Lok Sabha Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024: कुणीही आले तर काय... या भावनेतून तर मतदानाचा टक्का घसरत नाही ना?

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात आणि देशात मतदानाचा टक्का घसरत आहे. चौथ्या टप्प्यातही तो फारसा वाढलेला नाही. मतदानाप्रति नागरिकांची ही उदासीनता चिंताजनक आहे. कुणीही आले तर काय फरक पडतो, अशा भावनेतून तर लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अय्यूब कादरी

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यासह देशात मतदानाची टक्केवारी घसरत आहे. ही बाब चिंताजनक आहे. निवडणूक आयोग, विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन लोकांना केले, मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.

कुणीही आले तर आम्हाला काय फरक पडतो, अशी भावना मतदारांच्या मनात आधीपासून घर करून आहे. ती अद्यापही कायम असल्याचे चित्र या निवडणुकीतही (Lok Sabha Election 2024) दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (election commission) गेल्या वर्षभरापासून मतदानाबाबत जनजागृतीचे काम सुरू केले आहे. घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करण्यात आले, विविध उपक्रम राबवण्यात आले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 75 टक्के मतदान व्हावे, हे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले होते. नवीन मतदान ओळखपत्रे देतानाही जनजागृती करण्याची संधी निवडणूक आयोगाने सोडली नव्हती.

कोणत्याही प्रकारच्या आमिषांना, प्रलोभनांना बळी न पडता सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावू, अशी प्रतिज्ञा मतदारांसाठी ओळखपत्रांसोबत देण्यात आली होती. मात्र चौथ्या टप्प्यातही हे उद्दिष्ट साध्य करण्यात आयोगाला अपयश आले आहेत.

यापूर्वीच्या तीन टप्प्यांतही राज्यात मतदानाचा टक्का 75 काय 65 टक्क्यांच्या जवळही गेला नाही. देशातली स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. मतदानासाठी नागरिकांचे बाहेर न पडणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. मतदान हा मौलिक अधिकार आहे. पुढील पाच वर्षे आपले राज्यकर्ते कोण असणार, हे मतदानाने ठरत असते. असे असतानाही मतदारांची उदासीनता चिंतेचा विषय आहे.

चौथ्या टप्प्यात राज्यात सायंकाळी पाच वाजपर्यंत सरारी 52.49 टक्के मतदान झाले होते. त्यात आणखी 10 टक्के वाढ होऊ शकेल. राज्य निवडणूक आयोगाने ठरवलेले 75 टक्के मतादानाचे उद्दिष्ट चौथ्या टप्प्यातही पूर्ण होण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात फक्त 44.90 टक्के मतदान झाले होते.

पुण्याला विद्येचे माहेरघर समजले जाते, राज्यातील सर्वात प्रतिष्ठित महानगर समजले जाते. अशा या शहरात मतदानाची टक्केवारी कमालीची घसरते, याचा अर्थ काय घ्यायचा? राज्यात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 मतदारसंघांत मतदान झाले.

पुण्यापाठोपाठ शिरूर मतदारसंघात 43.89 टक्के, मावळ मतदारसंघात 46.03 टक्के मतदान झाले होते. नंदुरबारला 60.60, जळगावला 51.98. रावेरला 55.36, जालना 58.85 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 54.02, नगर 43.89, शिर्डी 52.27 आणि बीड मतदारसंघात 58.21 टक्के मतदान सायंकाळी पाचपर्यंत झाले होते. पश्चिम बंगालमध्ये 75.72 टक्के मतदान झाले. उर्वरित राज्यांत मतदानाचा टक्का फारसा वाढला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यासाऱख्या शहरात, म्हणजे ज्या शहरात सुशिक्षित लोक राहतात, तेथे मतदान कमी होणे सर्वार्थाने चिंताजनक आहे. लोकांना कोणत्याही राजकीय पक्षांवर, कोणत्याही राजकीय नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही का, कुणीही निवडून आले तर आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे का, असे लोकांना वाटत असेल का?

ग्रामीण भागातील लोक तुलनेने आद्यापही आशावादी दिसत आहेत. पुण्यासह लगतच्या तीन लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत अन्य मतदारसंघांत अधिक मतदान झाले आहे. कुणीही आले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, अशी भावना अर्थातच ग्रामीण भागांतील मतदारसंघांतही आहे. मतदानाबाबत नागरिकांचा निरुत्साह जो आहे त्याला सर्वच राजकीय पक्ष, विशेषतः सत्ताधारी पक्ष मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.

जास्त मतदान हे सताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरते, असा एक ठोकताळा आहे, मात्र तो गेल्या अनेक निवडणुकांमध्ये खोटा ठरला आहे. मतदार बाहेर न पडणे, हे सताधाऱ्यांसाठीचेही अडचणीचे ठरते. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून प्रचार कसा सुरू आहे, यावर नजर टाकली तर अनेक बाबींचा उलगडा होईल.

पहिल्या टप्प्याच्या आधी सत्ताधारी पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले. दुसऱ्या टप्प्यातही असेच झाले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारात मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे प्रचारात आले, ते जोरकसपणे मांडले जाऊ लागले. बडे नेतेही थेट विशिष्ट समुदायांचा नामोल्लेख करू लागले. विकास, महागाई, बरोजगारी, शेतमालाल भाव हे जीवनमरणाचे प्रश्न बाजूला पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशा परिस्थिती मतदान कमी होत असल्याने सत्ताधारी भाजपची चिंता वाढली असेल का? उत्तर प्रदेशानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष भाजपने फोडले, अशी जनभावना निर्माण झाली आहे, त्यामुळे भाजपवर लोकांचा रोष असल्याचे बोलले जात आहे. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले नाहीत, पुत्र आणि पुत्रीप्रेमामुळे ते पक्ष फुटले, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात प्रचारादरम्यान सांगावे लागले होते. लोकांमधील रोष कमी करण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न होता. असे असले तरी मतदानाची कमी टक्केवारी कोणाच्या पथ्थ्यावर पडणार, हे चार जून रोजीच कळणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT