Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आणि प्रचाराचा नूरच पालटून गेला. विकासाचा मुद्दा बाजूला पडला आणि ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरू झाला. याचे कारण काय असेल, याबाबत राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावले जात आहेत. थोडासा मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात येईल की, ध्रुवीकरणाच्या प्रचाराची तयारी फार आधीपासून सुरू करण्यात आली होती.
विधानसभा 2019च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून हे सरकार मुस्लिमधार्जिणे कसे आहे हे सिद्ध करण्याची भाजप आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच झाली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नावापुढे मुस्लिम नावांशी संबंधित विशेषणे लावण्यास सुरवात झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत भाजपने असा प्रयोग फार पूर्वी केला होता. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी असे प्रयोग सुरू केले. यात भाजपच्या काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. आता गंमत अशी आहे, की भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे काही नेते जनाब या शब्दाचा सर्रास वापर करत आहेत. भाजप नेत्यांच्या नावांसमोर ते जनाब असे लिहीत आहे. यात चुकीचे काहीही नाही, मात्र उद्धव ठाकरे किंवा इतर नेत्यांना हिनवण्याच्या आधी भाजप नेत्यांनी त्याकडेही लक्ष द्यायला हवे.
मुस्लिम जणू गुन्हेगारच आहेत, असे चित्र भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने रंगवले जात आहे. मुस्लिमांचा इतका द्वेष हे नेते का करत असतील? एखाद्या मुस्लिमाने गुन्हा केला की सबंध मुस्लिम समाजाला टीकेचे लक्ष्य का केले जाते? एखाद्या हिंदूने गुन्हा केला की सबंध हिंदू समाजाला जबाबदार धरणे जसे चुकीचे आहे, तसेच मुस्लिमांबद्दलही आहे. वास्तव असे आहे, की समाजाला याच्याशी काही देणेघेणे नाही. सर्वधर्मीय लोक आपसात मिळून-मिसळून राहतात. काही राजकीय पक्षांनी मात्र समाजात विष कालवण्याचे काम सुरू केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकीय नेत्यांना, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदावर बसलेल्या नेत्यांना एका समाजाला लक्ष्य करण्याची, मतांसाठी ध्रुवीकरण करण्याची परवानगी राज्यघटना देते का, हा प्रश्न आता सर्वांना पडायला हवा. निवडणूक आयोग अशा विधानांकडे दुर्लक्ष का करते, असाही प्रश्न पडायला हवा.
मूळ मुद्दा असा आहे, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7 मे रोजी एका प्रचारसभेत म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गुंडाळून ठेवले आहेत. आता त्यांना जनाब उद्धव ठाकरे असे म्हटले जात आहे. जनाब हे मुस्लिम नावांच्या आधी लावले जाणारे विशेषण आहे. जसे नावाच्या अगोदर महोदय, महाशय, श्री लावले जाते किंवा वरिष्ठांना सर, साहेब असे संबोधले जात तसाच वापर जनाब या शब्दाचा केला जातो. जनाब हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे, हेही भाजप, शिंदे गटाच्या किती नेत्यांना माहीत असेल, याबाबत शंकाच आहे.
जनाब या शब्दात वाईट काय, हे नेत्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे,. देश सर्वांचा नाही का, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचा सहभाग नव्हता का? या प्रश्नांची उत्तरे भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांना द्यावी लागतील. त्यांना शांततामय सहजीवन मान्य नाही का, किंवा समाजात शांतता नांदावी, असे वाटत नाही का, असे प्रश्न आता लोकांना पडायला हवेत. शेजारचे घर पेटलेले असेल तर आपल्यालाही सुखाने जगता येणार नाही, याची जाणीव ठेवून लोकांनी नेत्यांचे डाव हाणून पाडले पाहिजेत.
कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या गप्पा मारताय जनाब उद्धव ठाकरे? - आचार्य तुषार भोसले ( 15 मे 2022). कायदा राबवायचा असेल तर मराठी पाट्या आणि भोंग्यांबद्दल राबवा की जनाब -मनसे आमदार राजू पाटील (13 एप्रिल 2022). जनाब संजय राऊत, शेतकरी आत्महत्यांवर कधी लेख लिहावा वाटला नाही का? - गोपीचंद पडळकर (22 मार्च 2022). शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे. -देवेंद्र फडणवीस (19 मार्च 2022). जनाब संजय राऊत, आपल्यासारखा खुशामतगिर पुन्हा होणे नाही. - आमदार राम सातपुते (25 जानेवारी 2022). जनाब राऊत, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतून हिंदुस्थान पाहायचा आहे. - चित्रा वाघ (26 आँक्टोबर 2021). जिलेबी अन् फाफडा, जनाब सेनेला दद्या झापडा. - अतुल भातखळकर (5 जानेवारी 2021). उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार गुंडाळून ठेवले आहेत. आता त्यांना जनाब उद्धव ठाकरे म्हटले जाते. -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (7 मे 2024). बाळासाहेबांना जनाब अशी उपाधी तेव्हा गप्प का?- शीतल म्हात्रे (24 नोव्हेंबर 2023).
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासाठी जनाब हे शब्द भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने वापरण्यात आला आहे. यात मनसेचे एकमेव आमदारही मागे राहिले नाहीत. भाजप अल्पसंख्याक आघाडीचे नेते हैदर आझम हे भाजप नेत्यांसाठी समाजमाध्यमांवर जनाब या शब्दाचा सर्रास वापर करतात. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात.
त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे, आशिष शेलार, पीयूष गोयल, राम नाईक, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावांसमोर जनाब असे लिहिलेले आहे. यात चुकीचे काहीही नाही. तो शब्द आदर देण्यासाठी वापरलेला आहे. उद्धव ठाकरे मुस्लिमधार्जिणे आहेत, असा संदेश देण्यासाठी जनाब या शब्दाचा वापर करणारे भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांकडे यावर काही उत्तर असेल का,असा प्रश्न निर्माण होत आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.