CM Eknath Shinde News : निवडणुकीत लोकांनी दिलेल्या मतांनाही रंग असतो...! होय, तसे आता काही राजकीय नेत्यांकडून थेट सांगितले जाऊ लागले आहे. घटनात्मक पदावर बसलेले नेते अप्रत्यक्षपणे तसे सांगत आहेत.
विरोधकांना डिवचण्यासाठी राज्याच्या प्रमुखांकडून म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका विशिष्ट समुदायाचा वापर केला जाऊ लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते थेट हिरवी मते असा उल्लेख करू लागले आहेत.
सामाजिक सलोखा गेला खड्ड्यात, आम्हाला फक्त ध्रुवीकरण करायचे आहे, त्याद्वारे सत्ता मिळवायची आहे, असा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री राज्याचे असतात, सर्वांचे असतात, त्यांना मते न दिलेल्या नागरिकांचेही असतात, हे एकनाथ शिंदेसाहेबांना कुणी सांगेल का?
आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे, असे काही वर्षांपूर्वी म्हणणाऱ्या मनसेची पार घसरण झाली आहे. आधी परप्रांतीय आणि आता हिंदू- मुस्लिम असा खेळ त्या पक्षाने सुरू केला आहे. परप्रांतीयांना विरोधाचा मनसेचा(MNS) मुद्दा उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते बृजभूषण शरण सिंह यांनी निकाली काढला आहे. तर सतत भूमिका बदलल्यामुळे क्षमता असूनही राज ठाकरे यांना यश मिळेनासे झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजपला काहीही फायदा झाला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नाही, असे भाजपचे विदर्भातील आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी जाहीरपणे सांगून टाकले आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या वाट्याला अशी अवहेलना आली. त्याचा विचार करणे राहिले दूरच, राज ठाकरे यांच्या नेत्यांनी आता हिरवी मते, म्हणजे मुस्लिमांची मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या जागा निवडून आल्या, अशी टीका सुरू केली आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) आणि त्यांच्या नेत्यांचे एकदा समजू शकते, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आदित्य ठाकरे यांना आता भेंडीबझार मतदारसंघातून लढावे लागेल, असे वक्तव्य शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी केले.
भेंडीबझार हा मुस्लिमबहुल भाग आहे. लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे तेथून निवडणून येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांना म्हणायचे आहे. त्यामुळे त्यांना मुस्लिमबहुल मतदारसंघ शोधावा लागेल, असे राज्याचे मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात बोलले आहेत. मुख्यमंत्री असे कसे बोलू शकतात, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असेल का?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली, ती फक्त मुस्लिमांची होती, त्यांचे उमेदवार मुस्लिमांच्या मतांमुळे निवडून आले, असा नॅरेटिव्ह शिंदे यांना सेट करायचा आहे. हिंदू मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी चीड निर्माण व्हावी, असा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. लोकसभा निवडणुकीत असे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत, हे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde)यांनाही माहीत आहे, तरीही त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, यावरूनही ते त्यांना डिवचत असतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातू लागू केलेल्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या एका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, हेही मुख्यमंत्री शिंदे यांना माहीत आहे. आता पंचविशीत असलेल्या शिवसेनेच्या मतदारांना ते माहीत नसावे, असे शिंदे यांना वाटते आहे. त्यामुळे त्या मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याप्रती चीड निर्माण कऱणे हा त्यांचा हेतू असावा.
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांच्या पक्षाला मते न दिलेल्यांचेही ते मुख्यमंत्री असतात. कोणाशीही भेदभाव करणार नाही, कोणालाही झुकते माप देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतलेली असते. मतांसाठीच्या साठमारीत मुख्यमंत्रिपदावर आरूढ झालेल्या नेत्याला याचा विसर पडणे, ही बाब गंभीर समजली गेली पाहिजे. मुख्यमंत्रिपदाला एक प्रतिष्ठा असते. ती प्रतिष्ठा कमी होऊ नये, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यायची असते. आपल्या बोलण्या, वागण्यामुळे एखाद्या समाजाच्या मनात भीती, दहशत निर्माण होऊ नये, याची काळजीही त्यांनी घ्यावी, असे अपेक्षित असते.
देशाच्या जडणघडणीत, विकासात सर्व समाजांचे योगदान असते, याचा विसर मुख्यमंत्री शिंदे यांना कसा पडला असेल? मुस्लिमांनी किंवा कोणत्याही समाजाने कोणत्या पक्षाला मते द्यावीत याचा अधिकार त्यांना लोकशाहीने, राज्यघटनेने दिलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना हे मान्य नाही का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
समाजाला सलोखा, शांती, प्रगती हवी आहे, महागाईवर अंकुश, बेरोजगारांना काम, नोकऱ्या हव्या आहेत. आरोग्याच्या चांगल्या शासकीय सुविधा हव्या आहेत. याची काळजी घेतली की कोणत्याही मुख्यमंत्र्याला लोक डोक्यावर घेतील, हे वेगळे सांगायची गरज नाही. ते मुख्यमंत्री शिंदे यांनाही माहीत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.