संजय परब
Mumbai : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेभोवती फास गुंडाळत आपला मार्ग सुकर करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे उजवे हात समजल्या जाणाऱ्या सूरज चव्हाण यांना ईडीने केलेली अटक होय. आज त्यांना कोर्टासमोर उभे केले जाणार आहे.
आदित्य ठाकरे (Aaditya Thckeray) यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई (Mumbai) विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, तसेच विधानसभा आणि लोकसभा (LokSabha) मतदारसंघांच्या आकडेवारीसह पक्षासाठी रणनीती आखण्यात चव्हाण यांचा उत्तम हातखंडा आहे.
मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप असलेल्या चव्हाण यांच्या घरी काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. तेव्हापासूनच ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे होता. अखेर त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. आदित्य ठाकरेंसाठी संघटनात्मक रणनीती आखण्यापासून ते पक्षासाठीही रणनीती आखण्यात चव्हाण यांचा उत्तम हातखंडा. विविध निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पडद्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात. तसंच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यांच्यावर झालेली ईडी कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे आणि त्यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखणारे सूरज चव्हाण तसेच कायम पडद्यामागेच राहिले. चव्हाण यांचा राजकीय प्रवास एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून झाली. युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा विश्वासू आणि पुढे जाऊन ठाकरे गटाचे सचिव असा सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास खूप वेगाने झाला. लहानपणापासूनच बाळासाहेबांप्रती असलेला आदर आणि गिरणगावात रुजलेल्या शिवसेनेचे झालेले संस्कार यांमुळे सूरज चव्हाण एक कडवट शिवसैनिक म्हणून घडले.
शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता अशी सूरज चव्हाण यांची खरी ओळख. त्यांच्या राजकीय प्रवासाला खरी सुरुवात मुंबईतील वरळी येथून झाली. वरळीतील शिवसेनेच्या शाखेतून त्यांनी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली. आधी शिवसेनेसाठी झटणाऱ्या सूरज चव्हाणांनी आदित्य ठाकरेंनी युवासेना स्थापन केल्यानंतर स्वतःला युवासेनेच्या कामात झोकून दिलं. युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीपासून युवासेना वाढवण्यासाठी रणनीती आखण्यापर्यंत सूरज चव्हाणांचं मोलाचं योगदान. युवासेनेसाठी केलेल्या कामामुळे फार कमी काळातच त्यांची गणना आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांमध्ये केली जाऊ लागली. आदित्य ठाकरे कुठेही असोत, सूरज चव्हाण त्यांच्यासोबत अगदी सावलीप्रमाणे वावरायचे.
आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निवडणूक प्रचारापासून ते निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील कामापर्यंत सर्व लेखाजोखा आणि रणनीती चव्हाण यांच्यात नेतृत्वात होत होती. कोरोनाकाळातही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांनी अगदी ग्राउंड लेव्हलला उतरून काम केलं. वरळीत कोविड सेंटर, आरोग्य शिबिरं राबवण्यात चव्हाणांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. आदित्य ठाकरेंचा निर्णय मतदारसंघापर्यंत पोहोचवण्याचं कामही तेच करायचे. त्यामुळेच त्यांना आदित्य ठाकरेंचे राईट हँड म्हणून संबोधलं जायचं.
पक्षासाठी रणनीती आखण्यासोबतच सूरज चव्हाण यांचा मुंबई आणि मुंबई लोकसभा, विधानसभेचा दांडगा अभ्यास. याव्यतिरिक्त मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्येही सूरज चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दहा जागा जिंकल्या होत्या. दांडगा अभ्यास आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा यांमुळे सूरज चव्हाण आदित्य ठाकरे आणि वरळीपुरते मर्यादित न राहता, थेट मातोश्रीवर पोहोचले. शिवसेनेत अनेक वर्षे असलेल्या दिग्गजांकडे दुर्लक्ष करीत त्यांच्या गळ्यात अल्पावधीतच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सचिवपदाची माळ घातली.
(Edited By - Rajanand More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.