांनी आरोप झाल्यावर मंत्रिपदाचे राजीनामे दिले. मागच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील मंत्री संजय राठोड, अनिल देशमुख यांनीही आरोप होताच राजीनामे दिले होते. तेलगी प्रकरणी भुजबळ याना राजीनामा द्यावा लागला.
देशमुख हत्याप्रकरणाशी कराड यांचा कथित संबंध आणि कराड यांच्याशी असलेले धनंजय मुंडे यांचे संबंध या सर्व प्रकरणाकडे पाहिल्यास एका सत्ताकथेचे वाचन सुरू असल्याचे लक्षात येते. स्वतःच्या पक्षातील शत्रू आणि शत्रू पक्षातील मित्र असे प्रकरण दिसत आहे. एकीकडे संपूर्ण अधिवेशन संतोष देशमुखला न्याय देण्यात कसर का केली जात आहे? मुंडेंच्या मित्रपक्षातीलच एक आमदार त्यांच्या विरोधात याप्रकरणी रान उठवीत आहे.
या निमित्ताने मराठा समाज एकत्र करण्याचे चित्र उभे करताना ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुकीत करून घ्यायचा डाव तर सत्तापक्ष करीत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. मात्र ज्या भुजबळांनी ओबीसी समाज एकत्र करून महायुतीला फायदा विधानसभेत फायदा करून दिला. तीच रणनीती पुन्हा होणार का, असा प्रश्न आहे. मात्र भुजबळांना निवडणुकीनंतर ज्या वाटेने जावे लागले त्याच वाटेने मुंडेंंना जावे लागणार नाही कशावरून? मात्र, तूर्तास मुंडेंनी राजीनामा देऊन प्रकरण शांत करणे हेच त्यांच्या राजकीय हिताचे ठरणार आहे
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.