Shinde's Strategy Sarkarnama
विश्लेषण

Shinde's Strategy : शिंदेंचे ‘स्वबळ’ ही भाजपची स्ट्रॅटेजी

Shinde’s ‘Self-Reliance’ is BJP’s Strategy : पालिकेतले शिवसेनेचे मानेवरचे जोखड भाजपने मोठ्या हिकमतीने उतरवले होते. तेच जोखड आता पुन्हा हाताने मानेवर भाजप ठेवणार का? हे आगामी राजकारणातले मोक्याचे वळण ठरणार आहे

दीपा कदम

२०१७ मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र लढवली होती. महापालिकेत २५ वर्षे हातात हात घालून असलेली युती एकमेकांच्या समोर उभी राहिली होती. पालिकेतले शिवसेनेचे मानेवरचे जोखड भाजपने मोठ्या हिकमतीने उतरवले होते. तेच जोखड आता पुन्हा हाताने मानेवर भाजप ठेवणार का? हे आगामी राजकारणातले मोक्याचे वळण ठरणार आहे

भाजपच्या मानेवर शिवसेनेचे वेताळ बसले आहे, त्याला टिचकी मारुन दूर करणे महापालिका निवडणुकांसाठी तरी भाजपच्या हिताचे ठरणार नाही, हे ओळखून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आव्हानाचा पूर्ण निकाल लावणे हे देखील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसमोरचे आव्हान असणार आहे. ‘स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते’ हे बाळासाहेबांच्या ९९ व्या जयंतीला एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाकडेही पाहण्याची आवश्यकता आहे. हेच ‘स्वबळ’ शिवसेना शिंदे गटही आजमावण्याची दाट शक्यता आहे. त्याच दिशेने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नियोजन सुरु आहे.

एकत्र लढायचे की वेगवेगळे ?

विसर्जित झालेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेकडील ८४ पैकी ४० नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवाय २० माजी नगरसेवक देखील शिंदे गटाकडे आले आहेत. ६० ते ६२ जागांवर शिवसेना शिंदे गटाकडे आताच उमेदवार तयार झाले आहेत. येत्या काही दिवसात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांची ही ताकद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत जागा वाटपाची बोलणी करतील. पण मुंबईत सर्वाधिक आमदार निवडून आल्याने शिंदे यांना सोबत घेण्याचे भाजप टाळण्याचीच शक्यता अधिक आहे. शिवाय ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेंनी स्वतंत्र आव्हान उभे केल्याचा फायदाही भाजपला होण्याची शक्यता असल्याने ‘स्ट्रॅटेजी’ म्हणूनही भाजप शिवसेनेला स्वतंत्र लढवण्याची दाट शक्यता आहे.

भाजपतील एका वरिष्ठाने यामागची दोन कारणे स्पष्ट केली, गेली २५ वर्षे भाजप आणि शिवसेना महापालिकेत एकमेकांवर अवलंबून राहिली. मात्र २०१७ मध्ये राज्यात सत्तेत असताना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यावेळी थोडक्यात भाजपच्या हातून महापालिका गेली होती. मुंबईत विधानसभेत भाजपच्या १५ जागा निवडून आलेल्या असताना आता मागे वळून पाह्याची गरजच नाही. मुंबईत काँग्रेसचे आव्हान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघापुरते आहे. ठाकरे गटाला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा वापर करता येईल. त्यासाठी शिंदे गट स्वतंत्र लढला तर त्या दोघांच्या लढाईत भाजपचा नगरसेवक निवडून येईल. शिंदे गटासोबत निवडणुकीनंतर युती करण्याचा मार्गही त्यामुळे मोकळा राहिल. या व्यूहरचनेवर भाजप आणि शिंदेंमध्ये सुध्या विचारमंथन सुरु असल्याचे समजते.

जयंती मेळाव्यात एकमेकांना डिवचले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी पुढील तीन ते चार महिन्यात त्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच दृष्टीने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचा रोखही त्याच दिशेने होता. एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याची संधी सोडली नाही.

स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. ‘तुम लढो हम कपडे संभालते है’ असे चालत नाही. तुम्ही विधानसभेला ९७ जागा लढवल्या २० जिंकल्या. आम्ही ८० जागा लढवल्या आणि तब्बल ६० जागा जिंकल्या. आता सांगा खरी शिवसेना कोणाची? असे सुनावत उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला आहे. विधानसभेत एवढे मोठे यश मिळाल्यानंतर शिंदेंनी स्वत:ची पाठ थोपटवून घेणे साहजिकच आहे. मात्र शिवसेना शिंदे गट ज्या गतीने हातपाय पसरवतो आहे ते पाहता त्यांचे शिवसेना उद्धव ठाकरें इतकेच भाजपसाठी मोठे आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नाकारले गेल्यानंतर त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपकडून भविष्यात आपल्यालाच संपवले जाण्याची त्यांनाही धास्ती असल्यानेच यापुढच्या काळात ते केवळ स्वत:चा वापर करु देणार नाहीत. ठाणे, कल्याण डोंबिवलीसोबतच मुंबई , नवी मुंबई महापालिका आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे शिंदे यांचे लक्ष आहे.

ठाकरेंना एकटे गाठण्याचा प्रयत्न

शिवसेना फुटीची कथा मुंबई महापालिकाच्या निकालाशिवाय पूर्ण होणार नाही. आतापर्यंत तरी ही कथा पटकथाकाराच्या हुकूमानुसार पुढे जाते आहे. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यात स्वबळावर निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ठाकरेंना एकटे गाठण्याचा प्रयत्न भाजपचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेपासून ‘ठाकरे’ घराणे पूर्णपणे दूर करणे हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीसमोरचा प्रमुख अजेंडा असू शकतो. भाजपची ही अघोरी इच्छा शिंदेच्या मार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. मात्र राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच नसतात. त्यामुळे आतापर्यंतची कथा ठरवल्यानुसार झाली असली तरी मतदारांना गृहीत धरता येणार नाही आणि मुंबईच्या तर अजिबातच नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT