Archana Patil News: Sarkarnama
विश्लेषण

Dharashiv Lok Sabha 2024: उस्मानाबादेत महायुतीला अपशकुन; राणा पाटील यांच्या नेतृत्वाला सावंतांचे आव्हान?

Archana Patil News: उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा प्रचार सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते, डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आक्रमक झाले आहेत. मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

अय्यूब कादरी

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघ (Dharashiv Lok Sabha 2024) चर्चेत आला तो महायुतीतील स्पर्धेमुळे. जागा आपल्याच पक्षाला सुटावी, यासाठी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना अगदी सुरुवातीपासून जोर लावला. अखेर मतदरासंघ राष्ट्रवादीला सुटला आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajitsinh Patil) यांच्या पत्नी अर्चनाताई यांना उमेदवारी जाहीर झाली.

तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जागा राष्ट्रवादीला सुटली असली तरी उमेदवारी आपल्याच घरात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड दाखवून दिली, सिद्धही केली. यातूनच महायुतीत आता अंतर्गत कुरघोड्या सुरू झाल्या असून, त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महायुतीचे जागावाटप आणि उमेदवारी रखडल्यामुळे चर्चेत आलेला उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे आणि भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.

अर्चनाताई यांचा प्रचारही सुरू झाला आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि तिकडे शिंदे गटाकडून विरोध सुरू झाला. हा विरोध पालकमंत्री सावंत (Tanaji Sawant) यांच्या गटाकडून सुरू आहे. शिंदे गटातच असलेले शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी अर्चनाताई यांच्या उमेदवारीला विरोध केलेला नाही. एखादी गोष्ट विनाकारण शेवटपर्यंत ताणून महायुतीचे वातावरण बिघडवण्यात काहीही अर्थ नाही, असे उमरगा येथील शिंदे गटाचे नेते जितेंद्र शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. अर्चनाताई पाटील आणि आमदार पाटील यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

पालकमंत्री सावंत आणि आमदार पाटील यांच्यात यापूर्वी वादाचे प्रसंग घडले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात सावंत यांनी त्यांच्या भूम-परंडा या विधानसभा मतदारसंघाला अधिकच झुकते माप दिले होते. आमदार पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला होता. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा ठरवण्यावरूनही या दोघांत वाद झाला होता.

अखेर आमदार पाटील यांनी ठरवलेलीच जागा निश्चित करण्यात आली. पालकमंत्री सावंत यांना माघार घ्यावी लागली होती. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले, त्यात सावंत यांची भूमिका महत्त्वाची होती, असे त्यांनीच अनेक वेळा जाहीररित्या सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व आपल्याकडेच असावे, अशी त्यांची भावना असू शकते.

आमदार पाटील यांचे वडील, राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे दिग्गज नेते आहेत. जिल्ह्यावर अनेक वर्षे त्यांचे एकहाती वर्चस्व होते. ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर डॉ. पाटील यांच्याच शब्दाला किंमत होती. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्याची धुरा राणाजगतिसिंह यांच्याकडे आली. पक्षात ते म्हणतील तेच अंतिम असायचे.

2019 मध्ये राणाजगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात, भाजपची जिल्ह्याची सूत्रेही त्यांच्याच हाती आली. निष्ठावंतांनी थोडी हालचाल करून पाहिली, मात्र राणाजगजितसिंह यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाले आहे, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे भाजपमध्येही राणाजगजतिसिंह यांचाच शब्द अंतिम असल्याचे दिसत आहे. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटूनही उमेदवारी अर्चनाताई यांना मिळाल्यामुळे राणाजगजितसिंह यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. यातूनच आता या कुरघोड्या सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा अनेक दिवस कायम होता. मतदारसंघ कोणाला सोडायचा, यावर लवकर एकमत झाले नाही, कारण तिन्ही पक्षांनी मजबूत दावेदारी केली होती. अजितदादा पवार यांच्या आग्रहामुळे अखेर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली, मात्र उमेदवारीसाठी इच्छुक असलेले या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचा विचार झाला नाही.

अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. यामुळे नाराज झालेल्या प्रा. बिराजदार यांच्या काही समर्थकांनी पदांचे राजीनामे दिले. प्रा. बिराजदार यांनी नाराजी दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे काम प्रमाणिकपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रा. रवींद्र गायकवाड हेही इच्छुक होते. उमेदवारी नाही मिळाली तरी त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचा निर्णय मान्य केला.

भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कापावी लागली आहे. त्यामुळे धनंजय सावंत यांच्या आताच्या शक्तिप्रदर्शनाला काही अर्थ आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्या खासदारांच्या जागा वाचवू न शकणारे मुख्यमंत्री शिंदे राष्ट्रवादीला सुटलेला उस्मानाबाद मतदारसंघ आपल्याकडे घेऊ शकतील का, याचे उत्तर सर्वांनाच माहीत आहे, तसे ते सावंतांनाही माहीत आहे.

आमदार पाटील यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचे किंवा आणखी एखादा विधानसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी सावंत यांचे हे शक्तिप्रदर्शन असावे, अशी चर्चा आहे. भूम-परंडा हा पालकमंत्री सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आता त्यांची नजर धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघावर असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका मात्र महायुतीला बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT