Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde: 'हे' होणारच होते तरीही शिंदे का अडून बसले?

Eknath Shinde taking oath of Deputy CM of Maharashtra: भाजपला मिळालेले यश पाहता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, हे स्षष्ट होते. तशी खात्री झाल्यानंतर शिंदे यांचे घोडे गृहसारख्या महत्वाच्या खात्यासाठी अडून बसले, मात्र त्याचाही काही उपयोग होणार नव्हता. आपली बार्गेनिंग पॉवर संपली आहे, हे शिंदे यांनी लवकर मान्य केले नाही.

अय्यूब कादरी

Mumbai News: गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्राने सत्ताकारणातले रुसवे-फुगवे अनुभवले. आपले महत्व, अस्तिव दाखवण्यासाठी राजकीय नेते असे मार्ग अवलंबत असतात. टायमिंग योग्य असले तर अशा मार्गांना अर्थ उरतो, अन्यथा ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत गेल्या आठ दिवसांत असेच घडले.

मुख्यमंत्रिपद भाजपलाच मिळणार, गृहमंत्रिपदही भाजप आपल्याकडेच ठेवणार, हे सांगण्यासाठी कुण्या राजकीय विश्लेषकाची अथवा राजकीय तज्ज्ञाची गरज नव्हतीच. तरीही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडून बसले होते.

शिंदे यांच्या अडून बसण्याला त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने, त्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने महत्व आहे. ते उद्धव ठाकरे यांना सोडून आले त्यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार होते. भाजपपकडे त्यावेळी 105 आमदार होते. तरीही भाजपने मुख्यमंत्रिपद शिंदे यांना दिले होते. अर्थात. यात भाजपचाही स्वार्थ होताच. आम्ही एका शिवसैनिकालाच मुख्यमंत्री केले, असा संदेश भाजपला द्यायचा होता.

मुख्यमंत्रिपद भाजपने घेतले असते तर शिवसेना फोडल्याचे खापर भाजपच्या डोक्यावर उघडपणे फुटले असते. आता तशी परिस्थिती होती का? याचे उत्तर नाही असे आहे. त्यामुळे शिंदेंच्या अडून बसण्याला भाजपच्या लेखी फारसे महत्व नव्हते.

भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले आहेत. अजितदादा पवार यांनी तातडीने वस्तुस्थिती स्वीकारली. एखाद्या महत्वाच्या खात्यासाठी ते अडून बसल्याचे गेल्या 10-12 दिवसांत ऐकिवात आले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देत मोठी खेळी केली. त्यामुळे खरी अडचण झाली ती एकनाथ शिंदे यांची. त्यांची बार्गेनिंग पॉवर झटक्यात संपुष्टात आली आणि ते बाजूला पडले. आपण सहजासहजी बाजूला पडणार नाही, हे दाखवून देण्यासाठी मग शिंदेंची धडपड सुरू झाली.

अपेक्षेप्रमाणे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यासाठी 10-12 दिवस खल सुरू होता, हा भाग वेगळा. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरू शकले नाहीत, कारण येथे देवेंद्र फडणवीस होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी तशी चाचपणी करून पाहिली. फडणवीस यांची पक्ष-संघटनेवर कमालीची मजबूत पकड आहे. हे भाजपच्या दिल्लीश्वरांच्या लक्षात आले, अजितदादांच्या लक्षात आले, मग शिंदेंच्या लक्षात आले नाही, असे कसे म्हणता येईल? शिंदेंच्याही ते लक्षात आले होते, मात्र निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळेल, असा विश्वास शिंदेंना होता. तो फोल ठरणारच होता.

किमान महत्वाची खाती तरी आपल्याला मिळावीत, यासाठी मग शिंदेंनी प्रयत्न सुरू केले. त्यांचा प्रवास गृह खात्यावरून महसूल खात्यापर्यंत आला. महसूलही त्यांना मिळण्याची शक्यता कमीच आहे. तरीही प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीपैकी कोणताही एक पक्ष सोबत आला तर भाजपकडे बहुमतापेक्षा अधिक जागा होतात. खरेतर येथेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची बार्गेनिंग पॉवर संपली होती. अजितदादांनी त्याचा स्वीकार केला. मात्र आपण ते सहजासहजी स्वीकारणार नाही, हे शिंदेंना दाखवून द्यायचे होते.

लढवय्या पक्ष, अशी शिवसेनेची ओळख शिंदेंना कायम ठेवायची होती. मात्र, हाती प्रत्यक्ष काय लागणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. महत्वाची खाती मिळालीच नाहीत तर शिंदेंचा रुसवा-फुगवा केवळ औपचारिकता होती, हे लोकांच्या लक्षात येईल. उद्धव ठाकरे सोबत असते तर महायुतीला आणखी जागा जास्त मिळाल्या असत्या, असे वक्तव्य भाजपच्या एका नेत्याने मध्यंतरी केले. त्याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना समजलेलाच असणार. इतके सगळे होऊनही शिंदे यांनी ताणून धरले.

विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. त्या अर्थाने महायुतीला मिळालेले यश हे शिंदे यांचे आहे, असे म्हणता येऊ शकते. शिंदे यांना हे यश आपल्यामुळेच मिळाले, असा ठाम विश्वास असेल तर त्यांनी एक घाव दोन तुकडे करायला हवे होते. मुख्यमंत्रिपद द्या, अन्यथा सत्तेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका त्यांना घेता आली असती. तो शिवसेनेचा लढवय्येपणा ठरला असता. पण तसे झाले नाही. शिंदेंनी वस्तुस्थिती स्वीकारली नाही आणि शिवसेनेचा लढवय्येपणाही दाखवला नाही. वस्तुस्थिती तशी नव्हती, हे दाखवण्याचा केवळ प्रयत्न शिंदे यांनी केला. अर्थात त्याचे परिणाम काय होणार, हे भविष्यात दिसून येईल.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT