Daos Tour. Sarkarnama
विश्लेषण

Daos Tour : मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा; कोट्यवधींची ‘ट्रिप’, लाखोंसाठी ‘होप’

Industrial Development : मिलिंद देवरांचा खासगी दौरा, बैठक मात्र सरकारी

Sachin Deshpande

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील उद्योग वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळ दावोस येथे गेले आहे. या दौऱ्यात साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार झालेत. त्यातून दोन लाखांची रोजगार निर्मिती होईल, असा सरकारचा दावा आहे. सामंजस्य करारानंतर यापैकी खरोखरच किती गुंतवणूक महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्रातील बेरोजगार लाखो युवकांचे भविष्य बदलते हे मात्र पाहण्यासारखे ठरेल.

या दौऱ्यांच्या शिष्टमंडळावर यापूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरोपांच्या फैरी झाडत, कोट्यवधींच्या ‘ट्रिप’ वर आक्षेप घेतला. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयास किती लोकांना मान्यता दिली, याची विचारणा केली. दौऱ्यात नुकतेच शिवसेना एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले माजी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांची उपस्थिती दिसून आली. त्यांनी हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगितले. पण ते सरकारी बैठकांमध्ये उपस्थित कसे? असा प्रश्न निर्माण होतो. अशातच एका मद्यनिर्मिती कंपनीसोबत केलेला करार भविष्यात राजकीय वादाचा विषय ठरु शकतो.

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आजपर्यंत महाराष्ट्राने साडेतीन लाख कोटीचे सामंजस्य करार केले. याव्यतिरिक्त एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले आहे. असा दावा राज्य सरकारचा आहे. हा दावा करताना राज्यातील दोन लाख लोकांना रोजगार प्राप्त होईल, अशी ‘होप’ जाहीर करण्यात आली आहे. दावोस येथील महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी, ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल, त्याचबरोबर ‘लिंकस्टाईन’चे युवराज यांच्याशी देखील औद्योगिक गुंतवणुकीबाबत संवाद साधला.

ह्युंदाई, आयनॉक्स एअर प्रोडक्ट, बी. सी. जिंदाल, जेएसडब्ल्यू स्टील, एबी इन बेव्ह (पेय आणि मद्यनिर्मिती), गोदरेज एग्रोव्हेट, अमेरिका स्थित डेटा कंपनी याची गुंतवणुक आणण्यात सरकारला यश आले आहे. त्याच बरोबर अदानी ग्रुप, स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडियन ज्वेलरी पार्क, वेब वर्क्स, लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआर, केएसएच, प्रगती, नैसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी यांची गुंतवणूक ओढण्यात सरकार यशस्वी झाल्याचा दावा केला गेला. अमेरिकास्थित प्रेडिक्शन्स, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी, व्हीएचएम ओमान, सूरजागड इस्पात, कालिका स्टिल, मिलियन स्टिल, ह्युंदाई मोटर्स, कतारची एएलयु टेक, सीटीआरएल एस या सर्व कंपन्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला आहे.

विविध उद्योगांनी एक लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले आहे. यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे. असा दावा सरकारचा आहे. मुळात ही गुंतवणूक महाराष्ट्रात झाली तर महाराष्ट्रातील त्या त्या भागातील दरडोई उत्पन्न वाढीचा मार्ग मोकळा होईल. इतकेच नाही तर त्या त्या भागात बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल.

राज्यातील 12 कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल. एमएसटीएआर हा एक नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे. दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. याशिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील.

काँग्रेसमधुन काही दिवसांपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेले उद्योजकस्नेही मिलिंद देवरा हे खासगी दौऱ्यावर दावोस मध्ये गेले आहे. पण, त्यांची महाराष्ट्राच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या दालनात मुख्यमंत्र्यांच्या सोबत तसेच उद्योजकांच्या सोबतचे फोटो त्यांनी स्वतःच ट्विटर (एक्स) अकाऊंटवर टाकत ते सरकारी बैठकांमध्ये कसे ? असा प्रश्न उपस्थित करण्याची संधी विरोधकांना दिली आहे. देवरा यांनी खासगी दौरा सांगत सरकारी बैठकांमधील उपस्थितीने त्यांनी विरोधकांना आयते कोलित का दिले? असा प्रश्न आहे. हे करताना देवरा यांनी उद्योजकस्नेही ही भूमिका स्वतःसाठी फायदेशीर केली की महाराष्ट्रासाठी हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT