Lok Sabha Election Result : पक्ष फोडण्यात आले, पक्षांची नावे, चिन्हे पळवण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. फुटून गेलेले परत त्या-त्या पक्षांत आले तर सहानुभूती संपुष्टात येईल आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढेल.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील काही राजकीय घडामोडींनी लोकांचा जीव गुदमरून गेला होता. कधी एकदा यातून सुटका होईल, असे झाले होते. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर यातून सुटका होईल, हा नागरिकांचा अंदाज खोटा ठरू लागला आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे काही नेत्याना चेव चढला आहे. फुटून बाहेर पडलेले आमदार पुन्हा परत येणार, अशा आरोळ्या त्यांच्याकडून ठोकल्या जाऊ लागल्या आहेत.
अजितदादांनी 40 आमदारांसह राष्ट्रवादी फोडली. त्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोपांत भर पडली. कोण चूक, कोण खरे हे लोकांना सांगण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माणसे तैनात करण्यात आली. लोकसभेची निवडणूक आली आणि अपेक्षेप्रमाणे फुटीरांना ती धडा शिकवून गेली.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजितदादा पवार हे आपापल्या पक्षांतून प्रत्येकी 40 आमदार, काही खासदार घेऊन भाजपला येऊन मिळाले होते, सत्तेत सहभागी झाले होते. या फोडाफोडीचा करताकरविता भाजप होता, हे लपून राहिले नव्हते. सर्वाधिक 105 आमदार असूनही सत्तेबाहेर बसावे लागल्याचे शल्य देवेंद्र फडणवीस यांना होते. पुन्हा येण्यासाठी त्यांनी हे दोन पक्ष फोडले. दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो, असे ते एका कार्यक्रमात म्हणालेही होते. हे सर्व सुरू असताना मतदार शांत होते. ते संधीची वाट पाहत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेसोबतच या घडामोडींना सुरुवात झाली होती. तत्पूर्वी, शिवसेना-भाजपची 25 वर्षांपासूनची युती तुटली होती. महाविकास आघाडी सरकार कधी पडणार, याच्या तारखा भाजप नेत्यांकडून दिल्या जाऊ लागल्या. अखेर ते एकदाचे पडले. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतेून बाहेर पडलेले 40 आमदार त्यासाठी कारणीभूत ठरले. मग सुरू झाला 'गद्दार', '50 खोके एकदम ओके'चा खेळ! हा खेळ सुरू असतानाच पुन्हा एक राजकीय भूकंप झाला.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी मिळाली आणि मतदारांनी महायुतीला धडा शिकवला. भाजपच्या खासदारांची संख्या एकआकडी झाली. गेल्या निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. त्यात 14 ची घट झाली. काँग्रेसच्या खासदारांची संख्या एक वरून 14 झाली. पक्ष, चिन्हा नसतानाही उद्धव ठाकरे यांचे 9, तर शरद पवारे यांचे 8 खासदार निवडून आले. केंद्रात भाजपला कुबड्या घ्याव्या लागल्या, त्यासाठी महाराष्ट्रातील फोडाफोडी हेही एक महत्वाचे कारण ठरले.
भाजपने (BJp) केलेली फोडाफोडी लोकांना आवडली नव्हती, भाजपच्या पारंपरिक मतदारांनाही ती आवडली नव्हती. पक्ष फोडले ते फोडले, पक्षांची नावे आणि चिन्हेही फुटिरांना मिळावीत, अशी सोय लावून दिली गेली. त्यामुळे प्रचंड शक्ती, मोठी यंत्रणा असूनही भाजप, महायुतीची दाणादाण उडाली. काही मतदारसंघांत सर्व आमदार महायुतीचे असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
या मोठ्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आणि गेलेले आमदार परत येणार, अशी चर्चा त्यांनी सुरू केली. गेलेल्यांकडून याचा इन्कार करण्यात आला. तरीही पुन्हा पुन्हा त्याच आरोळ्या घुमू लागल्या. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे अशा आरोळ्या घुमतच राहणार आहेत.
पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रचंड साहनुभूती मिळाली. निष्ठावंतांनी जिवाचे रान केले. आता जर सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात स्थान दिले गेले तर काय होईल, याचा विचार आरोळ्या ठोकणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करायला हवा. शिंदे गट आणि अजितदादा गटातील आमदार पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांकडे आले आणि त्यांना उमेदवारी दिली गेली तर मतदार त्यांना स्वीकारतील का, हा मोठा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवार मिळतील की नाही, अशी परिस्थिती होती. उमेदवार मिळाले, निष्ठावंतांनी त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला.
आता फुटिरांना परत घेतले तर निष्ठावंतांवर अन्याय होईल आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती मिळाली ते कारणही संपुष्टात येईल. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अतिउत्साहाला आवार घालावा, विधानसभा निवडणुकीतही निष्ठावंतांना संधी द्यावी. 'ते' परत येणारच्या आरोळ्या अशाच घुमू लागल्या आणि 'ते' खरेच परत आले तर महाविकास आघाडीची अडचणच होण्याची शक्यता अधिक आहे.
(Editet By : Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.