Dnyanraj Chougule Sarkarnama
विश्लेषण

Dnyanraj Chougule 'ते' तीनवेळा लढले, जिंकले; 3 जिल्ह्यांतून शिवसेनेचे एकमेव आमदार, तरीही उपेक्षित राहिले...

अय्यूब कादरी

Maharashtra Political News : धाराशिव जिल्ह्याने शिवसेनेच्या झोळीत नेहमीच भरभरून दान टाकले आहे, पण जिल्हा उपेक्षितच राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, अनेक आमदार, खासदार निवडून आले आहेत, मात्र मंत्रिपद देण्याच्या बाबतीत पक्षाने हात आखडताच घेतला आहे.

आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले ज्ञानराज चौगुले यांना विस्तारात तरी संधी मिळेल का, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

शिवाजीबापू कांबळे, कल्पना नरहिरे, प्रा. रवींद्र गायकवाड, ओमप्रकाशराजे निंबाळकर हे शिवसेनेचे खासदार आतापर्यंत निवडून आले आहेत. प्रा. रवींद्र गायकवाड, कल्पना नरहिरे, ओमप्रकाशराजे निंबाळकर हे विधानसभेतही निवडून गेले होते.

याशिवाय ज्ञानेश्वर पाटील, दयानंद गायकवाड, कैलास पाटील आणि ज्ञानराज चौगुले यांनाही मतदारांनी विधानसभेत पाठवले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत.

शिवसेना राज्यात, केंद्रात सत्तेत सहभागी असताना यापैकी एकालाही मंत्रीपद मिळाले नाही. आता तानाजी सावंत हे शिवसेनेचे मंत्री आहेत, ते भूम-परंडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

असे असले तरी ते सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बाहेरून आलेल्या सावंत यांना मंत्रीपद मिळाले, मात्र सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार चौगुले यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) साधारण परिस्थितीतून आले आहेत. उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ते प्रयोगशाळा सहायक होते. 2009 मध्ये उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे चौगुले यांना शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी दिली.

त्यानंतर सलग तीनवेळा ते या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी होती. आता भाजपवासी झालेले माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्यामुळे काँग्रेसचे मोठे नेटवर्क होते.

तरीही चौगुले यांनी तीनवेळा विजय मिळवला. 2014 ते 2019 दरम्यान धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातून ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेचे एकमेव आमदार विजयी झाले होते. त्यावेळीही त्यांना संधी मिळाली नव्हती. उलट भूम-परंड्यातून पहिल्याच वेळी विजयी झालेले तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.

राज्यात काँग्रेस, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची ज्या ज्या वेळी सत्ता होती त्या त्या वेळी धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील हे अनेक वर्षे मंत्री होते. त्यानंतर मधुकरराव चव्हाण यांनाही संधी मिळाली.

बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनाही काँग्रेसने मंत्रीपद दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राणाजगजितसिंह पाटील यांनाही मंत्रीपद देण्यात आले होते. मधुकरराव चव्हाण हे मराठवाडी वैधानिक विकास मंडळाचे दोनवेळा अध्यक्ष राहिले आहेत.

तानाजी सावंत (Tanaji Savant) हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असे त्यांनी एकदा जाहीरपणे सांगितले होते. या उलट चौगुले हे संयमी, मृदुभाषी आहेत. असे असातानाही त्यांच्याकडे आधी उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांनीही दुर्लक्षच केले आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मराठवाड्याने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. मराठवाड्यातून महायुतीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला. मराठवाड्यातील पात्र, योग्य आमदारांना मंत्रिमंडळात संधी देण्यात महायुती सरकारकडून चूक झाली आहे, हेही त्यामागचे एक कारण असू शकते.

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी ज्ञानराज चौगुलेही त्यांच्यासोबत गेले. शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या वाट्याला समाजाचा जो रोष आला तो चौगुले यांनाही सहन करावा लागला.

साधारण परिस्थिती असतानाही शिवसेनेने, उद्धव ठाकरे यांनी त्यांना पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली होती, तरीही चौगुले शिंदे यांच्यासोबत गेले, मात्र शिंदेंनींही मंत्रि‍पदासाठी त्यांचा विचार केला नाही.

शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रि‍पदाचे डोहाळे लागले आहेत. भरत गोगावले यांच्यासारख्या काही आमदारांनी तर मंत्रि‍पदासाठी देवालाही साकडे घातले होते. मंत्रि‍पदासाठी संजय शिरसाट यांचा चिडचिडेपणा सर्वांनी पाहिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू शिंदे यांच्यासोबत गेले आणि त्यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यांनीही याबाबत शिंदे यांच्यावर वेळोवेळी रोष व्यक्त केला.

आमदार चौगुले यांनी मात्र मंत्रिपदाबाबत जाहीरपणे एकदाही अपेक्षा व्यक्त केलेली नाही. आता विस्तार झाला तर त्यांना मंत्रीपद मिळेल का, याबाबत मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात झालेली पीछेहाट महायुती गांभीर्याने घेणार का, यावर चौगुले यांना मंत्रीपद मिळेल की नाही, हे अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT